अण्वस्त्रांचा वापर करून जर युद्ध केले गेले तर समोरच्या देशाकडून देखील तसाच प्रतिसाद मिळेल, अशी हल्लीच्या काळात धारणा बनली आहे. युक्रेन युद्ध आणि अण्वस्त्रांचा वापर करण्याची रशियाकडून सातत्याने दिली जाणारी धमकी, रशिया आणि नाटोच्या सैन्याकडून अण्वस्त्रांची पूर्ण ताकदीने केली जाणारी जमवाजमव आणि त्यांच्या होणाऱ्या कवायती, केर्च ब्रीजवरचे बॉम्बहल्ले, गॅझप्रॉमची गॅस पाइपलाइन उद्ध्वस्त करणे, युक्रेनने अलिकडेच 100हून अधिक रशियन सैनिकांची केलेली हत्या यासारख्या अत्यंत भीतीदायक घटनांमुळे व्यूहरचनात्मक आण्विक युद्ध होईल का? या तणावात आज संपूर्ण जग आहे.
पण एक व्यूहरचनात्मक आण्विक युद्ध मर्यादित स्वरुपात राहील का? कारण ते लवकरच सर्वांगीण आण्विक युद्धात परावर्तीत होऊ शकते, ज्यामध्ये केवळ दोन युद्धखोर देशच नव्हे तर. त्यांची सर्व मित्रराष्ट्रेही यात ओढले जातील आणि त्याचे अल्प तसेच दीर्घकालीन परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील.
अणुयुद्धाच्या परिणामांच्या चर्चेत, स्फोट, उष्णता, लोकल रेडिएशन फॉलआऊट आणि इलेक्ट्रोमॅग्नेटीक पल्स यासारखे अल्पकाळाचे भयानक परिणाम तर होतीलच, शिवाय दूरगामी दीर्घकालीन परिणाम देखील दिसून येतील. लष्कराचे नियोजन करणारे मात्र, सुरू असलेल्या युद्धाचे अल्पकालीन परिणाम आणि नफ्यावर लक्ष केंद्रित करतील.
मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या आगी तसेच जागतिक हवामानातील बदल आणि त्याचे होणारे परिणाम, यासारख्या दीर्घकालीन परिणामांचा अण्वस्त्रांनी सुसज्ज असलेल्या देशांनी योग्य विचार केला नसावा. अप्रत्यक्ष प्रभावांचा अंदाज लावणे कठीण आहे आणि यासाठीच लष्करी नियोजकांच्या क्षेत्राबाहेर असणाऱ्या वैज्ञानिक ज्ञानाची आवश्यकता आहे. तरीही, संपूर्ण अणुयुद्धातील अप्रत्यक्ष हानीमुळे जगभरातील निम्म्याहून अधिक लोकसंख्येचा नाश होईल.
जागतिक हवामान बदल
जर आण्विक युद्ध झालेच तर जंगलात मोठ्या प्रमाणात आगी लागतील, मशरूमच्या आकाराच्या ढगांमधून मोठ्या प्रमाणात वातावरणात काजळी आणि राख फेकली जाईल, ज्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास अडथळा निर्माण होईल. परिणामी भयंकर अशा आण्विक हिवाळ्याला जगाला सामोरे जावे लागेल.
समतापमंडलात (स्ट्रॅटोस्फेरिक) काजळीचा फैलाव
दिल्लीसारख्या शहरात 300 किलोटन मिनिटमॅन स्फोटामुळे अंदाजे 6 किमी त्रिज्येच्या परिसरात आग लागू शकते. याशिवाय उपखंडात किंवा जगात कुठेही आण्विक युद्ध झाले, तर एकाच वेळी आणखी अनेक शहरे बेचिराख होऊन तिथे फक्त हवा, धूळ, आग आणि धूर यांचेच अस्तित्व राहील.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य अणुयुद्धामुळे देखील मोठ्या प्रमाणात आगी लागतील, ज्यामुळे जागतिक हवामानात फार मोठे बदल होतील आणि पुढे अनेक दशके सर्व प्रकारचे जीवन विस्कळीत होऊ शकते.
