नसरल्लाच्या दोन उत्तराधिकाऱ्यांची हत्या केल्याच्या इस्रायलच्या दाव्यानंतर हिजबुल्लाहने एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार हिजबुल्लाहच्या अतिरेक्यांनी बुधवारी लेबनॉनच्या सीमावर्ती गाव लाबबोनेहजवळ इस्रायली सैनिकांना लक्ष्य करत त्यांच्यावर तोफगोळे आणि रॉकेटनी हल्ला चढवला.
इस्रायली सैन्याने सांगितले की, बुधवारी उत्तर इस्रायलमध्ये सायरन वाजले. तसेच मंगळवार, बुधवारी दक्षिण लेबनॉनमधील लढाईत तीन इस्रायली लष्करी जवान गंभीर जखमी झाले.
इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाच्या ठार झालेल्या नेत्याचे दोन उत्तराधिकारी ठार झाल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मंगळवारी जाहीर केले.
नेतान्याहू यांचे भाषण
इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये वरिष्ठ कमांडरांच्या हत्येनंतर त्रस्त झालेल्या हिजबुल्लाहच्या उपनेत्याने युद्धबंदीच्या वाटाघाटींसाठी आपण तयार असल्याचे सांगितल्यानंतर काही तासांनी नेतान्याहू यांच्या कार्यालयाने एक व्हिडिओ जारी केला.
”आम्ही हिजबुल्लाहची क्षमता कमी केली आहे. आम्ही स्वतः (हसन) नसरल्ला आणि नसरल्लाचा उत्तराधिकारी आणि उत्तराधिकाऱ्याचेही उत्तराधिकारी यांना यमसदनी धाडले आहे,” असे नेतान्याहू यांनी नंतरच्या दोघांचे नाव न घेता सांगितले.
इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट म्हणाले की, नसरल्लाहची जागा घेणारा हाशेम सफीद्दीन हा माणूस कदाचित ‘ठार’ झाला असावा. नेतान्याहू यांचा ‘बदली उत्तराधिकारी’ म्हणजे कोण हे लगेच स्पष्ट झाले नाही.
सफिद्दीन ठार झाला?
इस्रायलचे लष्करी प्रवक्ते डॅनियल हागारी म्हणाले की, “गेल्या आठवड्यात लढाऊ विमानांकडून बॉम्बहल्ले झाले तेव्हा सफीद्दीन हिजबुल्लाच्या गुप्तचर मुख्यालयात होता हे इस्रायलला माहित होते आणि सफीद्दीनचे नेमके स्टेट्स काय आहे त्याची तपासणी सुरू आहे. जेव्हा आम्हाला नक्की माहिती मिळेल तेव्हा आम्ही जनतेला कळवू.”
त्या हवाई हल्ल्यानंतर सफीद्दीनचा ठावठिकाणा सार्वजनिकरित्या समजलेला नाही. गेले वर्षभर इस्रायलबरोबर सीमेवर सुरू असलेल्या चकमकी या हिजबुल्लाहच्या इस्रायलवरच्या वाढत्या हल्ल्यांचा एक भाग आहे. हा मध्यपूर्वेतील इराणच्या प्रॉक्सी सैन्यातील सर्वात आक्रमक सशस्त्र गट असून गाझामध्ये इस्रायलशी लढणाऱ्या पॅलेस्टिनी अतिरेक्यांच्या समर्थनार्थ काम करत आहे.
नेतान्याहू म्हणाले, “आज हिजबुल्ला अनेक वर्षांसाठी पूर्वीपेक्षा अधिक कमकुवत झाला आहे.”
इस्रायलच्या सैन्याने मंगळवारी सांगितले की, मागील 24 तासांत दक्षिण लेबनॉनमधील भूमिगत हिजबुल्लाहच्या आस्थापनांवर केलेल्या जोरदार हवाई हल्ल्यांमध्ये सहा सेक्टर कमांडर आणि प्रादेशिक अधिकाऱ्यांसह किमान 50 लढाऊ सैनिक मारले गेले.
इस्रायल – गाझा युद्ध
एका वर्षापूर्वी पॅलेस्टिनी सशस्त्र गट हमासने गाझा येथून दक्षिण इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर वाढलेला प्रादेशिक तणाव अलिकडच्या आठवड्यात लेबनॉनसाठी डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे.
हिजबुल्ला आणि हमास या दोन्ही पक्षांचे पुरस्कर्ते इराणने 1 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली. त्यानंतर मंगळवारी इराणने इस्रायलला सूड घेण्याच्या धमक्यांचे पालन न करण्याचा इशारा दिला.
इराणच्या पायाभूत सुविधांवर झालेल्या कोणत्याही हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असे इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय जर आखाती देशांनी त्यांच्या हवाई क्षेत्राचा इराणविरुद्ध वापर करण्यास परवानगी दिल्यास ते “अस्वीकार्य” असेल आणि त्यांनी योग्य उत्तर दिले जाईल असा इशाराही दिला आहे.
बायडेन – नेतान्याहू यांचा फोन कॉल
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन बुधवारी नेतन्याहू यांच्याशी इराणवर हल्ला करण्याच्या सगळ्याच योजनांबद्दल फोन कॉल करतील अशी अपेक्षा असल्याचे एक्सिओसने मंगळवारी उशिरा तीन अमेरिकन अधिकाऱ्यांचा हवाला देत सांगितले.
“आम्हाला फोन कॉलचा वापर करून इस्रायलकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तराला मर्यादा घालण्याचा प्रयत्न करायचा आहे,” असे एका अमेरिकन अधिकाऱ्याने एक्सिओसला सांगितले.
