स्कॉर्पीन पाणबुडी करार आणि संयुक्त जहाज बांधणी योजनेवरील चर्चेत प्रगती

0
संयुक्त जहाज बांधणी
फाईल फोटो: 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या नौदल दिनानिमित्त, राजधानीत पत्रकारांशी संवाद साधताना, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी

भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी, यांच्या 9 ते 12 डिसेंबर दरम्यान आयोजित चार दिवसीय ब्राझील दौऱ्याची सुरूवात झाली असून, या भेटीदरम्यान भारत आणि ब्राझील दोन मोठ्या नौदल सहकार्य प्रस्तावांना अंतिम स्वरूप देण्याच्या अधिक जवळ पोहचतील. दोन्ही देशांनी गेल्या अनेक महिन्यांपासून यासंबंधी मसुदा चौकटींवर वाटाघाटी केल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे की, ब्राझिलियामध्ये सध्या सुरू असलेल्या चर्चांमुळे उर्वरित मतभेद लवकरच दूर होतील.

प्रगतीपथावर असलेले हे दोन महत्वाचे प्रस्ताव पुढीलप्रमाणे आहेत:

स्कॉर्पीन-श्रेणीतील पाणबुड्यांच्या ऑपरेटर्समध्ये एक सहकार्यात्मक यंत्रणा उभारणे, जी सामायिक देखभाल प्रोटोकॉल, सुधारित एमआरओ (MRO) समर्थन आणि दीर्घकालीन टिकाऊ सहकार्याला सक्षम करेल.

ब्राझीलमधील एका शिपयार्डमध्ये (जे सध्या त्याच्या क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात कार्यरत आहे) संयुक्त जहाज बांधणीचा उपक्रम सुरू करणे, ज्यामुळे भारत आणि ब्राझील एकत्रितपणे नौदल प्लॅटफॉर्म्स, जसे की- गस्ती नौका, सहाय्यक जहाजे किंवा इतर पृष्ठभागावरील जहाजे तयार करू शकतील, जे देशांतर्गत वापरासाठी तसेच निर्यात बाजारपेठांसाठी असतील.

ॲडमिरल त्रिपाठी यांच्या भेटीदरम्यान, ब्राझीलचे संरक्षण मंत्री जोसे मुसियो, जॉइंट स्टाफचे प्रमुख ॲडमिरल रेनाटो रॉड्रिग्स डी अगुइर फ्रेरे आणि ब्राझीलचे नौदल कमांडर ॲडमिरल मार्कोस सॅम्पायो ओल्सेन, यांच्यासोबत आयोजित बैठकांमध्ये या प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

राष्ट्राध्यक्ष लूला यांच्या 2026 मधील भारत दौऱ्यापूर्वीची भेट

भारत आणि ब्राझील IBSA (भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका) अंतर्गत, नियमित द्विपक्षीय लष्करी संबंध राखत असले तरी, ॲडमिरल त्रिपाठी यांचा हा दौरा विशेष महत्त्वाचा आहे, कारण तो ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लूला दा सिल्वा यांच्या, 2026 च्या सुरुवातीला नियोजित असलेल्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. नवी दिल्लीला आशा आहे की, नौदल सहकार्याच्या बाबतीत मोठी प्रगती साधली जाईल, जेणेकरून ही प्रगती आगामी शिखर परिषदेत जाहीर करता येईल किंवा त्याबद्दल पुढील काम सुरू करता येईल.

2023 मध्ये, माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी एरोस्पेस आणि औद्योगिक सहकार्यावर चर्चा करण्यासाठी ब्राझीलला भेट दिली होती, जी शेवटची उच्च-स्तरीय लष्करी भेट होती. ॲडमिरल त्रिपाठी यांचा 2025 मधील हा दौरा, प्रामुख्याने सागरी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत आहे, जिथे दोन्ही देशांना विस्ताराची मोठी संधी दिसत आहे.

भारत आणि ब्राझील, BRICS चे संस्थापक सदस्य असून, या दौऱ्याकडे दक्षिण-दक्षिण संरक्षण सहकार्य आणि तंत्रज्ञान भागीदारीसाठीच्या व्यापक प्रयत्नांची चौकट म्हणून पाहिले जात आहे.

