दाएश-खोरासन संघटनेची भारतावर नजर; जागतिक जिहादातील नवी आघाडी

0

दाएश-खोरासन (दाएश-के) संघटना, जी एकेकाळी अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये काम करणारी इस्लामिक स्टेटची प्रादेशिक उपशाखा म्हणून ओळखली जायची, ती आता दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि युरोपवर नजर ठेवून असलेला आंतरराष्ट्रीय धोका बनली आहे. सीमापार जाऊन लोकांची भरती करणे, स्थानिक समस्यांचा किंवा असंतोषाचा फायदा घेत- अनेक भाषांमध्ये प्रचार करणे अशा कामांमधील तिची क्षमता पाहता, या बदलत्या सुरक्षा परिस्थितीत भारत आणि त्याच्या शेजारील देश हे या संघटनेचे महत्त्वाचे केंद्रबिंदू बनले आहेत.

दाएश-के चे नेतृत्व आणि प्रसार

सावाब सेंटरच्या (SAWAB Center) जून 2025 च्या अभ्यासानुसार, दाएश-खोरासन ही इस्लामिक स्टेटच्या सर्वात सक्रिय शाखांपैकी एक बनली आहे. 2015 मध्ये दाएशच्या (ISIS) समर्थनाने अधिकृतपणे स्थापन झालेल्या या संघटनेचे सध्याचे नेते शाहब अल मुहाजिर आहेत, ज्यांना सनाउल्ला गफारी म्हणूनही ओळखले जाते. मुजाहिर यांनी संघटनेचे स्वातंत्र्य आणि आंतरराष्ट्रीय पोहोच आणि ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने, त्यांना दहशतवादी कृत्यांसाठी वित्तपुरवठा आणि नियोजन करणाऱ्यांच्या यादीतही टाकले आहे. त्यांचे नेतृत्व दाएश-के साठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरले आहे, कारण त्यांच्यामुळेच संघटना पारंपरिक सीमांच्या पलीकडे जाऊन काम करू लागली आहे.

भारतातील वाढता धोका

दाएश-के संघटनेचा उदय, हा अफगाणिस्तानमधील राजकीय पोकळी, विस्कळीत शासनव्यवस्था आणि तालिबान तसेच अल कायदाच्या फुटीरवाद्यांमधील वैचारिक नैराश्यामुळे झाला आहे. या संघटनेच्या प्रचारात भारताचा वारंवार उल्लेख होतो. एका अहवालात असे म्हटले आहे की, 2023 आणि 2024 मध्ये भारतात दाएश-के संबंधित काही दहशतवादी हल्ल्यांचे कट उधळले गेले. या हल्ल्यांचे नेमके तपशील दिले गेलेले नसले तरी, या यादीत भारताचा उल्लेख केला असल्याने हे स्पष्ट होते की, भारत या संघटनेच्या वाढत्या लक्षवेधी क्षेत्रातील महत्वाचे टार्गेट आहे.

प्रादेशिक असामनतेचा गैरफायदा उचलणे, वंचित तरुणांना लक्ष्य करणे आणि आपल्या हेतूंनुसार त्यांचे ब्रेनवॉश करुन त्यांना कट्टरपंथी बनवणे, ही दाएश-के गटाची रणनीती आहे. दक्षिण आशियात, दाएश-के तरुणांना संभ्रमित करण्यासाठी भावनिक आणि वैचारिक कथांचा वापर करते. ‘व्हॉईस ऑफ खोरासन’ (Voice of Khorasan), या त्यांच्या अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मासिकातून, भारतीय सरकार आणि सुरक्षा दलांवर नियमितपणे हल्ले केले जातात. यात काश्मीर प्रश्नाला ‘धार्मिक अत्याचार’ म्हणून सादर केले जाते.

याच मासिकाच्या 39व्या अंकात “काश्मीर, द पॅराडाईज अंडर द कंट्रोल ऑफ इन्फिडेल्स” (Kashmir, the Paradise under the control of Infidels) नावाचा एक लेख प्रसिद्ध झाला होता, ज्यात प्रादेशिक तक्रारींना जागतिक जिहादाच्या कथांशी जोडले होते.

भारतासाठी हा धोका अधिक गंभीर होतो, कारण इथे दाएश-के संघटनेला भौगोलिक सीमांपलीकडे जाऊन, लोकांना भाषिक आणि धार्मिक वर्गीकरणाच्या मुद्द्यावर कट्टरपंथी बनवण्याची संधी आहे. अनेक मध्य आशियाई युवकांचे भरती करताना रशियासारख्या देशांमध्ये काम करत असताना संपर्क केला गेला होता. हेच धोरण भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या स्थलांतरित समुदायांवर लागू होऊ शकते, जे उपेक्षित परिस्थितीत खाडी देशांत किंवा आग्नेय आशियामध्ये वास्तव्यास आहेत.

