भूतानच्या दोन दिवसाच्या शासकीय दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी जंगी स्वागत करण्यात आले. भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी मोदी यांचे स्वागत करण्यासाठी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये “भूतानमध्ये आपले स्वागत आहे, माझे मोठे भाऊ @narendramodi जी,” असे म्हटले आहे.
पारो विमानतळावर मोदींचे स्वागत करण्यासाठी भूतानचे शेरिंग तोबगे जातीने हजर होते. पारो आंतरराष्ट्रीय विमानतळ ते थिंपूपर्यंतच्या संपूर्ण मार्गावर पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी भारतीय आणि भूतानचे ध्वज फडकत होते.
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही भेट भारत आणि भूतानमधील उच्चस्तरीय देवाणघेवाणीच्या परंपरेशी सुसंगत असून भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट पॉलिसी’वर लक्ष केंद्रित करते. सुरूवातीला पंतप्रधान मोदी 21 आणि 22 मार्चला भूतानला जाणार होते. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, “भूतानमधील पारो विमानतळावरील खराब हवामानामुळे, 21-22 मार्च 2024 रोजी होणारा पंतप्रधान मोदींचा भूतान दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शुक्रवारी मोदी यांचे भूतानला आगमन झाले.
या दोन दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान मोदी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतील. भूतानच्या पंतप्रधानांशीही चर्चा करतील. द्विपक्षीय आणि प्रादेशिक हितसंबंधांवर चर्चा करून परस्पर फायद्यासाठी भागीदारी वाढवण्याचे दोन्ही देशांचे उद्दिष्ट आहे. भारत सरकारच्या सहकार्याने थिम्पू येथे बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक ग्यालत्सुएन जेत्सुन पेमा माता बालक रुग्णालयाचे उद्घाटनही पंतप्रधान करतील. ऐतिहासिकदृष्ट्या, भूतान नेहमीच भारताच्या जवळ आहे. मात्र भारताने त्याच्या परराष्ट्र धोरणात कधीही हस्तक्षेप केलेला नाही.
भूतानचे पंतप्रधान तोबगे मागच्याच आठवड्यात पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा होता. आपल्या दौऱ्यात तोबगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. तसेच अनेक कार्यक्रमात भाग घेतला. तोबगे यांनी उद्योग क्षेत्रातील अनेक नेत्यांच्या बैठकाही घेतल्या.
14 मार्च रोजी पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या भेटीदरम्यान तोगबे यांनी भूतानला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते, जे मोदींनी स्वीकारले.