‘नेव्हल कमांडर्स कॉन्फरन्स’: सागरी संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी गरजेची
दि. ११ मार्च: नौदलाने सागरी क्षेत्रातील कोणत्याही प्रसंगाला व संघर्षाला सामोरे जाण्यासाठी सज्ज असले पाहिजे, अशी सूचना संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी भारतीय नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली. नुकत्याच झालेल्या ‘नेव्हल कमांडर्स कॉन्फरन्स’च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. दोन टप्प्यात झालेल्या या परिषदेचा समारोप ७ व ८ मार्च रोजी नवी दिल्लीत झाला.
नौदलाच्या तीन दिवसीय द्वैवार्षिक ‘नेव्हल कमांडर्स कॉन्फरन्स’चे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. याचा पहिला टप्पा सागरी क्षेत्रात पार पडला. पहिल्या टप्प्यात भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस विक्रांत’ व ‘आयएनएस विक्रमादित्य’ या दोन विमानवाहू नौकांच्या संयुक्त कारवाईचे प्रात्यक्षिक संरक्षणमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले. परिषदेच्या समारोप सत्रात संरक्षणमंत्र्यांनी भारताची सागरी सुरक्षा व विशेष आर्थिक क्षेत्राची सुरक्षा राखण्यासाठी, तसेच चाचेगिरीविरोधात भारतीय नौदल करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मात्र, कोणत्याही कारवाईसाठी नौदलाने सज्ज राहिले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी नौदल अधिकाऱ्यांना केली. दिल्लीत झालेल्या या टप्प्यात नौदल कारवाई-हालचाली, नौदलासाठी आवश्यक साहित्य, पायाभूत सुविधा, रसद व कर्मचारीविषयक बाबी आदींचा आढावा घेण्यात आला.
नौदलातील वरिष्ठ नेतृत्त्वाने या परिषदेत सागरी क्षेत्रातील समकालीन व भविष्यातील आव्हाने, हिंदी महासागरात असलेल्या भारतीय बेटांची सुरक्षा त्याचबरोबर नौदलाच्या भविष्यातील योजनांचा आढावा या परिषदेत घेतला. संरक्षणमंत्र्यांबरोबरच, संरक्षणदल प्रमुख, लष्करप्रमुख, हवाईदल प्रमुख व नौदलप्रमुखांनी या परिषदेला संबोधित केले.
विनय चाटी