नौदलप्रमुखांचे मत: “डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज’मधील संबोधन
दि. २९ मार्च: देशाच्या सर्वंकष तसेच लष्करी उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी लष्कर, नौदल व हवाईदल या तिन्ही सैन्यदलातील समन्वय अतिशय महत्त्वाचा आहे, असे मत नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांनी गुरुवारी व्यक्त केले. वेलिंग्टन येथील ‘डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज’च्या ७९ व्या अभ्यासक्रमातील अधिकाऱ्यांसमोर ते बोलत होते.
भारताच्या तिन्ही सैन्यदलातील भविष्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तामिळनाडूतील वेलिंग्टन येथे असलेल्या ‘डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज’मध्ये प्रशिक्षण दिले जाते. तिन्ही सैन्यदलातील भविष्यातील ‘स्टाफ ऑफिसर्स’ना प्रशिक्षण देण्यासाठी १९४७मध्ये या महाविद्यालयाची स्थापना झाली होती. या महाविद्यालयात सैन्यदलातील अधिकाऱ्यांबरोबरच निमलष्करी दले व प्रशासनातील निवडक अधिकारी, तसेच मित्रदेशांतील लष्करी अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षित केले जाते. या अधिकाऱ्यांसमोर बोलताना नौदलप्रमुखांनी भारतीय नौदलाच्या उज्ज्वल परंपरेवर प्रकाश टाकला. भारताच्या अतिशय कळीच्या भौगोलिक स्थानामुळे हिंदी महासागर क्षेत्राचे सागरी संतुलन राखण्यात नौदलाने बजावलेल्या अथवा बजावणे अपेक्षित असलेल्या भूमिकेबाबतही त्यांनी या वेळी चर्चा केली.
भारतीय नौदलात होत असलेल्या बदलांबाबत बोलताना नौदलप्रमुख म्हणाले, की भारतीय नौदलात सध्या महत्त्वाचे स्थित्यंतर सुरु आहे. सरकारच्या आत्मनिर्भर भारत धोरणाच्या अनुषंगाने व त्याच्या सहायाने एक संघर्ष सज्ज, विश्वासार्ह, एकसंघ नौदल म्हणून भारताचे नौदल जागतिक स्तरावर उदयास आले आहे. भारताच्या नौदलाने अरबी समुद्रात यशस्वीपणे राबविलेल्या चाचेगिरीविरोधी मोहिमेबरोबरच नौदलाच्या इतर मोहिमांबद्दल त्यांनी या भाषणात विस्तृत माहिती दिली. हिंदी महासागर क्षेत्र व अरबी समुद्राच्या परिसरात भारताचे सागरी हित जपण्यासाठी नौदलाने निभावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची चर्चाही त्यांनी केली. बदलत्या भूराजकीय परिस्थितीत देशाचे आर्थिक, सामरिक व लष्करी हित जपण्यासाठी ब एकूणच राष्ट्रीय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी तिन्ही सैन्यादालांचा समन्वय असणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. यावेळी ‘डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज’चे कमांडंट लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स उपस्थित होते.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी