भारताने मंगळवारी BRICS 2026 परिषदेचे अधिकृत बोधचिन्ह (लोगो) आणि वेबसाइटचे अनावरण करत, आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदाची औपचारिक सुरुवात केली. यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आजच्या राजकीय आणि आर्थिक वास्तवाचे प्रतिबिंब उमटवण्यासाठी, जागतिक प्रशासनाच्या पुनर्रचनेची गरज अधोरेखित केली.
नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना जयशंकर म्हणाले की, “हे जग सध्या अनेक आणि परस्परांशी संबंधित विविध आव्हानांचा सामना करत असून, अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि प्रभावी बहुपक्षीय व्यवस्थेची गरज पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे.”
संयुक्त राष्ट्र (UN), जागतिक व्यापार संघटना (WTO), आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकांसारख्या संस्थांनी अधिक जबाबदारीने समकालीन वास्तवाशी सुसंगत प्रतिसाद देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
BRICS 2026 लोगो
BRICS 2026 चा लोगो, भारतीय सांस्कृतिक प्रतीकांवर आधारित आहे. हे बोधचिन्ह भारताचे राष्ट्रीय फूल ‘कमळापासून’ प्रेरित आहे. ही रचना प्रतिकूल परिस्थितीतही लवचिकता आणि वाढीचे प्रतिनिधित्व करते.
चिन्हाच्या केंद्रस्थानी असलेल्या पाकळ्या ‘नमस्ते’ची मुद्रा दर्शवतात, जे सहकार्य, संवाद आणि परस्पर आदराचे प्रतीक आहे. चिन्हाच्या भोवती असलेल्या पाकळ्यांमध्ये ब्रिक्स राष्ट्रांशी संबंधित रंग वापरले आहेत, जे विविध राजकीय व्यवस्था आणि संस्कृतींमधील एकात्मता अधोरेखित करतात.

मंत्री जयशंकर यांनी या रचनेचे वर्णन ‘लोक-प्रथम’ (people-first) दृष्टिकोनाचे प्रतिबिंब म्हणून केले, जे भारताच्या अध्यक्षपदाच्या संकल्पनेशी सुसंगत आहे.
याची मुख्य संकल्पना आहे, “लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्मिती” (Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability) उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील सामूहिक कृती ही सामायिक जागतिक आव्हानांवर व्यावहारिक उपाय देऊ शकते, या भारताच्या विश्वासाला ही संकल्पना अधोरेखित करते.
BRICS वेबसाइट
लोगो सोबतच जयशंकर यांनी ‘BRICS 2026’ च्या अधिकृत वेबसाइटचेही उद्घाटन केले. भारताच्या अध्यक्षपदाच्या संपूर्ण कालावधीत, ही वेबसाईट एक मध्यवर्ती डिजिटल व्यासपीठ म्हणून कार्यरत असेल. समन्वय, पारदर्शकता आणि जनसहभाग सुधारण्याच्या उद्देशाने या साइटवर बैठका, उपक्रम, निष्कर्ष, अधिकृत कागदपत्रे आणि कार्यक्रमांची माहिती दिली जाईल.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही वेबसाइट ब्रिक्सचे सदस्य देश आणि भागीदार देशांमधील संवाद सुव्यवस्थित करण्याच्या आणि संपर्क वाढवण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे.
ब्रिक्सच्या आर्थिक भूमिकेवर प्रकाश टाकताना, मंत्र्यांनी हा ‘न्यू डेव्हलपमेंट बँक’ (NDB) या गटाचा एक महत्त्वाचा विजय असल्याचे सांगितले. पायाभूत सुविधांच्या वित्तपुरवठ्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी, विशेषतः उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी, ही बँक एक महत्त्वाचे माध्यम म्हणून समोर आल्याचे त्यांनी नमूद केले.
भारत ‘NDB’ ला एक विश्वासार्ह, जबाबदार आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत संस्था म्हणून मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी जोडले.
लोककेंद्रित दृष्टीकोन
लोकांमधील परस्पर संवाद (People-to-people engagement) भारताच्या ब्रिक्स अजेंडाच्या केंद्रस्थानी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षपदाच्या काळात तरुण संवाद, सांस्कृतिक सहकार्य, शिक्षण, पर्यटन, क्रीडा आणि शैक्षणिक सहयोग यावर विशेष लक्ष दिले जाईल.
भारत BRICS कडे सार्वभौम समानता आणि परस्पर आदर या तत्त्वांवर आधारित, सकारात्मक आणि सहमतीने चालणारे व्यासपीठ म्हणून पाहतो, जे व्यापक बहुपक्षीय व्यवस्थेची जागा घेण्याऐवजी तिची पूरक भूमिका बजावते, असे ते म्हणाले.
भारताच्या नेतृत्वाच्या दृष्टिकोनाचे वर्णन करताना जयशंकर म्हणाले की, हे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून प्रेरित असलेल्या “मानवता-प्रथम” (humanity-first) या तत्त्वज्ञानावर आधारित आहे.
“भारत आपले अध्यक्षपद मानवता-प्रथम आणि लोककेंद्रित दृष्टिकोनातून स्विकारत आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी नमूद केले की, “ब्रिक्समधील सहकार्यामुळे देशांना विकासातील तफावत, हवामान धोके, आर्थिक अनिश्चितता आणि तांत्रिक बदल संतुलित पद्धतीने हाताळण्यास मदत होईल.”
2026 मध्ये ब्रिक्सला 20 वर्षे पूर्ण होत असताना, जागतिक स्तरावर त्याचा विस्तार लक्षणीयरीत्या वाढला आहे. या गटात आता 11 पूर्णवेळ सदस्य आहेत, जे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात, जागतिक जीडीपीमध्ये सुमारे 40% हिस्सा राखतात आणि जागतिक व्यापारात 25 टक्क्यांहून अधिक वाटा उचलतात.
मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी



























