दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष यून यांच्यावर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप

0
माजी राष्ट्राध्यक्ष यून

सोमवारी, दक्षिण कोरियाच्या विशेष सरकारी वकिलांनी माजी राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांच्यावर अतिरिक्त आरोप दाखल केले. गेल्यावर्षी यून यांनी काही काळासाठी लागू केलेल्या लष्करी कायद्याच्या (मार्शल लॉ) घोषणेसंदर्भात, त्यांच्यावर अधिकारांचा गैरवापर केल्याचा आणि शत्रू देशाला मदत केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

सरकारी वकिलाच्या एका प्रवक्त्याने पत्रकार परिषदेत सांगितले की, “यून यांनी लष्करी कायदा घोषित करण्याच्या उद्देशाने दक्षिण आणि उत्तर कोरिया यांच्यात लष्करी संघर्ष भडकावण्याचा कथित प्रयत्न केला होता. या संदर्भात, एका लष्करी अधिकाऱ्याच्या मोबाइल फोनवर पुरावा देखील आढळला आहे, ज्यात उत्तर कोरियाविरुद्ध संभाव्य प्रक्षोभक कृतीचे संकेत देणारे काही शब्द होते, जसे की “ड्रोन” आणि “सर्जिकल स्ट्राइक”.

त्यानंतर एप्रिलमध्ये, घटनात्मक न्यायालयाने यून यांना पदावरून हटवले आणि त्यांच्या अयशस्वी लष्करी कायद्याच्या घोषणेमुळे उद्भवलेल्या बंडखोरीच्या आरोपाखाली त्यांच्यावर खटला टाकला, ज्याची सुनावणी आजही सुरू आहे. जर यून यामध्ये दोषी असल्याचे सिद्ध झाले, तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते.

षड्यंत्र आणि आरोप

यून हे वारंवार सांगत आले आहेत की, ‘लष्करी राजवट लादण्याचा त्यांचा कधीच हेतू नव्हता, परंतु विरोधी पक्षांनी केलेल्या गैर-कारभाराबद्दल त्यांना चेतावणी देण्यासाठी आणि लोकशाहीला “राज्यविरोधी” घटकांपासून वाचवण्यासाठी त्यांनी लष्करी कायदा लागू केला.’

मेमोमध्ये नमूद केल्यानुसार, ‘यून, माजी संरक्षण मंत्री किम योंग-ह्यून आणि माजी लष्करी गुप्तचर प्रमुख येओ इन-ह्यून यांनी दक्षिण कोरियाविरुद्ध, उत्तर कोरियाचा हल्ला घडवून आणण्याची योजना आखली होती,’ असे प्रवक्त्या पार्क जी-यंग यांनी सांगितले.

त्यांनी स्पष्ट केले की, ‘लष्करी कायदा घोषित करण्यासाठी यून यांना समर्थन मिळावे, म्हणून या तिन्ही व्यक्तींनी देशात तणाव निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले होते.’

सरकारी वकिलांनी सांगितले की, किम आणि येओ यांच्यावरही हेच अतिरिक्त आरोप दाखल करण्यात आले आहेत.

गुप्त कारवाईचे दावे

विशेष सरकारी वकिलांच्या पथकाने, यून आणि त्यांच्या लष्करी कमांडरवर, शेजारी राष्ट्रांमधील तणाव भडकावण्यासाठी आणि त्यांच्या लष्करी कायद्याच्या आदेशाचे समर्थन करण्यासाठी, उत्तर कोरियामध्ये गुप्त ड्रोन ऑपरेशनचे आदेश दिल्याचा आरोप केला आहे.

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये, उत्तर कोरियाने जाहीर केले होते की, दक्षिण कोरियाने प्योंगयांमध्ये उत्तर कोरिया-विरोधी पत्रके वाटण्यासाठी ड्रोन्स पाठवले, त्यांनी क्रॅश झालेल्या लष्करी ड्रोनच्या अवशेषांचे फोटोही प्रकाशित केले होते.”

माजी संरक्षण मंत्री किम, यांच्यावरही लष्करी कायद्याच्या घोषणेशी संबंधित आरोपांवरून खटला सुरू आहे.

माध्यमांच्या अहवालानुसार, यून यांच्या त्या आदेशाला आव्हान न दिल्याबद्दल, येओ यांना खूप पश्चात्ताप झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारी वकिलांच्या प्रवक्त्याने सांगितले की, “येओ त्यांच्या मोबाइल फोनवर सापडलेल्या नोंदींबद्दल, न पटणारी कारणे देऊन आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleचीनची जपानला सक्त ताकीद; ताकाईची यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे वाढला तणाव
Next articleब्राह्मोस शस्त्रांच्या विस्ताराकडे फिलिपिन्सचे लक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here