भारत, आस्ट्रेलिया आणि इंडोनेशियाच्या नौदलांचा सहभाग
दि. १८ मे: भारत, आस्ट्रेलिया आणि इंडोनेशियाच्या नौदलांचा सहभाग असलेल्या दुसऱ्या त्रिपक्षीय सागरी सुरक्षा कार्यशाळेचा भारतीय नौदलाच्या दक्षिण विभागाचे मुख्यालय असलेल्या कोची येथे शुक्रवारी समारोप झाला. ‘हिंदी महासागर क्षेत्र: विभागीय सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी सामायिक प्रयत्न,’ या विषयांतर्गत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
2nd edition of #India–#Australia–#Indonesia Trilateral #MaritimeSecurity Workshop conducted, 15 – 17 May 24, at @IN_Dronacharya, Kochi. The workshop witnessed professional discussions b/n three friendly Navies on challenges being faced in the #IndianOceanRegion & opportunities to… pic.twitter.com/avbA2LK4hI
— SpokespersonNavy (@indiannavy) May 17, 2024
हिंदी महासागर क्षेत्रातील या तीन नौदल सत्ता म्हणविल्या जाणाऱ्या या तीन सागरी शेजाऱ्यांमध्ये सध्या या क्षेत्रात असणारी सागरी आव्हाने आणि संधींबाबत चर्चा करण्यासठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. नौदलाच्या दक्षिण विभाग मुख्यालयाने या कमी पुढाकार घेतला होता. भारतीय नौदलातील रिअर ॲडमिरल निर्भय बापना, ऑस्ट्रेलियाच्या नौदलातील कमोडोर पॉल ओ’ ग्रेडी, इंडोनेशिया नौदलाचे कमोडोर हेरी त्रीविबोवो आणि भारतीय नौदलाच्या परकी सहकार्य विभागाचे प्रमुख कमोडोर मनमीत खुराना यांनी या कार्यशाळेचे संयुक्त अध्यक्षपद भूषविले.
या कार्यशाळेत हिंदी महासागर क्षेत्रासंबंधी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात या क्षेत्रात असणारी आव्हाने आणि संधी, माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी उभारण्याची यंत्रणा, या यंत्रणेची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक उपाय, सागरी क्षेत्राबाबत जागरूकता, या क्षेत्रात सुरु असलेल्या अपारंपरिक आणि गैर सागरी कारवाया, सागरी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, क्षमताबांधणी आणि क्षमतावृद्धी, परस्पर सहकार्य आणि आंतरपरिचालन वाढविण्यासाठीचे उपाय या बाबींवर चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत नौदलाच्या दक्षिण विभाग मुख्यालयाचे ‘चिफ ऑफ स्टाफ’ रिअर ॲडमिरल उपल कुंडू व दक्षिण विभाग मुख्यालयाचे सागरी प्रशिक्षण विभागाचे प्रमुख रिअर ॲडमिरल सुशील मेनन यांचीही भाषणे झाली. या कार्यशाळेनंतर ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियाच्या नौदलातील प्रतिनिधींनी नौदलाच्या प्रशिक्षण सुविधा आणि कोचीन शिपयार्डला भेट दिली.
विनय चाटी