भविष्यकालीन युद्धांसाठी ‘स्वदेशीकरण’ हेच प्रमुख शस्त्र: एअर मार्शल भारती

0

“जर, भारताला भविष्यातील संघर्षांमध्ये आपली ऑपरेशनल सज्जता आणि धोरणात्मक स्वायत्तता टिकवून ठेवायची असेल, तर देशाची संरक्षण सज्जता, अंशत: नव्हे तर पूर्णत: स्वदेशीकरणावर आधारित असली पाहिजे,” असा महत्वपूर्ण संदेश हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी दिला. ते, फिक्की (FICCI) आणि सेंटर फॉर एअर पॉवर अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज (CAPSS) यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या, एअरो टेक इंडिया 2025 मध्ये उद्योगपती, धोरणकर्ते आणि संरक्षण तज्ञांना संबोधित करत होते.

एअर मार्शल भारती यांनी, देशाने 100% स्वदेशीकरणावर भर देण्याचे आणि त्याच्या विकासाच्या दृष्टीने वाटचाल करण्याचे आवाहन केले. त्यांनी इशारा दिला की, “आणीबाणीच्या काळात, आयात केलेल्या महत्त्वाच्या घटकांवर भारताचे अवलंबित्व असेच कायम राहिले, तर भविष्यात देशाचे संरक्षण उत्पादन गंभीरपणे थांबू शकते.”

“स्वदेशीकरणाचा दर 99% जरी असला तरी, परदेशातून येणाऱ्या त्या 1% घटकांमुळे आपली सुरक्षितता धोक्यात राहते. त्यामुळे, आपण स्पष्ट आणि साध्य करता येण्याजोग्या कालमर्यादेत ‘संपूर्ण आत्मनिर्भरतेचे’ लक्ष्य ठेवले पाहिजे.”

‘आफ्टरबर्नर’ स्तरावरील नाविन्यतेची गरज

भविष्यातील नाविन्यपूर्ण संरक्षण कल्पनांना चालना देण्यासाठी, सार्वजनिक आणि खासगी भागधारकांना आवाहन करताना, भारती यांनी संकल्पनात्मक टप्प्याच्या पलीकडे जाण्याची गरज असल्याचे सांगितले. पारंपारिक संकल्पनांकडून- प्रत्यक्ष कार्यक्षमतेकडे जातेवेळी असलेल्या विलंबाविषयी बोलताना, “आता केवळ क्रूझ मोड अर्थात संथ गती पुरेशी नाही, तर ‘आफ्टरबर्नर’ (अतिउच्च गतीसाठी इंजिनाला देण्यात येणार अतिरिक्त शक्ती) प्रणालीची गरज आहे,” त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,

एअर मार्शल भारती यांनी, भविष्यकालीन युद्धाच्या संरचनेचे विविध टप्प्यांमध्ये विभाजन करत, विशिष्ट तंत्रज्ञान आणि धोरणात्मक मागण्यांची रुपरेषा स्पष्ट केली. त्यापैकी महत्वाच्या अशा ‘प्री-काइनेटिक’ टप्प्यात, त्यांनी AI प्रणालीवर आधारित डेटा प्रोसेसिंग, क्वांटम-प्रतिरोधक हालचाली आणि अवकाश-संयुक्तिक सेन्सर्ससह अनेक क्षेत्रांमध्ये मजबूत आणि टिकाऊ अशा ISR (गुप्तचर, पाळत, टेहळणी) क्षमतांची गरज अधोरित केली.

भविष्यातील युद्धे: मानव आणि यंत्रांचे समीकरण

भारती यांनी, भविष्यातील सक्रिय लढाऊ परिस्थितीविषयी बोलताना ‘सहाव्या-पिढीच्या लढाऊ प्रणालीचे’, स्वायत्त प्लॅटफॉर्मचे आणि मानव आणि मानवरहित यंत्राच्या सहकार्याचे वर्चस्व असलेल्या युद्धभूमीचे वर्णन केले. मानवी ऑपरेटर आणि AI मशीन्स यांच्यातील अखंड सहयोग, हाच नव्या युगातील युद्धाचा मजबूत कणा बनेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, दुसरीकडे त्यांनी ‘शस्त्र शोधक तंत्रज्ञान हे भारताच्या संरक्षण परिसंस्थेतील एक प्रमुख कमकुवत दुवा आहे,’ असे देखील म्हटले. त्यांनी नमूद केले की, “गेल्या काही काळात शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये प्रगती झाली असली तरी, अचूक लक्ष्य साधण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या स्वदेशी शोधकांच्या विकासाकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही.”