अशा मोठ्या आगींमुळे निघणारा धूर पृथ्वी जवळच्या वातावरणात (स्ट्रॅटोस्फेरिकमध्ये) लाखो टन काजळी फेकेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात जर प्रत्येकी 15 किलोटन वजनाच्या 100 अण्वस्त्रांनी युद्ध झालेच तर त्यामुळे 5 दशलक्ष टन (टेराग्रॅम – टीजी) काजळी स्ट्रॅटोस्फेरिकमध्ये फेकली जाऊ शकते. आज भारताकडे 150पेक्षा कमी अण्वस्त्रे आहेत, तर पाकिस्तानकडे 250-400 वेगवेगळ्या प्रकारची, 12 किलोटन क्षमतेपेक्षा जास्त अण्वस्त्रे असू शकतात. ही सर्व सामग्री जर युद्धात वापरली गेली तर त्यामुळे स्ट्रॅटोस्फियरमध्ये 47 टीजी काजळी तयार होईल.
अलीकडे, जगभरात विविध जंगलांमधील प्रचंड आगींमुळे स्ट्रॅटोस्फियरमध्ये मोठ्या प्रमाणात काजळी तयार झाल्याचे दिसून आले आहे. स्ट्रॅटोस्फियरमध्ये, ही काजळी सूर्यप्रकाशाने गरम होते आणि नंतर वर जाते. परिणामी, स्ट्रॅटोस्फियरमध्ये तिचे अस्तित्व अधिक कालावधीसाठी राहते. यामुळे शास्त्रज्ञांना अणुयुद्धामुळे निर्माण होणाऱ्या काजळीच्या परिणामांचा अंदाज लावण्यास आणि ‘न्यूक्लिअर विंटर’चे अचूक निदान करण्यास मदत होते. ‘न्यूक्लिअर विंटर’चा अंदाज लावण्यासाठी शास्त्रज्ञांनी भूतकाळातील आणि सध्याच्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचाही अभ्यास केला आहे.
15 जानेवारी 2022 रोजी हुंगा टोंगा ज्वालामुखीच्या उद्रेकाने 61 मेगाटन ऊर्जा सोडली, जी स्फोट झालेल्या सर्वात मोठ्या 50-मेगाटन अणुबॉम्बपेक्षा कितीतरी जास्त आहे. त्याच्या धुम्रवलयातून काजळीपेक्षा वेगळी अशी 146 टीजीपर्यंत पाण्याची वाफ 56 किमी वरच्या स्ट्रॅटोस्फियरमध्ये फेकली गेली, जिथे ती वर्षानुवर्षे राहील आणि पृथ्वीच्या हवामानावर मोठा परिणाम करेल.
रशिया आणि अमेरिका यांच्यात टोकाचे अणूयुद्ध सुरू होईल, असा अंदाज आहे. जर तसं झालं तर 150 टीजी काजळी स्ट्रॅटोस्फियरमध्ये फेकली जाईल.
वातावरणातील बदल
स्ट्रॅटोस्फियरमध्ये फेकली गेलेली काजळी तिथे वर्षानुवर्षे राहू शकते. सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यापासून ही काजळी अटकाव करू शकत असल्याने पृथ्वीतल अधिक थंड पडेल. याशिवाय, स्ट्रॅटोस्फियरचे तापमान उष्ण करेल आणि स्ट्रॅटोस्फियरिक अभिसरण बदलत जाईल. 5 टीजी काजळी जरी असली तरी त्याने तापमान 30 अंशांनी वाढू शकते.
सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांपासून पृथ्वीवरील जीवनाचे संरक्षण करणाऱ्या ओझोनचा थर अतिउष्णतेमुळे नष्ट होईल. 5 टीजी काजळी जर फेकली गेली तर जागतिक स्तरावर ओझोनचा थर 25 टक्क्यांनी कमी होईल, जो पूर्ववत होण्यासाठी किमान 12 वर्षांचा कालावधी लागेल. रशिया-अमेरिका अणुयुद्ध झालेच तर त्यातून निघणाऱ्या 150 टीजीपेक्षा जास्त काजळीमुळे ओझोन थराचा 75 टक्के ऱ्हास होईल.
जमिनीवर होणारे परिणाम
स्ट्रॅटोस्फियरमध्ये फेकल्या गेलेल्या काजळीमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर बदल होतात. ओझोन थर नष्ट झाल्यामुळे जमीन अतिनील किरणांच्या संपर्कात येईल, ज्यामुळे पृथ्वीवरील जीवांचे आरोग्य आणि त्यांचे अन्न स्रोत प्रदूषित होतील.
असा अंदाज वर्तविण्यात आला आहे की, संभाव्य जागतिक अणुयुद्धानंतर, यूव्ही निर्देशांक 35वर येईल आणि तो पुढे 5 वर्षांपर्यंत टिकेल. 11वरील अतिनील निर्देशांकाच्या संपर्कात आल्यास मानवावर त्याचे गंभीर परिणाम होतात, हे लक्षात घ्यायला हवे. शिवाय, वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेला सुद्धा अटकाव होऊ शकतो.
आधी सांगितल्याप्रमाणे जर भारत-पाकिस्तान अणुयुद्ध झाले तर 5 टीजी काजळीदेखील सरासरी जागतिक तापमान एक अंशाने कमी करू शकते आणि हिमयुगानंतरचे सर्वात कमी नोंदवलेले तापमान त्यामुळे निर्माण होऊ शकते.
रशिया-अमेरिका संभाव्य अणुयुद्ध आणि परिणामी स्ट्रॅटोस्फियरमध्ये 150 टीजी काजळी जर टाकली गेली तर, जागतिक स्तरावर तापमानात 8 अंशांची घट होऊ शकते, ज्यामुळे उत्तर गोलार्धात उन्हाळ्यातही अतिशीत परिस्थिती निर्माण होऊ शकते.
तापमानात घट झाल्याने शेतीवर गंभीर परिणाम होईल. पिकांचे हंगाम कमी होतील आणि कायम बर्फामुळे अनेक ठिकाणी लागवड करता येणार नाही, ज्यामुळे जगाला अन्नटंचाईचा सामना करावा लागेल.
पृथ्वीच्या पृष्ठभागावर सौर किरणोत्सर्ग कमी झाल्याने तापमानात घट होऊन पर्जन्यमानावर लक्षणीयरित्या परिणाम होईल. जागतिक पर्जन्यमान लक्षणीय घटेल. 5 टीजी काजळीच्या उत्सर्जनामुळे आशियातील पर्जन्यमान 40 टक्क्यांनी कमी होऊ शकते. यामुळे शेती आणि मानवी जीवनावर गंभीर परिणाम होण्यासोबतच ‘जलयुद्ध’ सुरू होईल.
समुद्राशी निगडीत बदल
संभाव्य अणुयुद्धाचे प्रदीर्घकाळ टिकणारे परिणाम महासागरावर होतील. युद्धाचे स्थान काहीही असो, स्ट्रॅटोस्फियरमध्ये उत्सर्जित झालेली काजळी जागतिक स्तरावर पसरत जाईल. यामुळे महासागरांपर्यंत पोहोचणाऱ्या सौर किरणोत्सर्गाचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे भूभागाच्या तुलनेत गती संथ असली तरी पाणी थंड होण्यास ते कारणीभूत ठरेल.
असा अंदाज आहे की, भारत-पाक अणुयुद्ध झाले तर त्यातून उत्सर्जित होणाऱ्या 47-50 टीजी काजळीमुळे समुद्राचे तापमान 3.5 अंशांनी कमी होईल. अमेरिका-रशिया यांच्यातील संभाव्य अणुयुद्धानंतर अंदाजे 3-4 वर्षांनी ते आणखी 6 अंशांनी कमी होईल.
