येमेनमधील हौती बंडखोरांचा दावा: येमेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कारवाई
दि. ३१ मे: लाल समुद्रात अमेरिकेच्या यूएसएस आयसेनहॉवर या विमानवाहू नौकेवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा येमेनमधील हौती बंडखोरांनी केला आहे. अमेरिका आणि ब्रिटनने येमेनवर केलेल्या झाल्याचा निषेध म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे हौती बंडखोरांच्या लष्कराचा प्रवक्ता याह्या सारी याने म्हटले आहे.
अमेरिका आणि ब्रिटिश नौदलाने येमेनमधील होदेइदाह प्रांतातील सालीफ हे बंदर आणि अल-हव्क जिल्ह्यातील आकाशवाणी केंद्र घालीफा येथील हौती बंडखोरांची छावणी आदी लक्ष्यांवर सहा हल्ले चढविले होते. या हल्ल्यांत १६ येमेनी नागरिकांचा बळी गेला होता. तसेच, ४१ येमेनी या हल्ल्यात जखमी झाले होते. या दोन्ही देशांनी केलेल्या हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी लाल समुद्रात असलेल्या अमेरिकी नौदलाच्या यूएसएस आयसेनहॉवर या विमानवाहू नौकेवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा याह्या सारी याने दूरचित्रवाणीवरून दिलेल्या मुलाखतीत केला आहे. ‘लाल समुद्रातील जहाज वाहतूक सुरळीत सुरु राहावी आणि हौती बंडखोरांना ती विस्कळीत करण्याची संधी मिळू नये, यासाठी त्यांच्या येमेनमधील छावण्यांवर हल्ला केल्याचे अमेरिका आणि ब्रिटनने गुरुवारी म्हटले होते. हौतींच्या ताब्यातील येमेनच्या भागातील १३ ठिकाणांवर अमेरिका आणि ब्रिटिश फौजांनी हल्ला केल्याचे अमेरिकी लष्कराच्या मध्य विभाग मुख्यालयाने (सेंटकॉम) म्हटले होते.
‘अमेरिकी आणि ब्रिटिश फौजांनी संयुक्तपणे हौती बंडखोरांच्या ताब्यातील येमेनच्या भागात असलेल्या होदेइदाह शहरावर हल्ला चढविला. या शहरात हौतींची ड्रोन आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा साठा होता. हा हल्ला करताना काटेकोर नियोजन करण्यात आले होते आणि सामान्य नागरिकांचे कमीतकमी नुकसान होईल, याची काळजी घेण्यात आली होती,’ असे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. नागरिक आणि नागरी सुविधा यांना या हल्ल्याचा फटका बसू नये आणि कमीतकमी नुकसान व्हावे, या साठी रात्रीच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला, असेही ब्रिटिश संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. ‘हौती बंडखोरांनी गाझामधील संघर्षात पॅलेस्टाईन आणि हमासला पाठींबा दिल्यामुळे चिडून अमेरिका आणि ब्रिटनने येमेनला धडा शिकविण्यासाठी हे ‘क्रूर आक्रमण’ केले आहे,’ असे हौती प्रवक्ता मोहंमद अब्देल्सलाम याने म्हटले आहे.
येमेनमधील हौती बंडखोरांचा पाठीराखा असलेल्या इराणने अमेरिका आणि ब्रिटनने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘अमेरिका आणि ब्रिटनने केलेला हा हल्ला येमेनच्या सार्वोभौमत्त्वाचे आणि क्षेत्रीय अखंडतेचे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कायदे व मानवाधिकाराचे उल्लंघन आहे,’ असे इराणने म्हटल्याचे इराणी माध्यमातील वृत्तांत म्हटले आहे. येमेनी नागरिकांच्या विरोधात केलेल्या या गुन्ह्याचे परिणाम अमेरिका आणि ब्रिटनला भोगावे लागतील आणि त्यासाठी तेच जबाबदार असतील, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासर कानांनी यांनी म्हटले आहे. गाझामधील संघर्षात पॅलेस्टाईन आणि हमासला पाठींबा देण्यासाठी गेल्या नोव्हेंबरपासून हौती बंडखोरांनी लाल समुद्रातील व्यापारी मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर हल्ले सुरु केले आहेत. त्यामुळे या जहाजांना संरक्षण देण्यासाठी अमेरिका आणि दोस्त राष्ट्रांनी हौतींच्या विरोधात मोहीम उघडली आहे.
विनय चाटी
(रॉयटर्स ‘इनपुट्स’सह)