ब्राझीलच्या नौदल सुविधांमध्ये प्रत्यक्ष सहभाग

ॲडमिरल त्रिपाठी यांच्या दौऱ्यामध्ये, ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्यावरील नौदल तळ, ऑपरेशनल कमांड्स आणि शिपयार्ड्सना भेटींचा समावेश आहे. यामुळे भारतीय शिष्टमंडळाला, पाणबुडी देखभाल सेवांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या ब्राझीलियन पायाभूत सुविधांचे मूल्यांकन करण्याची आणि पृष्ठभागावरील जहाजांसाठी संयुक्त बांधकाम लाईन्सच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करण्याची संधी मिळेल.

दोन्ही नौदले सागरी डोमेन जागरूकता, जलवैज्ञानिक सेवा, ऑपरेशनल प्रशिक्षण देवाणघेवाण आणि हिंद महासागर प्रदेश तसेच दक्षिण अटलांटिकमध्ये संभाव्य समन्वय यातील सहकार्याचा आढावा घेत आहेत.

संरक्षण संबंधातील वाढती प्रगती

2025 मधील नौदल चर्चा, ही भारत–ब्राझील संरक्षण भागीदारीचा विस्तार करणाऱ्या मागील पायऱ्यांच्या मालिकेवर आधारित आहे:

  • जुलै 2025: ब्राझिलिया येथे झालेल्या आठव्या संयुक्त संरक्षण समितीच्या बैठकीत सह-उत्पादन संधी, लष्करी प्रशिक्षण देवाणघेवाण आणि प्रादेशिक सुरक्षा सहकार्याचे परीक्षण करण्यात आले.
  • ऑक्टोबर 2025: ब्राझीलचे उपराष्ट्रपती गेराल्डो अल्कमिन आणि संरक्षण मंत्री जोसे मुसियो यांनी, नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली, जिथे त्यांनी आकाश हवाई संरक्षण प्रणाली आणि कमी वजनाची गरुडा 105 V2 तोफखाना प्रणाली, यांसारख्या भारतीय-मूळ प्लॅटफॉर्म्समध्ये स्वारस्य असल्याचे पुन्हा एकदा नमूद केले.
  • अलीकडेच, ब्राझीलने नवी दिल्लीतील आपल्या दूतावासात नौदल आणि हवाई दलाचे दूताधिकारी नियुक्त केले आहेत, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण मुत्सद्देगिरीच्या एका नवीन टप्प्याची सुरुवात झाली आहे.

दक्षिण-दक्षिण औद्योगिक सहकार्य केंद्रस्थानी

दोन्ही देश एका व्यापक संरक्षण-औद्योगिक अजेंड्यावर चर्चा करण्याची अपेक्षा आहे, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:

  • पाणबुडी जीवनचक्र समर्थन आणि क्रू प्रशिक्षण
  • नौदल प्लॅटफॉर्म्सचे सह-डिझाईन आणि सह-उत्पादन
  • किनारी पाळत आणि सागरी दळणवळण प्रणालीचे एकत्रीकरण
  • संरक्षण उत्पादन पुरवठा साखळ्यांसाठी संधी
  • आणि BRICS किंवा इतर दक्षिण-दक्षिण व्यवस्थांखालील बहुपक्षीय नौदल व्यासपीठांवरील समन्वय

भेटीतून ठोस परिणामांची अपेक्षा

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ॲडमिरल त्रिपाठी यांच्या भेटीचा उद्देश, अन्वेषणात्मक संवादाच्या पलीकडे जाऊन पाणबुडी आणि जहाज बांधणीच्या क्षेत्रातील ठोस निष्कर्षांवर लक्ष केंद्रित करणे आहे. तांत्रिक पथकांनी आधीच यासंबंधी अनेक फेऱ्यांची तयारी केली आहे आणि दोन्ही देश 2026 मधील मोदी-लूला बैठकीदरम्यान सादर करता येतील, अशा करारांना निश्चित करण्याच्या प्रयत्नात आहेत.

जर स्कॉर्पीन सहकार्य फ्रेमवर्क आणि संयुक्त जहाज बांधणी योजनेवर एकमत झाले, तर भारत–ब्राझील सागरी भागीदारीमध्ये निश्चितच एक नवीन टप्पा गाठला जाईल.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleIndia-Nepal Armies Conclude Joint Drill as DGMOs Observe Final Phase of Suryakiran–XIX
Next articleभारत–नेपाळ संयुक्त लष्करी सराव ‘सूर्यकिरण XIX’ यशस्वीरित्या संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here