स्ट्रॅटोस्फियरमधून काजळी साफ झाली तरीही, मूळ तापमानात परत येण्यास जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. आर्क्टिक आणि अंटार्क्टिकावरील बर्फात मोठी वाढ होईल, अनेक बंदरे बर्फाच्छादित होतील, ज्यामुळे जागतिक जहाज वाहतुकीवर परिणाम होईल. अन्न, इंधन आणि औषधे वाहतूक करण्यात अडचण आल्याने मानवी जीवनावर गंभीर परिणाम होईल. ‘लिटल न्यूक्लियर आईस एज’ हे भाकीत प्रत्यक्षात येईल.
समुद्राच्या तापमानात घट झाल्याने महासागरांच्या इकोसिस्टीमचे (परिसंस्था) गंभीर नुकसान होईल आणि मानवी जीवनाला अन्नाचा आधार देण्याची महासागरांची क्षमता लक्षणीयरीत्या कमी होईल. रशिया-अमेरिका संभाव्य अणुयुद्धानंतर, उत्तर गोलार्धातील अन्न म्हणून उपयोगात येणाऱ्या सागरी जीवांमध्ये 40 टक्क्यांपर्यंत घसरण होईल. या कमतरतेमुळे विकसनशील देशांच्या किनारी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होतील.
अन्न उत्पादनावरील परिणाम
कोणतीही शेती ही शेतीपूरक हंगामाचा काळ, प्रकाशाची पातळी, पर्जन्य आणि इतर घटकांवर अवलंबून असते. अणुयुद्ध झालेच तर पुढे अनेक दशके जागतिक स्तरावर या घटकांवर परिणाम होईल.
काजळीचे 5 टीजी उत्सर्जनही आपत्तीजनक ठरणार आहे. परिणामी, जागतिक स्तरावर अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल. पशुधन आणि मासेमारीसुद्धा ही कमतरता भरून काढली जाणार नाही. तसेच जंगलातील उरलेल्या वन्यप्राण्यांची शिकारही करता येणार नाही.
एखाद्या देशाकडे असणारा अन्नधान्याचा साठा संपल्यानंतर, तिथे अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल, कुपोषण वाढेल, परिणामी तापमानात होणारी घट कुपोषित शरीर सहन करू शकणार नाही त्यामुळे रोगराई आणि मृत्यूदरात वाढ होईल.
अन्नधान्य आणि मत्स्यपालनाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी या दोन्ही गोष्टींच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढतील. निर्यातीसाठी अतिरिक्त रक्कम उपलब्ध होऊ न शकल्याने व्यवसायात घट होईल.
अनेक अत्यावश्यक सामग्रीच्या जागतिक पुरवठा साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे आल्याने मानवाच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होईल.
अणुयुद्धात वाचलेल्या माणसांसाठी, त्यानंतर जगणे अत्यंत कठीण होईल; कारण दुष्काळ हा जीवनाचा अविभाज्य भाग असेल. संभाव्य आण्विक युद्धानंतरची पुढची दोन वर्षे, प्रत्येक जिवंत माणसाला उपासमारीचा सामना करावा लागेल आणि असा अंदाज आहे की, जागतिक स्तरावर सुमारे 5-6 अब्ज लोक उपासमारीने मरतील. ही आकडेवारी 27 दशलक्ष लोकांव्यतिरिक्तची आहे, जे प्रादेशिक आण्विक युद्धाच्या अल्प-मुदतीच्या परिणामांमध्ये मृत्युमुखी पडतील किंवा अणुयुद्धाच्या परिणामाने अप्रत्यक्षपणे 360 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला असेल.
आण्विक युद्धात लपायला जागा नाही.
(अनुवाद : आराधना जोशी)