एक्सिओसने या अधिकाऱ्याचा हवाला देऊन म्हटले आहे की अमेरिका हे सुनिश्चित करू इच्छित आहे की इराणमधील लक्ष्यांवर हल्ले केले जातील ते लहान मोठे असे नसून महत्त्वपूर्ण असतील.
व्हाईट हाऊसने या वृत्तावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.
पाश्चात्य शक्ती या सगळ्यावर राजनैतिक उपाय शोधत आहेत, त्या सगळ्यांना ही भीती आहे की संघर्ष अधिक व्यापक होईल मध्य पूर्वेतील तेल-उत्पादक देशांना त्रास होऊ शकेल आणि युद्ध झालंच तर अमेरिका यात भाग घेईल.
पेंटागॉनने मंगळवारी जाहीर केले की इस्रायलचे संरक्षण मंत्री गॅलंट वॉशिंग्टनला भेट देणार नाहीत. मात्र बुधवारी नियोजित असणारी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांची भेट घेणार आहेत.
युद्धविरामासाठी कासिमची विनंती?
अज्ञात ठिकाणाहून टेलिव्हिजनवर दिलेल्या भाषणात, हिजबुल्लाहचा उपनेता नईम कासेम म्हणाला की त्याने युद्धबंदीच्या प्रयत्नांचे समर्थन केले आहे.
यावेळी पहिल्यांदाच लेबनॉनमधील लढाई थांबवण्याची पूर्वअट म्हणून गाझामधील युद्धाच्या समाप्तीचा उल्लेख केला गेला नाही. ही लढाई थांबवण्यासाठी हिजबुल्लाचा मित्र असलेल्या संसदेचे अध्यक्ष नबीह बेरी यांनी उचललेल्या पावलांचे हिजबुल्लाहने समर्थन केल्याचे कासिमने सांगितले.
नेतान्याहू यांच्या कार्यालयाने कासिमच्या वक्तव्यावर भाष्य करण्यास नकार दिला. अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी वॉशिंग्टनमध्ये एका ब्रीफिंगमध्ये सांगितले की हिजबुल्लाहने “त्यांचा सूर बदलला असून आता त्यांना युद्धविराम हवा आहे” कारण हा गट युद्धभूमीवर ” बॅकफूटला असून होणाऱ्या हल्ल्यांनी त्रस्त झाला आहे.”
इस्रायलकडून “सातत्याने वार” होऊनही हिजबुल्लाहची क्षमता अबाधित असल्याचे कासेम म्हणाला. “आमच्याकडून होणाऱ्या प्रतिकारासाठी डझनभर शहरे क्षेपणास्त्रांच्या कक्षेत आहेत. आम्ही तुम्हाला खात्री देतो की आमची क्षमता उत्तम आहे.”
इस्रायलने लेबनॉनमधे उपस्थित आपल्या सैन्याला मजबूती दिली
इस्रायली सैन्याने सांगितले की त्यांनी दक्षिण लेबनॉनमध्ये 146 वा विभाग पाठवला आहे, जो सीमेवर तैनात केलेला पहिला राखीव विभाग आहे आणि दक्षिणपूर्व लेबनॉनपासून त्याच्या नैऋत्येकडे हिजबुल्लाहच्या विरोधात जमिनीवरून कारवाई करत आहे.
एका लष्करी प्रवक्त्याने लेबनॉनमध्ये एका वेळी किती सैन्य आहे हे सांगण्यास नकार दिला. मात्र लष्कराने पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे तिथे आणखी तीन सैन्य विभाग कार्यरत आहेत, याचा अर्थ असा की लेबनीजच्या भूमीवर हजारो इस्रायली सैनिक असण्याची शक्यता आहे.
इस्रायलने रात्रभर पुन्हा हिजबुल्लाहचे मुख्यालय असलेल्या बैरुतच्या दक्षिणी उपनगरांवर बॉम्बहल्ले केले. या हल्ल्यात बजेट आणि लॉजिस्टिक्ससाठी जबाबदार असलेल्या सुहेल हुसेन हुसेनीला – हिजबुल्लाहच्या काही उच्च अधिकाऱ्यांच्या हत्यासत्रातील नवे नाव – ठार केले आहे.
मृतांचा वाढता आकडा
इस्त्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की ऑक्टोबरमध्ये लेबनॉनमधून आत्तापर्यंत 3 हजारांहून अधिक रॉकेट्स इस्रायलवर डागण्यात आली आहेत. मात्र हवाई संरक्षणाद्वारे त्यात अडथळे निर्माण करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि लक्षणीय नुकसान टाळले गेले.
इस्त्रायल-हिजबुल्लाह संघर्षाने गेल्या दोन आठवड्यांत लेबनॉनमध्ये एक हजारहून अधिक लोक मारले आहेत आणि दहा लाखांहून अधिक नागरिकांना स्थलांतर करण्यास प्रवृत्त केले आहे.
7 ऑक्टो. 2023 रोजी हमासच्या अतिरेक्यांनी दक्षिण इस्रायलवर हल्ला केला तेव्हापासून गाझा युद्धाला सुरुवात झाली, इस्त्रायली आकडेवारीनुसार त्यावेळी 1 हजार 200 नागरिक ठार झाले तर 250 जणांना ओलिस म्हणून हमासने ताब्यात घेतले.
स्थानिक पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गाझामध्ये सुमारे 42 हजार हत्यांबद्दल इस्रायलच्या सूडाचा व्यापक निषेध झाला आहे.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)