कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांची पंतप्रधान मोदी, जयशंकर यांच्यासोबत धोरणात्मक चर्चा

0

कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री अनिता आनंद यांनी, मे महिन्यात पदभार स्विकारल्यानंतर पहिल्यांदाच आपला अधिकृत भारत दौरा केला, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. भेटीदरम्यान, तिनही बड्या नेत्यांमध्ये व्यापार, ऊर्जा, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच नागरी देवाणघेवाण या क्षेत्रातील भागीदारी मजबूत करण्याबाबत धोरणात्मक चर्चा पार पडली.

पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या एका निवेदनात नमूद केले आहे की, “आनंद यांची भेट भारत-कॅनडा द्विपक्षीय भागीदारीला नवी गती देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना चालना देईल.” पंतप्रधान मोदींनी या वर्षाच्या सुरुवातीला G7 शिखर परिषदेदरम्यान कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी झालेल्या भेटीची आठवण करून देत, कॅनडाच्या भारतातील नियमीत सहभागाचे कौतुक केले.

आनंद यांनी X पोस्टद्वारे सांगितले की, “दोन्ही देश G7च्या गतीवर पुढे वाटचाल करत असून, कायदा अंमलबजावणीमध्ये परस्पर सहकार्य कायम ठेवण्यास आणि आर्थिक संबंध विस्तारित करण्यास उत्सुक आहेत.”

भेटीदरम्यान दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी, व्यापार आणि गुंतवणुकीबाबकत मंत्रिस्तरीय चर्चा पुन्हा सुरू करण्याचे, तसेच कॅनडा-भारत यांच्यातील ऊर्जा संवाद आणि संयुक्त विज्ञान-तंत्रज्ञान सहकार्य समिती यांसारख्या दीर्घकाळ निष्क्रिय राहिलेल्या मंचांना पुनरुज्जीवित करण्याचे निश्चीत केले.

दोन्ही देशाच्या सरकारने, डिजिटल नवकल्पना आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यालाही प्रोत्साहन दिले आहे. कॅनेडियन संशोधक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्यांना भारतात फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या ‘AI इम्पॅक्ट समिटमध्ये’ सहभागी होण्यासाठी आमंत्रितही करण्यात आले आहे.

या चर्चांमध्ये ‘कृषी’ हा आणखी एक महत्त्वाचा विषय केंद्रस्थानी होता, ज्यामध्ये अन्नपुरवठा साखळी सुधारण्यासाठी, कृषी-मूल्य साखळी विकसित करण्यासाठी, ऊर्जा निर्मितीकरिता कृषी-कचऱ्याचा वापर करण्यासाठी आणि हवामान-अनुकूल शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही देशांनी स्वारस्य दाखवले.

याशिवाय, उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात- विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबरसुरक्षा आणि फिनटेक यासारख्या क्षेत्रातील परस्पर सहकार्यावरही भर देण्यात आला.

या मंत्रीस्तरिय बैठका, भारत आणि कॅनडामधील राजनैतिक संवादाला नव्याने चालना देण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आहेत. दोन्ही देशांमध्ये मागील दोन वर्षांहून अधिक काळ तणावाचे वातावरण होते, त्यानंतर आता पुन्हा एकदा ‘संवाद’ सुरू झाला आहे. माजी कॅनेडियन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी, कॅनडियन नागरिक हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येबाबत केलेल्या आरोपांनंतर दोन्ही देशांमध्ये हा तणाव निर्माण झाला होता.

मंत्री जयशंकर यांनी, या भेटीदरम्यान 2023 मधील वादाचा कोणताही उल्लेख करणे टाळले आणि त्याऐवजी ‘द्विपक्षीय भागीदारी पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणा पुनर्स्थापित आणि पुनरुज्जीवित करण्याच्या गरजेवर’ भर दिला. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या अलीकडील संवादांचा आणि व्यापार मंत्र्यांमधील चर्चेचा दाखला देत, हा सकारात्मक बदल असल्याचे सांगितले.

“आम्हाला भविष्यातील परस्परपूरक अर्थव्यवस्था दिसते आहे, एक मुक्त समाज दिसतो आहे आणि यासाठी एक जवळचा आणि शाश्वत सहकारी म्हणून कॅनडासोबत भागीदारी करणे उचित आहे” असे ते यावेळी म्हणाले.

दोन्ही देश नागरी अणुऊर्जा आणि महत्त्वाच्या खनिज क्षेत्रातील सहकार्याचेही मार्ग शोधत आहेत.

G20 आणि कॉमनवेल्थ या दोन्ही गटांचे सदस्य असलेल्या भारत आणि कॅनडाने बहुपक्षीयता, हवामान बदल आणि शाश्वत विकास यांसारख्या मुद्द्यांवर समान भूमिका घेतली असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच दोन्ही मंत्र्यांनी नियमित संवाद ठेवण्याचे आणि सरकारी स्तरावरील विविध प्रयत्न समन्वयित करण्याचेही वचन यावेळी दिले.

दोन्ही देशांमधील राजनैतिक उपस्थिती पुन्हा एकदा अधोरेखित झाल्यामुळे, मंत्री अनिता अनंद यांचा हा दौरा म्हणजे, संतुलित संवादाची गती टिकवून ठेवण्यास चालना देणारे आणि भूतकाळातील मतभेद विसरून द्विपक्षीय संबंध पूर्वपदावर आणण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleUN Troop Contributing Countries’ Chiefs’ Conclave Kicks Off in New Delhi
Next articleमंगोलियाचे राष्ट्रपती चार दिवसांच्या राजकीय दौऱ्यासाठी भारतात दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here