प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ‘भैरव कमांडो बटालियन’चे होणार दमदार पदार्पण

0
भैरव
ऑक्टोबर 2025 मध्ये, लोंगेवाला युद्धभूमीवर 'भैरव कमांडोंशी' संवाद साधताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘भैरव लाइट कमांडो बटालियन’चे पदार्पण अपेक्षित आहे, तसेच भारतीय लष्कर कर्तव्य पथावर प्रथमच सादर होणाऱ्या “फेज्ड बॅटल अ‍ॅरे फॉर्मेशन”मध्ये (टप्प्याटप्प्याने युद्धरचनेचे सादरीकरण) आपल्या महत्वाच्या युद्धसामग्रीचे प्रदर्शन करणार आहे, अशी माहिती संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी शुक्रवारी दिली.

77 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याबद्दल साउथ ब्लॉक येथे पत्रकारांना माहिती देताना सिंह म्हणाले की, पायदळ आणि विशेष दले यांच्यातील “अंतर भरून काढण्यासाठी”, गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये स्थापन करण्यात आलेल्या भैरव युनिटने यापूर्वी 15 जानेवारी रोजी, जयपूर येथील लष्करी दिनाच्या परेडमध्ये सहभाग घेतला होता आणि आता ते पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिन परेडमध्ये संचलन करणार आहेत.

यावर्षी सुरू करण्यात आलेल्या नवीन फॉर्मेशननुसार, लष्कराचे प्रमुख प्लॅटफॉर्म्स (जे प्रामुख्याने स्वदेशी बनावटीचे आहेत), कर्तव्य पथावर अशा क्रमाने मार्गक्रमण करतील, जे प्रत्यक्ष रणांगणावरील तैनातीचे प्रतिबिंब असेल. याची सुरुवात टेहळणी घटकांपासून होऊन, त्यानंतर क्रमाक्रमाने लढाऊ यंत्रणा, रसद (लॉजिस्टक) यंत्रणा आणि युद्धाच्या गणवेशातील संबंधित कर्मचारी मार्गक्रमण करतील, असे सिंह यांनी स्पष्ट केले.

“बॅटल अ‍ॅरे फॉर्मेशनमध्ये हवाई प्रणाली देखील प्रदर्शित केल्या जातील,” असे त्यांनी पुढे सांगितले. यंदाची परेड प्रेक्षकांसाठी अधिक मनोरंजक, वास्तववादी आणि आकर्षक बनवण्यासाठी हा बदल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फ्लायपास्टबद्दल बोलताना सिंह म्हणाले की, स्वदेशी बनावटीचे LCA तेजस हे लढाऊ विमान वगळता, या श्रेणीमध्ये राफेल, सुखोई-30, पी-8आय, मिग-29, अपाचे, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH), प्रगत हलके हेलिकॉप्टर (ALH), एमआय-१७, तसेच सी-130 आणि सी-295 ही मालवाहू विमाने विविध फॉरमेशनमध्ये सहभागी होतील.

भारतशक्तीशी बोलताना त्यांनी सांगितले की, ‘कर्तव्य पथावर प्रदर्शित केल्या जाणाऱ्या प्रमुख संरक्षण प्लॅटफॉर्म्समध्ये ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र, आकाश हवाई संरक्षण प्रणाली, मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली (MRSAM), प्रगत टोव्ड आर्टिलरी गन सिस्टम (ATAGS), धनुष तोफ, शक्तिमान वाहने आणि निवडक ड्रोन्सच्या स्थिर प्रदर्शनाचा समावेश असेल.’

यावर्षीच्या परेडला युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. युरोपियन कमिशनची एक छोटी नौदल तुकडी देखील संचलनात सहभागी होईल.

यावर्षीच्या सोहळ्याची संकल्पना “वंदे मातरमची 150 वर्षे” अशी आहे. कर्तव्य पथावरील आसन व्यवस्थेच्या मागील पडद्यावर राष्ट्रगीताच्या सुरुवातीच्या कडव्यांचे चित्रण करणारी जुनी चित्रे असतील, तर मुख्य मंचावरील फुलांच्या सजावटीद्वारे राष्ट्रगीताचे रचनाकार बंकिमचंद्र चटर्जी यांना आदरांजली वाहिली जाईल.

संरक्षण सचिवांनी सांगितले की, पूर्वीच्या पद्धतीमध्ये थोडे बदल करत, आसन व्यवस्थेमध्ये यावेळी “VVIP” आणि इतर तत्सम संज्ञा वापरल्या जाणार नाहीत. त्याऐवजी, सर्व बैठक कक्षांना भारतीय नद्यांची नावे देण्यात आली आहेत.

संरक्षण मंत्रालयानुसार, परेडमध्ये 18 संचलन तुकड्या आणि 13 लष्करी बँड सहभागी होतील, जी सुमारे 90 मिनिटे चालण्याची शक्यता आहे.

यावर्षीच्या परेडमध्ये एकूण 30 चित्ररथ कर्तव्य पथावरून मार्गक्रमण करतील, जे 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे तसेच 13 विविध मंत्रालये आणि सेवांचे प्रतिनिधीत्व करतील.

मूळ लेखक- रवी शंकर

+ posts
Previous articleभारत फोर्जला मानवरहित प्रणालींसाठी 300 कोटी रुपयांचे कंत्राट प्राप्त
Next article114 राफेल जेट्ससाठी DPB कडून प्राथमिक मंजुरी; DAC च्या मान्यतेची प्रतीक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here