भारताची भाषिक विविधता आणि मुस्लिम लोकसंख्येचा मोठा आकार दायश-केच्या प्रचारकांच्या लक्षात आलेला आहे. त्यांनी उर्दू, हिंदी, मल्याळम आणि इतर दक्षिण आशियाई भाषांमध्ये प्रचार सामग्री तयार केली आहे. भारताने ऑनलाइन कट्टरपंथ रोखण्यासाठी कडक उपाय केले आहेत, तरीही SAWAB च्या अहवालानुसार दायश-केने टेलिग्राम आणि रॉकेट.चॅटसारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मकडे वळून आपल्या रणनीतीत बदल केला आहे, ज्यामुळे भरती आणि प्रचार सहजतेने होतो.

दाएश-के मोठ्या प्रमाणावर तरुणांना आणि महिलांना संघटनेत भरती करुन घेत आहे. त्यांची प्रचाराची सामग्री, ज्यात मेम्स, व्हिडिओ आणि गेमिफाइड कंटेट यांचा समावेश असतो, तरुण प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी तयार केली जाते. ‘व्हॉईस ऑफ खोरासन’च्या ताज्या अंकात महिलांबद्दलचा सूर बदललेला दिसतो, ज्यात पारंपारिक लिंग भूमिका आणि महिला नेतृत्व व ऑपरेशनल तयारीच्या नवीन कथांचे मिश्रण आहे. यामुळे दक्षिण आशियातील तरुण पुरुष आणि महिलांमध्ये स्थानिक पातळीवर कट्टरतावाद वाढण्याचा धोका वाढतो.

दाएश-के च्या म्होरक्याने, 2019 च्या त्याच्या ‘इस्लामिक पॉलिटिकल सिस्टम’ (Islamic Political System) या पुस्तकात असे म्हटले आहे की: “शत्रूंना घाबरवण्यासाठी जास्त सुरक्षा असलेल्या शहरांमध्ये हल्ले केले पाहिजेत.” मॉस्कोमधील क्रोकस सिटी हॉलवरील हल्ला अशा प्रकारच्या हल्ल्यांचे उदाहरण आहे. यामुळे भारतासारख्या दक्षिण आशियातील दाट लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी, धार्मिक समारंभांमध्ये किंवा पायाभूत सुविधांवर हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारताच्या बहुस्तरीय सामाजिक रचनेमुळे आणि सध्याच्या जातीय तणावामुळे, जर यावर सक्रियपणे लक्ष दिले नाही तर कट्टरतावाद वाढू शकतो. सावाब रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की प्रभावी दहशतवादविरोधी उपाय केवळ सुरक्षा आणि पाळत ठेवण्यापुरते मर्यादित नसावेत, तर त्यात समुदाय सहभाग, सामाजिक-आर्थिक मदत आणि योग्य प्रति-कथांचा समावेश असावा. भारताच्या संदर्भात हे विशेषतः महत्त्वाचे आहे, कारण काही विशिष्ट समुदायांना लक्ष्य करून कठोर कारवाई केल्यास नकळत अतिरेकी संघटनांना भरतीसाठी मदत होऊ शकते.

एकंदरीत, दाएश-खोरासन दक्षिण आशिया आणि विशेषतः भारतासाठी एक स्पष्ट आणि सद्य धोका आहे. ही एक सीमाहीन बंडखोरी आहे जी परकेपणा, अस्मितेचे राजकारण आणि वैचारिक निराशेवर आधारित आहे. याविरुद्धची लढाई केवळ दहशतवादविरोधी बळाने नाही, तर दीर्घकालीन, सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील आणि सामाजिकदृष्ट्या समावेशक रणनीतीने लढावी लागेल. भारताने, त्याच्या भू-राजकीय आणि लोकसंख्याशास्त्रीय स्थितीमुळे, या वाढत्या धोक्याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

– रामानंद सेनगुप्ता

+ posts
Previous articleपंतप्रधान मोदींचा चीन दौरा: भारत- चीनमध्ये सीमारेषेबाबत जलदगतीने चर्चा
Next articlePakistan’s Army Chief Heads to US for Second Visit in Two Months Amid Shifting South Asia Dynamics

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here