दि. ०६ मार्च: अवजड लष्करी वाहनांची लढाऊ क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने संरक्षण मंत्रालयाने संरक्षण उत्पादनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील तीन कंपन्यांबरोबर परस्पर सामंजस्याचा करार केला आहे. या वाहनांमध्ये पुढच्या पिढीचे (नेक्स्ट जनरेशन) अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांची क्षमता वाढविण्यात येणार आहे.
इतर वाहनांच्या तुलनेत अवजड लष्करी वाहनांना अधिक आव्हानात्मक परीस्थित काम सरावे लागते. त्यामुळे या वाहनांना अधिक कार्यक्षम व आधुनिक इंजिनाची गरज असते. अधिक भारामुळे इंजिनाची इंधनक्षमताही व ज्वलनही मोठ्याप्रमाणात होते. त्याचा वाहनाच्या एकूणच कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे पुढच्या पिढीची व अधिक क्षमतेची वाहने लष्कराला पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला व त्या दृष्टीने संरक्षण मंत्रालयाने संरक्षण उत्पादन करणाऱ्या बीईएमएल लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मिश्र धातू निगम लिमिटेड या तीन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांशी परस्पर सामंजस्याचा करार केला आहे. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्या उपस्थितीत या परस्पर सामंजस्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
या करारान्वये अवजड लष्करी वाहनांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी देशांतर्गत तंत्रद्यानाचा वापर करण्यात येणार आहे. या वाहनांना खडतर भौगोलिक प्रदेशात काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या इंजिन व इंधन क्षमतेवरही परिणाम होत असतो. हे टाळण्यासाठी या वाहनांमध्ये अत्याधुनिक इंजिन तंत्रज्ञान व नियंत्रणप्रणाली पुरविण्यात येणार आहे. या करारामुळे या कंपन्यांना त्यांची इंजिन तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता वाढविता येणार आहे व लढाऊ वाहनांच्या निर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठीही या कंपन्यांना याचा उपयोग करता येणार आहे. आत्मनिर्भर भारत संकल्पनेला चालना देतानाच अत्याधुनिक तंत्रज्ञान देशातच विकसित करण्याची सरकारची वचनबद्धता या कराराच्या माध्यमातून साधली जाणार आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे.
(अनुवाद : विनय चाटी)