पंतप्रधान अन्वर इब्राहीम यांची चिनी माध्यमांना माहिती
दि. १८ जून: ‘ब्रिक्स’ समूहात समाविष्ट होण्यासाठी मलेशिया उत्सुक असून, त्यासाठी तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहीम यांनी ‘गुआन चा’ या चिनी प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. ‘ब्रिक्स’ हा वेगाने जागतिक अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येत असलेल्या देशांचा समूह असून, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे या समूहाचे संस्थापक देश आहेत. या देशांच्या नावांच्या अद्याक्षरावरून या समूहाचे ‘ब्रिक्स’ असे नामकरण करण्यात आले आहे.
पाश्चिमात्य देशांच्या प्रभावाखाली असणाऱ्या जागतिक व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी ‘ब्रिक्स’ समूहाची स्थापना केली होती. गेल्या वर्षीपासून ‘ब्रिक्स’ने आपली सदस्यसंख्या वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार गेल्या वर्षी सौदी अरेबिया, इराण, इथिओपिया, इजिप्त, अर्जेन्टिना आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना ‘ब्रिक्स’चे सदस्यत्त्व देण्यात आले. इतरही ४० देश या समूहाचे सदस्य होण्यासाठी इच्छुक आहेत. ‘ब्रिक्स’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही घेतला असून, त्या बाबतची अधिकृत कार्यवाही लवकरच सुरु करण्यात येईल. दक्षिण आफ्रिकेत सध्या निवडणूक सुरु असून, त्याच्या निकालाची आणि तेथील सरकारच्या स्थापनेची आम्ही वात पाहत आहोत, असे अन्वर यांनी ‘गुआन चा’ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. या बाबतची चित्रफित ‘गुआन चा’कडून रविवारी प्रसिद्धीला देण्यात आली होती.
अन्वर यांनी या मुलाखतीदरम्यान या बाबतचे इतर तपशील सांगितले नाहीत किंवा या सदस्यात्त्वासाठी अर्ज करण्याची काय पद्धत आहे, याबद्दलही त्यांनी काही माहिती दिली नाही. मात्र, अन्वर यांच्या कार्यालयातील प्रतिनिधीने मंगळवारी या बाबतची पुष्टी केली. मलेशिया आणि चीन यांच्यात राजकीय संबंध स्थापन होऊन ५० वशे पूर्ण झाली. या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चीनचे पंतप्रधान ली शियांग येत्या आठवड्यात मलेशियाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अन्वर यांची मुलाखत महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीदरम्यान चीन आणि मलेशियात अनेक द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’वरून)