भारताच्या आरोग्यविषयक जागतिक योगदानावर जयशंकर यांचा प्रकाश

0
जागतिक

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी नवी दिल्ली येथे 12 व्या आंतरराष्ट्रीय आरोग्य संवादात बोलताना जागतिक आपत्ती प्रतिसाद आणि निरोगीपणातील भारताच्या विक्रमी योगदानावर प्रकाश टाकला.

या आरोग्य संवादाच्या समारोप सत्राला संबोधित करताना ते म्हणाले की, भारताने जगभरातील 78 देशांमध्ये 600 हून अधिक महत्त्वपूर्ण प्रकल्प सादर केले आहेत. यापैकी अनेक आरोग्य क्षेत्रातील आहेत.

सहकार्याच्या गरजेवर भर देताना जयशंकर म्हणाले, “आजच्या काळात आणि युगात आरोग्य सेवा हा मूलभूत अधिकार आहे. हा केवळ एक विशेषाधिकार नाही. ग्लोबल साऊथ हे अनिश्चित पुरवठा साखळी आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या अनियमितेचे बळी होऊ शकत नाही. कोविडचा काळ हा आपल्या सर्वांसाठी एक खऱ्या अर्थाने शिकण्याचा अनुभव होता. आपण पुढच्या आव्हानासाठी तयार असले पाहिजे.”

जयशंकर पुढे म्हणाले, “आपल्या सर्वांना आरोग्य सेवा सुविधा बळकट करायची आहे, रुग्णांची सुरक्षा वाढवायची आहे आणि परवडणारी सेवा उपलब्ध होईल याची खात्री करायची आहे. जर आपण आणखी जवळून सहकार्य केले तर ही उद्दिष्टे अधिक चांगल्या प्रकारे साध्य होतील आणि जगासाठी माझा संदेश आंतरराष्ट्रीय भागीदारीच्या महत्त्वाविषयी असेल.”

ते पुढे म्हणाले की, सरकार भारताच्या खाजगी आरोग्य उद्योगाला एक भागीदार म्हणून महत्त्व देते कारण त्याने सर्वच भौगोलिक प्रदेशांच्या सुविधा आणि क्षमतांमध्ये योगदान दिले आहे.

जयशंकर म्हणाले की, भारतीय कंपन्या तसेच भारत सरकारने  स्थानिक उत्पादन करण्याचा आणि त्याद्वारे क्षमता बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. ते पुढे म्हणाले, “औषधांच्या उत्पादनात विविधता आणून आणि वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या वाढवून, भारत आपल्या मुख्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी जागतिक दक्षिणेची क्षमता बळकट करत आहे. पण आज मला आणखी एक मुद्दा मांडायचा आहे. केवळ ग्लोबल साऊथलाच नाही तर ग्लोबल नॉर्थलाही मजबूत वैद्यकीय भागीदारीची आवश्यकता नाही.

ग्लोबल नॉर्थकडील उत्तर अमेरिका, युरोप आणि सुदूर पूर्वेतील मोठ्या संख्येने असलेल्या देशांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तीव्र कमतरतेकडे त्यांनी लक्ष वेधले.

“आणि आज जेव्हा आपण गतिशीलतेच्या भागीदारीसाठी वाटाघाटी करतो, तेव्हा याचा एक चालक म्हणजे त्यांच्या वाढत्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यात त्यांना मदत करणे, ज्यात स्पष्टपणे त्यांच्या ज्येष्ठ नागरिकांचा विचार करणे आवश्यक आहे.”

ते म्हणाले की, “भारतीय रुग्णालयांनी आंतरराष्ट्रीय रुग्णांवर उपचार करण्यासाठी मॉड्यूल्स विकसित केले आहेत. आम्ही याकडे विशेषतः ग्लोबल साऊथमधील समाजांसाठी एक उल्लेखनीय योगदान म्हणून पाहतो, ज्यांच्यासाठी परवडणारी सेवा आणि सुलभता हा प्रमुख निकष आहे. ‘हील इन इंडिया’ उपक्रमाच्या माध्यमातून, आमचे सरकार वैद्यकीय मूल्य, प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि परदेशी रुग्णांना भारतात उपचार मिळवणे सोपे करण्यासाठी वचनबद्ध आहे.”

कोविड महामारीने जगाला वेठीस धरायला सुरुवात केली त्या वेळेची आठवण करून देत जयशंकर म्हणाले की, सुरुवातीच्या विचारविनिमयात भारत हा संभाव्य सर्वात मोठा चिंतेचा विषय होता.

