चीनच्या जन्मदरात विक्रमी घट; लोकसंख्या पुन्हा रोडावली

0
चीनच्या जन्मदरात

सोमवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, 2025 मध्ये चीनचा जन्मदर विक्रमी पातळीवर घटल्यामुळे, सलग चौथ्या वर्षी देशातील लोकसंख्येत घट झाली आहे. भविष्यात ही घट अधिक तीव्र होण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (NBS) च्या माहितीनुसार, चीनची लोकसंख्या 33.9 लाखांनी घटून 1.405 अब्जांवर आली आहे, जी 2024 च्या तुलनेत अधिक वेगाने झालेली घट आहे. एकूण जन्मांचे प्रमाण 17% नी घसरून 79.2 लाख झाले आहे, तर मृत्यूची संख्या वाढून 113.1 लाखांवर पोहोचली आहे.

चीनचा जन्मदर प्रति 1,000 लोकांमागे 5.63 पर्यंत खाली आला आहे, तर मृत्यूदर प्रति 1,000 लोकांमागे 8.04 इतका वाढला आहे, जो 1968 नंतरचा उच्चांक आहे.

2022 पासून, चीनची लोकसंख्या आकुंचन पावत आहे आणि लोकसंख्या झपाट्याने वृद्ध होत आहे. यामुळे देशांतर्गत खप वाढवण्यासाठी आणि कर्जावर नियंत्रण मिळवण्यासाठी बीजिंग (चीन सरकार) करत असलेल्या प्रयत्नांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत.

60 वर्षांवरील लोकांचे प्रमाण आता एकूण लोकसंख्येच्या सुमारे 23% आहे आणि 2035 पर्यंत ही संख्या 40 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. चीनने यापूर्वीच निवृत्तीचे वय वाढवले असून, आता पुरुषांनी 63 व्या वर्षापर्यंत आणि महिलांनी 58 व्या वर्षापर्यंत काम करणे अपेक्षित आहे.

‘एक अपत्य’ धोरणाचे दीर्घकालीन परिणाम

2024 मध्ये विवाह नोंदणीमध्ये विक्रमी 20% घट झाली असून केवळ 61 लाख जोडप्यांनी नोंदणी केली.

विवाह हे जन्माच्या प्रमाणाचे प्रमुख सूचक मानले जातात. मात्र, मे 2025 च्या नियमानुसार जोडप्यांना देशात कोठेही लग्न करण्याची परवानगी दिल्याने कदाचित तात्पुरती वाढ दिसून येईल. 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत विवाहांच्या संख्येत वार्षिक 22.5% वाढ झाली आहे.

1980 ते 2015 या काळात लागू असलेल्या ‘एक अपत्य’ धोरणामुळे गरिबी कमी होण्यास मदत झाली असली तरी, त्याने चिनी कुटुंब व्यवस्था आणि समाज पूर्णपणे बदलून टाकला. आता प्रशासन या धोरणाचे परिणाम पुसून काढण्यासाठी “विवाह आणि अपत्यप्राप्तीबद्दल सकारात्मक दृष्टिकोन” रुजवण्याचा प्रयत्न करत आहे.

आर्थिक धोरणात लोकसंख्या हा महत्वाचा मुद्दा

लोकसंख्या नियोजन आता चीनच्या आर्थिक धोरणाचे केंद्रस्थान बनले आहे. जन्मदर वाढवण्यासाठी बीजिंगला सुमारे 180 अब्ज युआन खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. या उपायांमध्ये राष्ट्रीय बाल अनुदान आणि 2026 मध्ये गर्भधारणेशी संबंधित वैद्यकीय खर्च पूर्णपणे उचलण्याच्या आश्वासनाचा समावेश आहे.

चीनचा प्रजनन दर, प्रति महिला सुमारे एक आपत्याचा जन्म, या प्रमाणात जगातील सर्वात कमी जन्म दरांपैकी एक आहे, जो लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या दरापेक्षा खूपच कमी आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleचीनच्या वाढीने गाठले निर्धारित लक्ष्य तरी देशांतर्गत आर्थिक परिस्थिती बिकटच
Next article2026 च्या शिखर परिषदेपूर्वी RBI कडून BRICS डिजिटल करन्सी लिंकला गती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here