संशयित ड्रग्जवाहू बोटीवर अमेरिकन सैन्याने केलेल्या हल्लात 3 जण ठार: ट्रम्प

0
अमेरिकन सैन्याने
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, 7 सप्टेंबर 2025 रोजी, व्हाईट हाऊसच्या साउथ लॉनवर पत्रकारांशी बोलत आहेत. सौजन्य: रॉयटर्स/अ‍ॅनाबेले गॉर्डन/फाइल फोटो

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी शुक्रवारी घोषणा केली की: “अमेरिकन सैन्याने सदर्न कमांडच्या कार्यक्षेत्रात अमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या संशयित बोटीला लक्ष्य केले आहे. या प्रदेशातील हा आणखी एक नवीन हल्ला आहे.”

हा हल्ला, कथित अमली पदार्थ वाहून नेणाऱ्या जहाजांवरचा किमान तिसरा हल्ला आहे, जो कॅरिबियनच्या दक्षिणेकडील भागात मोठ्या प्रमाणात अमेरिकन लष्करी तैनातीदरम्यान झाला आहे. ट्रम्प प्रशासनाने 10 स्टेल्थ फायटर्सना या मोहिमेत सामील होण्याचा आदेश दिल्यानंतर, शनिवारी 5 F-35 विमाने पोर्तो रिकोमध्ये उतरताना दिसली.

‘अमेरिकन लोकांना विष देण्यासाठी निघालेले जहाज’

शुक्रवारी, ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ वरील पोस्टमध्ये सांगितले की- “पेंटागॉनने त्यांच्या आदेशानुसार हा हल्ला केला, ज्यात जहाजावरील अमली पदार्थांची तस्करी करणारे 3 दहशतवादी मारले गेले.”

“गुप्तचर यंत्रणांनी पुष्टी केली की, हे जहाज बेकायदेशीर अंमली पदार्थांची तस्करी करत होते आणि अमेरिकन लोकांपर्यंत विषसमान अंमली पदार्थ पोहचवण्यासाठी येत होते.”

यूएस सदर्न कमांड (SOUTHCOM) ही अमेरिकेच्या लष्कराची एक युद्ध कमांड आहे, ज्यात दक्षिण आणि मध्य अमेरिका आणि कॅरिबियनमधील 31 देशांचा समावेश आहे.

कोणतेही ठोस पुरावे नाहीत

ट्रम्प यांनी याबात कोणताही ठोस पुरावा दिला नाही, मात्र त्यांनी एक मिनिटाचा एक हवाई व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात एका जहाज बाजू-बाजूच्या दोन विंडोमध्ये दाखवली होती. साधारणपणे अर्ध्या वाटेत पोहचल्यावर, जहाजावर किमान एक स्फोट झाल्याचे दिसते आणि तिथेच हा व्हिडिओ  संपतो.

ट्रम्प यांनी हे जहाज कुठून निघाले होते किंवा हल्ला नेमका कुठे झाला हे सांगितलेले नाही.

F-35 जेट्स व्यतिरिक्त, या प्रदेशात किमान 7 अमेरिकन युद्धनौका, तसेच एक अणु-शक्तीवर चालणारी पाणबुडी देखील तैनात आहे.

अमेरिकेन लष्कराने या आठवड्याच्या सुरुवातीला, दक्षिण कॅरिबियनमध्ये असाच एक हल्ला केला होता, ज्यात अमेरिकेच्या दिशेने कथित अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या एका व्हेनेझुएलियन जहाजाला लक्ष्य करण्यात आले होते.

‘बेकायदेशीर, न्यायबाह्य हत्या’?

जहाजावरील पहिल्या दोन हल्ल्यांबाबत ट्रम्प प्रशासनाने फारशी माहिती दिली नाही, तरीही अमेरिकेच्या खासदारांनी सरकारकडून करण्यात आलेल्या या कारवाईचे समर्थन करण्याची मागणी केली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, “2 सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या हल्ल्यात, व्हेनेझुएलाच्या ‘ट्रेन डे अरागुआ’ (Tren de Aragua) टोळीच्या सदस्यांना घेऊन जाणाऱ्या कथित जहाजावर हल्ला करण्यात आला.”

व्हेनेझुएला सरकारने, ज्याने अंमली पदार्थ तस्करीशी लढण्यासाठी आणि देशाचे संरक्षण करण्यासाठी हजारो सैनिक तैनात केल्याचे म्हटले आहे, पहिल्या हल्ल्यात मारले गेलेले लोक ट्रेन डे अरागुआशी संबंधित नव्हते, असे त्यांनी म्हटले आहे.

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो, यांनी वारंवार आरोप केला आहे की- अमेरिका त्यांना सत्तेतून हटवू पाहत आहे. गेल्या महिन्यात, वॉशिंग्टनने मादुरो यांच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्याला मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कम $50 दशलक्ष पर्यंत दुप्पट केली, त्यांच्यावर अंमली पदार्थ तस्करी आणि गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असल्याचा आरोप करत, जे मादुरो यांनी नाकारले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी पोर्तो रिको जवळच्या युद्धनौकेवरील खलाशी आणि नौसैनिकांना सांगितले की, त्यांना कॅरिबियनमध्ये प्रशिक्षणासाठी नव्हे, तर एका महत्त्वाच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेच्या “पुढच्या रांगेत” पाठवले आहे.

एखाद्या संशयित अंमली पदार्थ वाहून नेणाऱ्या जहाजाला जप्त करण्याऐवजी किंवा त्यावरील कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्याऐवजी उडवून देण्याचा निर्णय अत्यंत असामान्य आहे.

अमेरिकेच्या संविधानानुसार, युद्ध घोषित करण्याचा अधिकार काँग्रेसकडे आहे, परंतु राष्ट्राध्यक्ष हे सशस्त्र दलांचे सरसेनापती (commander-in-chief) आहेत आणि दोन्ही पक्षांच्या राष्ट्राध्यक्षांनी काँग्रेसच्या मान्यतेशिवाय परदेशात लष्करी हल्ले केले आहेत.

तज्ज्ञ आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या हल्ल्यांच्या कायदेशीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला, ह्युमन राइट्स वॉचने म्हटले की- “कथित अंमली पदार्थ वाहून नेणाऱ्या बोटींवरील हे हल्ले, बेकायदेशीर आणि न्यायबाह्य हत्या होत्या.”

“अमेरिकेचे अधिकारी अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याचा आरोप असलेल्या लोकांना सरसकट मारू शकत नाहीत,” असे ह्युमन राइट्स वॉचच्या वॉशिंग्टन येथील संचालिका सारा येगर, यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

“अमेरिकेत अंमली पदार्थ येण्याची समस्या हा काही सशस्त्र संघर्ष नाही, आणि अमेरिकेचे अधिकारी तसे भासवून त्यांच्या मानवाधिकार जबाबदाऱ्यांपासून सुटका करून घेऊ शकत नाहीत,” असे येगर यांनी सांगितले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleदेशाला लाँग-रेंज क्षेपणास्त्र हल्ला करु शकणाऱ्या विमानांची गरज- IAF Chief
Next articleपाकिस्तानी दहशतवादी गटांचे तळ खैबर पख्तूनख्वा येथे का हलवले?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here