“गंमत म्हणजे, भारताने केवळ स्वतःच्या गरजांची काळजी घेतली नाही तर जगाला योगदान देण्यासाठी प्रत्यक्षात पाऊल टाकले. त्यावेळी आम्ही 150 देशांना औषधे, 99 देशांना आणि दोन आंतरराष्ट्रीय संस्थांना लस, तसेच मास्क, किट्स, हातमोजे आणि व्हेंटिलेटर पुरवले.  महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या साहित्याचा पुरवठा आम्ही त्यावेळी केला जेव्हा आमचा स्वतःचा लसीकरणाचा उपक्रम सुरू झाला नव्हता. आमच्या लस मैत्री उपक्रमाद्वारे किंवा इतर जागतिक कार्यक्रमांद्वारे मोठ्या संख्येने विकसनशील देशांना मेड इन इंडिया लस प्राप्त झाली.

ते म्हणाले की, काही लहान देशांमधील तातडीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय वैद्यकीय पथकेही हिंद महासागर प्रदेशात गेली. अर्थात भारताने हे केवळ कोविडच्या काळातच केले असे नाही. खरेतर, कोविड आधी आणि नंतरच्या जगाकडे पाहण्याच्या आमच्या दृष्टिकोनाचा तो एक भाग आहे.”

मंत्री म्हणाले की, कोविड काळात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा पुनर्प्राप्ती आणि निरोगीपणासाठी पारंपरिक औषधाची उपयुक्तता आणि परिणामकारकता याची तीव्रतेने जाणीव झाली.

ते म्हणाले की, गुजरातमध्ये डब्ल्यूएचओचे जागतिक पारंपरिक औषध केंद्राचे यजमानपद भूषवण्याचे सौभाग्य भारताला मिळाले आहे. या पद्धती आणि उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी आयुष नावाचा विभाग सरकारने तयार केला. आम्ही या वर्षीही आंतरराष्ट्रीय सहकार्याची अपेक्षा करतो.

भारताने आंतरराष्ट्रीय योग दिन, पर्यावरणपूरक जीवनशैली उपक्रम आणि तृणधान्याच्या (millets) सेवनासारख्या अधिक पौष्टिक पद्धतींना प्रोत्साहन दिले आहे, असे ते म्हणाले.

भौगोलिक क्षेत्रात भारताच्या व्याप्तीची सविस्तर माहिती देताना जयशंकर म्हणाले, “गाझामधील मानवतावादी संकटाला तोंड देण्यासाठी आम्ही अलीकडेच 66.5 टन वैद्यकीय पुरवठा पाठवला आहे. त्याआधी, सीरियातील रुग्णालयांची वैद्यकीय क्षमता बळकट करण्यासाठी 1 हजार 400 किलोग्रॅम एवढी कर्करोगविरोधी औषधांची खेप पाठवण्यात आली होती. अफगाणिस्तानातही भारताने गेल्या काही वर्षांत 300 टन औषधे घेऊन पुढे पाऊल टाकले आहे तसेच आम्ही काबूलमध्ये उभारलेल्या रुग्णालयात तज्ज्ञांना पाठवले आहे.

2022 मधील आर्थिक संकटाच्या काळात श्रीलंकेतील रुग्णालयांमध्ये, युक्रेनमध्ये जीवितहानी आणि संघर्ष वाढल्याने किंवा म्यानमारमध्ये यागी चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने भारताने केलेल्या प्रयत्नांची उदाहरणे त्यांनी पुढे सांगितली.

भारताने क्यूबा, कंबोडिया, मालदीव आणि प्रशांत महासागरातील बेटांनाही आवश्यक ती मदत पुरवली आहे.

ते म्हणाले, “या प्रयत्नात, भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी भागीदारांसोबत काम केले आहे-मोठी आणि लहान, बेटे आणि जमिनीने वेढलेले, जवळचे आणि दूरचे असे सगळेच देश असले तरी – त्यांच्या नागरिकांचे चांगले जीवन सुनिश्चित करण्याच्या त्यांच्या इच्छेमध्ये एकजूट आहे”.

आज जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य विमा योजना असलेल्या आयुष्मान भारत उपक्रमाचेही त्यांनी तपशीलवार वर्णन केले.

तृप्ती नाथ


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here