एअर मार्शल नागेश कपूर यांनी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली

0
नागेश
एअर मार्शल नागेश कपूर यांनी 1 जानेवारी 2026 रोजी हवाई दलाच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. 

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाच्या दक्षिण पश्चिम हवाई कमांडचे (SWAC) नेतृत्व करणारे एअर मार्शल नागेश कपूर यांनी हवाई दल उपप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. चार दशकांहून अधिक काळ गौरवशाली सेवा बजावलेले  एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागेवर एअर मार्शल कपूर यांची नियुक्ती झाली आहे.

या नियुक्तीपूर्वी, एअर मार्शल कपूर गांधीनगर येथे मुख्यालय असलेल्या SWAC चे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते. ऑपरेशन सिंदूरमधील त्यांच्या नेतृत्वासाठी त्यांना सर्वोत्तम युद्ध सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले होते. या ऑपरेशन अंतर्गत, भारतीय हवाई दलाने 6 ते 10 मे दरम्यान पाकिस्तानी हवाई तळांवर समन्वित हल्ले केले होते, ज्यात पाकिस्तानच्या लष्करी लक्ष्यांचे मोठे नुकसान झाले होते.

भारताच्या विकसित होत असलेल्या हवाई शक्तीच्या धोरणातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर एअर मार्शल कपूर यांनी आता भारतीय हवाई दलातील दुसऱ्या सर्वोच्च पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

एअर मार्शल हे राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पदवीधर आहेत, डिसेंबर 1985 मध्ये अकादमीतून त्यांचे शिक्षण पूर्ण झाले आणि 6 डिसेंबर 1986 रोजी हवाई दलाच्या फ्लाइंग शाखेच्या फायटर स्ट्रीममध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले.

एअर मार्शल कपूर हे एक निष्णात लढाऊ वैमानिक, पात्र उड्डाण प्रशिक्षक आणि लढाऊ विमान दलाचे नेते आहेत. त्यांनी मिग-21 आणि मिग-29 विमानांच्या सर्व प्रकारांचे उड्डाण केले आहे. त्यांच्या गौरवशाली उड्डाण कारकिर्दीत, त्यांनी विविध प्रकारच्या लढाऊ आणि प्रशिक्षण विमानांवर 3 हजार 400 तासांपेक्षा जास्त परिचालन आणि प्रशिक्षणाचा उड्डाण अनुभव मिळवला आहे.

डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी असलेले एअर मार्शल कपूर यांनी कमांड, परिचालन, प्रशिक्षण आणि कर्मचारी अशा विविध पदांवर काम केले आहे.

त्यांच्या परिचालन अनुभवामध्ये सेंट्रल सेक्टरमधील एका फायटर स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर, वेस्टर्न सेक्टरमधील एका अग्रगण्य हवाई तळाचे स्टेशन कमांडर आणि एका प्रमुख हवाई तळाचे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून केलेल्या सेवांचा समावेश आहे. त्यांच्या प्रशिक्षणविषयक भूमिकांमध्ये एअर फोर्स अकादमीमध्ये मुख्य प्रशिक्षक (उड्डाण) आणि वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये मार्गदर्शक कर्मचारी सदस्य म्हणून केलेल्या कामाचा समावेश आहे.

एअर फोर्स अकादमीमधील त्यांच्या कार्यकाळात, त्यांनी हवाई दलामध्ये PC-7 Mk II विमानांच्या समावेशात आणि कार्यान्वयनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

एअर मार्शल यांनी पाकिस्तानमध्ये संरक्षण सहचारी म्हणून राजनैतिक पदही भूषवले आहे. त्यांच्या महत्त्वाच्या स्टाफ पदांमध्ये एअर मुख्यालय येथे सहाय्यक हवाई दल प्रमुख (ऑपरेशन्स आणि स्ट्रॅटेजी), दक्षिण पश्चिम हवाई कमांड येथे हवाई संरक्षण कमांडर, मध्यवर्ती हवाई कमांडच्या मुख्यालयात वरिष्ठ हवाई स्टाफ अधिकारी आणि एअर मुख्यालय येथे कार्मिक विभागाचे एअर ऑफिसर-इन-चार्ज यांचा समावेश आहे.

प्रशिक्षण कमांडचे नवीन प्रमुख

एअर मार्शल सीथेपल्ली श्रीनिवास यांनी गुरुवारी भारतीय हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (एओसी-इन-सी) म्हणून पदभार स्वीकारला. सध्याच्या नियुक्तीपूर्वी, त्यांनी दक्षिण पश्चिम हवाई कमांडच्या मुख्यालयात वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी म्हणून काम केले होते.

नॅशनल डिफेन्स अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले एअर मार्शल श्रीनिवास 1987 मध्ये भारतीय हवाई दलाच्या फायटर स्ट्रीममध्ये रुजू झाले. ते ‘श्रेणी ए’ पात्र उड्डाण प्रशिक्षक असून, त्यांना मिग-21, इस्क्रा, किरण, पीसी-7 एमके II, एचपीटी-32 आणि मायक्रोलाइटसह विविध विमानांवर 4 हजार 200 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. याव्यतिरिक्त, एअर मार्शल श्रीनिवास चेतक आणि चिता हेलिकॉप्टरवर सह-वैमानिक म्हणून काम केले आहे आणि त्यांनी पेचोरा क्षेपणास्त्र प्रणालीवर ऑपरेशन्स ऑफिसर म्हणून मानांकन प्राप्त केले आहे.

आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाची कमांड आणि स्टाफ पदे भूषवली आहेत. या पदांमध्ये एअर फोर्स अकादमीचे कमांडंट, पश्चिम सीमेवरील अग्रगण्य फायटर बेसचे एअर ऑफिसर कमांडिंग (एओसी), एका प्रमुख उड्डाण प्रशिक्षण तळाचे एओसी, जयपूर येथील वेस्टर्न एअर कमांडच्या ॲडव्हान्स हेडक्वार्टरचे एओसी, प्रतिष्ठित फ्लाइंग इन्स्ट्रक्टर्स स्कूलचे कमांडिंग ऑफिसर, इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस सेफ्टीचे कमांडंट आणि बेसिक फ्लाइंग ट्रेनिंग स्कूलचे कमांडिंग ऑफिसर यांचा समावेश आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleDRDO Registers Record Rs 1.3 Lakh Crore Inductions, 11 Major Contracts Signed in 2025
Next articleविक्रमी संरक्षण खरेदीमुळे ‘2025 हे खऱ्या अर्थाने सुधारणांचे वर्ष’ ठरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here