भारतीय नौदल अकादमीला भेट देऊन घेतली माहिती
दि. ०७ मे: भारतीय सैन्यदलाच्या प्रशिक्षण पद्धतीची माहिती घेण्याच्या उद्देशाने जॉर्डनच्या लष्करी शिष्टमंडळाने भारतीय नौदलाच्या दक्षिण विभाग मुख्यालय आणि एझिमला येथील नौदल अकादमीला सोमवारी भेट दिली, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. जॉर्डनच्या लष्करी शिष्टमंडळाची भारताला दिलेली ही पहिलीच भेट आहे.
जॉर्डनच्या नौदलाचे वरिष्ठ अधिकारी कमांडर हाजेम अल मैताह यांच्या नेतृत्वाखाली जॉर्डन सशस्त्र दलाच्या तीन सदस्यीय प्रशिक्षण शिष्टमंडळाने २९ एप्रिल ते चार मे या कालावधीत नौदलाचे कोची दक्षिण विभाग मुख्यालय आणि एझिमला येथील नौदल अकादमीला भेट दिली. उभय देशांमध्ये गेल्या वर्षी मार्चमध्ये संरक्षण विषयक सहकार्याबाबत सल्लागार मंडळाची दुसरी बैठक आयोजित करण्यात आली होती. या सल्लागार बैठकीत ठरल्याप्रमाणे, लष्करी प्रशिक्षण देवाणघेवाण हा या भेटीचा उद्देश होता. शिष्टमंडळाने नौदलाच्या दक्षिण विभाग मुख्यालयातील व्यावसायिक प्रशिक्षण विद्यालयामधील विविध प्रशिक्षण सुविधांना भेट दिली. विविध सिम्युलेटर्सची ओळख, व्यावसायिक संवाद आणि ‘व्हीबीएसएस’ आणि डायव्हिंग कार्यप्रणालीचे प्रात्यक्षिक आदी प्रात्यक्षिकांचा या भेटीतील ठळक बाबींमध्ये समावेश होता.
जॉर्डनच्या लष्करी शिष्टमंडळासाठी स्वदेशी विमानवाहू जहाज ‘आयएनएस विक्रांत’ आणि ‘कोचीन शिपयार्ड लिमिटेड’ येथील जहाज दुरुस्ती सुविधांचा मार्गदर्शक दौरा देखील आयोजित करण्यात आला होता. या शिष्टमंडळाने भारतीय नौदल आणि जॉर्डन सशस्त्र दल यांच्यातील नौदल प्रशिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील सहभागाच्या दृष्टीने कोमोडोर श्रीतनू गुरू, कोमोडोर प्रशिक्षण, सदर्न नेव्हल कमांड यांच्याशी संवाद साधला.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी