UNTCC परिषदेमध्ये, भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आंतरकथेचा उलगडा

0

सध्या नवी दिल्ली येथे, संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैन्यदलात योगदान देणाऱ्या राष्ट्रप्रमुखांची (UNTCC) परिषद सुरू आहे, ज्यामध्ये जागतिक स्तरावरील लष्कर प्रमुखांसमोर भारताच्या दुर्मिळ ऑपरेशन्सचा खुलासा करण्यात आला. बंद दाराआड झालेल्या ब्रीफिंग दरम्यान, लष्कराचे उपप्रमुख (रणनीती) लेफ्टनंट जनरल राजीव घई, यांनी यावर्षी मे महिन्यात नियंत्रण रेषेवर (LOC) राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आंतरकथेचा उलगडा करत, यामध्ये 100 हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचे सांगितले.

लेफ्टनंट जनरल घई, ज्यांनी या कारवाईदरम्यान लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक (DGMO) म्हणून काम पाहिले होते, त्यांनी सांगितले की- “या कारवाईत पाकिस्तानचे किती मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, हे त्यांच्या लष्कराने घोषित केलेल्या मरणोत्तर पुरस्कारांच्या संख्येवरुनच स्पष्ट होते.”

“पाकिस्तानने बहुधा नकळतपणे, 14 ऑगस्ट रोजी त्यांची मरणोत्तर पुरस्कारांची यादी सार्वजनिक केली आणि त्यांनी जाहीर केलेल्या मरणोत्तर पुरस्कारांच्या संख्येवरून नियंत्रण रेषेवर झालेल्या त्यांच्या हानीचे प्रमाण 100 पेक्षा अधिक असल्याचे दिसून आले,” असे लेफ्टनंट जनरल घई म्हणाले.

“भारताविरुद्धचे त्यांचे ड्रोन हल्लेही पूर्णपणे अपयशी ठरले,” असेही त्यांनी नमूद केले.

ऑपरेशन सिंदूरच्या आंतरकथेचा उलगडा

‘ऑपरेशन सिंदूर’ ही, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला, ज्यात 26 निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला होता, त्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी भारताने ठरवून आणि योग्य समन्वय साधून दिलेली लष्करी प्रतिक्रिया होती. लेफ्टनंट जनरल राजीव घई, यांनी 22 एप्रिलपासून ते 6–7 मेच्या रात्रीपर्यंत घडलेल्या घटनाक्रमाचा तपशील देत, विविध सुरक्षा यंत्रणा आणि सैन्यदलांमधील समन्वय कसा साधला गेला याचे सविस्तर वर्णन केले.

ते म्हणाले की, “सर्वांनाच माहित होते की, भारताने प्रत्युत्तर देणे अटळ आहे. त्या अनुषंगाने 22 एप्रिल ते 6–7 मेदरम्यान कारवाया टप्प्याटप्प्याने आकार घेत होत्या. आम्ही आमचे लक्ष्य ठरवत होतो आणि शत्रूला रोखण्यासाठी सीमांवर पूर्वतयारी म्हणून तैनाती केली जात होती, सैन्यदल, गुप्तचर यंत्रणा आणि इतर विभागांमध्ये अतिशय उच्च पातळीचा समन्वय होता.”

घई यांनी सांगितले की, “अंतिम टार्गेट्सची यादी, ही अभ्यासपूर्णरित्या आणि सर्वप्रकारची पडताळणी करून मगच तयार करण्यात आली होती आणि त्यासोबत माहिती युद्धाची एक आक्रमक मोहिमही राबवण्यात आली.” त्यांनी हेही नमूद केले की, “दोन्ही देशांच्या महासंचालकांमध्ये सातत्याने संवाद सुरू असूनही, पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीत आपली ड्रोन घुसखोरी सुरूच ठेवली, ज्यामुळे भारतीय हवाई दलाला प्रत्युतरात्मक कारवाई करावी लागली.”

अचूक हल्ले आणि हवाई वर्चस्व

हवाई मोहिमेबाबत सविस्तर माहिती देताना, लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की: “भारतीय हवाई दलाने (IAF) 9 आणि 10 मेच्या रात्री पाकिस्तानच्या 11 हवाई तळांवर अचूक हल्ले केले.”

“आम्ही त्यांच्या 11 हवाई तळांवर हल्ला केला, ज्यामुळे आठ तळ, तीन हॅंगर आणि चार रडार प्रणाली उध्वस्त झाल्या. पाकिस्तानची अनेक हवाई साधने जमिनीवरच नष्ट झाली.”

त्यांनी पुढे सांगितले की, “C-130 वर्गातील एक विमान, एक AEW&C (Airborne Early Warning and Control) प्रणाली आणि त्यांची चार ते पाच फायटर जेट्स नष्ट करण्यात आली. काही उपकरणे हवेतही उद्ध्वस्त झाली.”

यापूर्वी, या खुलाशांची पुष्टी हवाई दलप्रमुख- एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनीही केली होती. त्यांनी सांगितले होते की, IAF ने लांब पल्ल्याचे हवाई हल्ले करून C-130 वाहतूक विमान, एक AEW&C किंवा SIGINT प्लॅटफॉर्म आणि अनेक F-16, JF-17 फायटर जेट्स नष्ट केली.

लेफ्टनंट जनरल घई म्हणाले की, “आता आपल्याला हे माहित आहे की, 300 किमी पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या, जगातील सर्वात लांब जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाईलनी शत्रूची पाच हाय-टेक लढाऊ विमाने पाडली. या हल्ल्यांची अचूक आणि निर्भयतेने केलेली अंमलबजावणी हीच या कारवाईची सर्वात महत्त्वाची बाजू होती.”

“पाकिस्तानसाठी ते घातक ठरले असते”

घई यांनी उघड केले की, “भारतीय नौदलाने अरेबियन समुद्रातही भक्कम तैनाती केली होती आणि संघर्ष सुरू झाल्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानने युद्धविरामाची मागणी केल्यावरही, ते कारवाईसाठी तिथे सज्ज होते.”

“शत्रूने एखादे पाऊल जरी पुढे टाकले असते, तरकेवळ समुद्रातूनच नाही तर, इतर स्तरावरहरी त्यांच्यासाठी ते घातक ठरले असते,” असे सूतोवाच त्यांनी यावेळी केला.

त्यांनी सांगितले की, “भारताने शत्रूच्या चार-पाच पावले पुढचाच विचार करून युद्धाभ्यास केला होता आणि त्यानुसार नियंत्रण रेषेवरील (LoC) पाकिस्तानच्या संभाव्य कृतींचा अंदाज बांधला होता.”

“आम्ही जेव्हा त्यांच्या दुसऱ्या थरावर हल्ला केला, तेव्हा त्यांच्यासाठी ते पूर्णपणे अनपेक्षिच होते. म्हणूनच त्यांना खूप मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला,” असे घई म्हणाले. 7 मेच्या पहाटे झालेल्या कारवाईत, तासाभरात 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

सैद्धांतिक बदल: अचूकता, नियमीत पाठपुरावा आणि राजकीय स्पष्टता

लेफ्टनंट जनरल घई यांनी यावेळी नमूद केले की, “दहशतवादाविरुद्ध भारताच्या अलीकडील प्रतिसादात धोरणात्मक सैद्धांतिक बदल दिसून येतो. ज्यात अचूक हल्ले, नियमीत पाठपुरावा आणि ठाम राजकीय निर्धार यांचा संगम पाहायला मिळतो.

पहलगाम हल्ल्यामागे असलेल्या तीन दहशतवाद्यांना जून महिन्यात ठार करण्यात आले, याविषयी बोलताना ते म्हणाले की, “आम्हाला त्यांचा शोध घेण्यास 96 दिवस लागले, पण आम्ही त्यांना विश्रांती घ्यायला दिली नाही. जेव्हा त्यांना ठार मारण्यात आले, तेव्हा ते थकलेले आणि हतबल दिसत होते. अखेर न्याय झालाच.”

पंतप्रधानांनी मांडलेल्या तीन धोरणात्मक तत्त्वांचा, त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला:

  1. दहशतवादी हल्ले हे युद्धाचाच प्रकार आहेत आणि त्यांना ठोस प्रत्युत्तर देणे क्रमप्राप्त आहे.
  2. भारत आण्विक धमक्यांना कधीच बळी पडणार नाही.
  3. दहशतवाद्यांमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये काहीही फरक नाही.

ब्रिफिंगचे धोरणात्मक महत्त्व

लेफ्टनंट जनरल घई यांनी, जागतिक स्तरावरील लष्करप्रमुखांसमोर दिलेला ‘ऑपरेशन सिंदूर’विषयीचा हा सविस्तर अहवाल, भारताच्या आत्मविश्वासाचा आणि जबाबदार भूमिकेचे एक धोरणात्मक प्रतीक मानला जात आहे. या माध्यमातून भागीदार राष्ट्रांना भारताच्या नियोजित आणि अचूक प्रत्युत्तर मॉडेलची, संयुक्त लष्करी क्षमतांची आणि ठाम पण जबाबदार दहशतवादविरोधी धोरणाची झलक मिळाली.

संयुक्त राष्ट्रांच्या शांतता राखीव दलाच्या व्यासपीठावर, ही ऑपरेशनल शिकवण शेअर करून भारताने आपली ‘दुहेरी ओळख’ अधिक दृढ केली, ज्यानुसार भारत एकीकडे जगातील अग्रगण्य सैन्य पुरवठा करणारे राष्ट्र आहे आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करत अचूक लष्करी कारवाया करणारी जबाबदार प्रादेशिक शक्ती आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले.

मूळ लेखक- रवी शंकर

+ posts
Previous articleGet Ready for War, France Warns Europe
Next articleट्रम्प यांच्या हस्ते कर्क यांना मरणोत्तर अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here