प्राधान्यक्रम देण्याजोगी संशोधन क्षेत्रे

एअर मार्शल भारती यांनी, अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकासासंबंधी गुंतवणुकीला प्राधान्य देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. उद्योग क्षेत्रातील संरक्षण दळणवळणामध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी क्वांटम कॉम्प्युटिंगवर, तसेच हायपरसोनिक क्षेपणास्त्रांसाठी- स्क्रॅमजेट प्रणोदन प्रणाली विकसित करण्यावर आणि लढाऊ तसेच वाहतूक करणाऱ्या विमानांसाठी मुख्य एरो-इंजिन प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याव्यतिरिक्त, त्यांनी निर्देशित ऊर्जा शस्त्रे आणि प्रगत काउंटर-ड्रोन तंत्रज्ञान यामधील नवकल्पनांच्या महत्त्वावर भर दिला. संरक्षण क्षमतांमध्ये तांत्रिक आघाडी राखण्यासाठी हे घटक अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मानवरहित प्रणालींच्या क्षेत्रातील वाढत्या गोंधळाबद्दल इशारा देत, त्यांनी भारतीय नवोन्मेषकांना, एखाद्या प्लॅटफॉर्मची टिकून राहण्याची क्षमता, मल्टी-सेन्सर एकात्मता आणि प्रगत पेलोड क्षमतांवर लक्ष केंद्रित करण्याची शिफारस केली.

उद्योग क्षेत्रातील नेत्यांकडून, धोरणात्मक स्वावलंबनाचे आवाहन

CAPSS चे मुख्य संचालक- एअर व्हाईस मार्शल अनिल गोलानी यांनी, यावेळी स्वदेशीकरण सूचींद्वारे आजवर झालेल्या एकंदर प्रगतीकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, “आयात केलेल्या 14 हजारांहून हून अधिक घटकांची जागा, आता स्थानिक पर्यायी उत्पादनांनी घेतली आहे. स्वदेशीकरणाच्या सरकारी उपक्रमांमुळे, 2.5 लाख कोटी रुपये मूल्याची खरेदी देशांतर्गत उत्पादकांकडे वळवण्यात आली असून, सहावी स्वदेशीकरण सूची लवकरच जाहीर होणार असल्याने यात आणखी वाढ अपेक्षित आहे.”

फिक्की समितीचे सदस्य गगन कुमार संगल, यांनीही आत्मनिर्भरतेच्या गरजेला दुजोरा देत म्हटले की, “हा केवळ देशांतर्गत क्षमतेचा प्रश्न नाही, तर ती एक धोरणात्मक गरज आहे. आपण अधिक वेगाने नवनिर्मिती करणे आवश्यक आहे आणि देशाच्या स्वदेशीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात सहकार्य करणे गरजेचे आहे.”

फिक्कीचे आणखी एक सदस्य आणि झेन टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष किशोर अट्लुरी यांनी, सध्या भारताच्या संरक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या परिवर्तनावर प्रकाश टाकला. “परदेशी हार्डवेअरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, भारत आता स्वदेशी डिझाईन्स, तंत्रज्ञान विकास आणि उत्पादनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारतीय हवाईदल हे आता फक्त ग्राहकाच्या भूमिकेत नसून, ते एक नवोन्मेषक निर्माता बनत आहे,” असे निरीक्षण त्यांनी यावेळी मांडले.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleIndia, Australia to Elevate Strategic Cooperation During Rajnath Singh’s Canberra Visit
Next articleराजनाथ सिंह यांचा कॅनबेरा दौरा, भारत-ऑस्ट्रेलिया धोरणात्मक सहकार्यात वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here