पुतीन यांच्या आगामी उत्तर कोरिया दौऱ्यामुळे उभय देशांमधील लष्करी संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. मात्र हा दौरा म्हणजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे उल्लंघन आहे, असा इशारा दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे.
दक्षिण कोरियाचे उपविदेश मंत्री किम हाँग-क्यून यांनी अमेरिकेचे उपसचिव कर्ट कॅम्पबेल यांना सांगितले की पुतीन यांच्या भेटीमुळे उत्तर कोरिया आणि रशिया यांच्यात अधिक लष्करी सहकार्य होऊ नये. किम यांना वाटणाऱ्या चिंतेचा पुनरुच्चार करत, कॅम्पबेल यांनी संभाव्य प्रादेशिक अस्थिरता आणि या दौऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अमेरिका निरंतर सहकार्य करेल असे वचन दिले आहे.
पुतीन येत्या काही दिवसांत उत्तर कोरियाला भेट देण्याची अपेक्षा आहे, असे सेऊलने बुधवारी सांगितले. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी गुरुवारी या संभाव्य भेटीची तारीख किंवा अजेंडा उघड करण्यास नकार दिला. मात्र उत्तर कोरियाबरोबर जवळचे संबंध विकसित करण्याचा रशियाचा अधिकार कोणासाठीही संशयास्पद किंवा भीतीचे कारण बनू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर कोरियाचे उपविदेश मंत्री किम सोन ग्योंग यांनी राज्य माध्यमांद्वारे निवेदन जारी केले. उत्तर कोरियाची प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने अमेरिका गंभीर राजकीय चिथावणी देत असल्याचा आरोप त्यांनी या निवेदनात केला आहे. मानवाधिकारांच्या परिस्थितीवर अमेरिका या आठवड्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक घेणार आहे.
अमेरिका, दक्षिण कोरिया आणि युक्रेन येथील अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियाने युक्रेनमधील लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी उत्तर कोरियाने निर्माण केलेली क्षेपणास्त्रे आणि तोफगोळ्यांचा वापर केला आहे.
उत्तर कोरिया आणि रशियाने शस्त्रास्त्रांचे सौदे झाल्याचे नाकारले आहे, पण इतर सर्व मुद्द्यांवर सहकार्य अधिक दृढ करण्याचे वचन दिले आहे.
बुधवारी वॉशिंग्टनमधील स्टिम्सन सेंटर थिंक टँकमध्ये बोलताना कॅम्पबेल म्हणाले की, उत्तर कोरियाने रशियाला कोणत्या गोष्टी दिल्या आहे याची अमेरिकेला चांगलीच जाणीव आहे. या गोष्टींचा “युद्धभूमीवर लक्षणीय परिणाम” झाला आहे.
अश्विन अहमद
(रॉयटर्स इनपुट्ससह)