संरक्षण मंत्रालयाने नवी दिल्ली येथे नुकत्याच आयोजित केलेल्या ‘संरक्षण क्षेत्रात आर्टिफिल इंटेलिजन्स’ या विषयावरील पहिल्या परिसंवादाचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी 75 आर्टिफिशल इंटेलिजन्सशी (AI) निगडीत उत्पादने तसेच तंत्रज्ञानही त्यांनी लाँच केले. सेवादले, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम, आयडेक्स (iDEX) स्टार्ट-अप्स आणि खासगी उद्योगांनी गेल्या चार वर्षांत एआय क्षेत्रात केलेले सामूहिक प्रयत्न दर्शवणाऱ्या या 75 उत्पादनांची सविस्तर माहिती असलेल्या पुस्तकाची आवृत्ती तसेच ई-आवृत्ती संरक्षणमंत्र्यांनी प्रकाशित केली.
प्रत्येक देशाने स्वतःचे संरक्षण आणि सुरक्षेची तरतूद करतानाच मानवता आणि जगाचा देखील विचार करण्याची गरज आहे, यावर संरक्षणमंत्र्यांनी भर दिला. राजनाथ सिंह म्हणाले की, आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI) हे मानवतेच्या विकासातील एक क्रांतिकारी पाऊल आहे. मानवाने केवळ ज्ञानाची निर्मिती, पुनर्निर्मिती केली नाही तर ज्ञान निर्माण करणारी बुद्धी विकसित केली जात आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सने आज जवळपास प्रत्येक क्षेत्रात शिरकाव केला आहे. यात संरक्षण, आरोग्य आणि वैद्यकशास्त्र, कृषी, व्यापार आणि वाणिज्य तसेच वाहतूक यांचाही समावेश आहे. मानवी सदसद्विवेकबुद्धी आणि एआयची क्षमता, यांच्यातील समन्वय वाढावा ज्यातून या क्षेत्रात काही आमूलाग्र बदल घडवता येतील. यासाठी संरक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांच्या समाज कल्याण आणि राष्ट्रीय सुरक्षा यासाठी तसेच भारताला ‘आर्टिफिशल इंटेलिजन्सचे जागतिक केंद्र’ बनविण्यासाठी एआय आधारित व एआयने नियंत्रित होणारी प्रणाली विकसित करण्याच्या दृष्टिकोनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. भारत लवकरच आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रातील आघाडीच्या देशांपैकी एक देश असेल, अशी अशा त्यांनी व्यक्त केली.
जेव्हा एखाद्या नव्या तंत्रज्ञानाची सुरुवात केली जाते, तेव्हा त्याचा स्वीकार करण्यास समाजाला थोडा वेळ लागतो. या संक्रमण काळात, कधीकधी एखादी आव्हानात्मक स्थिती देखील निर्माण होते. हे ध्यानी घेऊन, आपल्याला आगामी काळात निर्माण होऊ शकणाऱ्या कोणत्याही कायदेशीर, नैतिक, राजकीय तसेच आर्थिक आव्हानांचा सामना करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे सांगून राजनाथ सिंह म्हणाले, आर्टिफिशल इंटेलिजन्स हे मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणणारे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाच्या भविष्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहायला पाहिजे; पण त्याचबरोबर सर्व बाबतीत सुसज्ज देखील असायला हवे. आपण या एआय तंत्रज्ञानाचा वापर मानवतेच्या कल्याणासाठी केला पाहिजे. या तंत्रज्ञानाचा वापर लोकशाही पद्धतीनेच होईल, या दृष्टीने आपण कार्य केले पाहिजे.
आम्ही मानवरहित विमाने तसेच अन्य तत्सम उपकरणांत एआयचा वापर सुरू केला आहे. या दिशेने पुढे जाण्याची गरज आहे, जेणेकरून स्वयंचलित शस्त्रप्रणाली विकसित केली जाऊ शकेल. एआय आणि बिग डेटा यासारख्या तंत्रज्ञानाचा संरक्षण क्षेत्रात वेळेत वापर करणे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. जेणेकरून आपण तांत्रिकदृष्ट्या मागे राहणार नाही आणि आपल्या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा कमाल उपयोग करून घेऊ शकू, असे राजनाथ सिंह म्हणाले.
“रशिया हा तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्यंत पुढारलेला देश असून तो विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सतत प्रगती करत आहे. एआय तंत्रज्ञानाविषयी बोलताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले होते की, ‘या क्षेत्रात जो देश आघाडी घेईल तो जगावर राज्य करेल.’ भारताचा ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजे संपूर्ण जग हे एक मोठे कुटुंब आहे, या उक्तीवर अढळ विश्वास असला आणि जगावर सत्ता गाजवण्याचा कोणताही हेतू नसला तरीही, आपण आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञान क्षेत्रातील क्षमता विकसित करण्याची गरज आहे. जेणेकरून कोणताही देश आपल्यावर सत्ता गाजविण्याचा विचारदेखील मनात आणू शकणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
संरक्षण सेवांमध्ये एआय तंत्रज्ञानाशी संबंधित उपकरणांचा जलद गतीने वापर वाढवा, यासाठी उद्योगजगताशी अनेक सामंजस्य करार करण्यात आले आहेत, असे सांगून संरक्षणमंत्री म्हणाले की, संरक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी अभिनव कल्पना (iDEX) या उपक्रमाअंतर्गत आर्टिफिशल इंटेलिजन्स संबंधित अनेक आव्हानात्मक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. उद्योग आणि स्टार्ट अप्स क्षेत्रांनी नवनवे मार्ग शोधून काढावेत आणि सरकारसोबत खांद्याला खांदा लावून काम करत, एआय क्षेत्रात संपूर्ण आत्मनिर्भरता येईल यावर भर द्यावा, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले.
देशाच्या संरक्षण क्षेत्राला मजबूत करण्यात शिक्षण क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, असे सांगून संरक्षणमंत्री म्हणाले की, एआय क्षेत्रात अत्याधुनिक संशोधन करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाचे संशोधन कार्याशी संबंधित फोरम, डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, संरक्षण क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक उपक्रमांकडून विविध संस्थांना पाठबळ पुरवले जात आहे. तंत्रज्ञानविषयक विकास निधी प्रकल्प आणि ‘डेअर टू ड्रीम’ स्पर्धांच्या माध्यमातून आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रात नवी भरारी घेण्यासाठी डीआरडीओ प्रयत्नशील आहे. देशभरात सध्या अनेक संरक्षण-उद्योग-शिक्षण यांच्याशी संबंधित उत्कृष्टता केंद्रांची स्थापना झाली आहे आणि त्यांच्यापैकी अनेक संस्थांमध्ये एआय या विषयाला विशेष महत्त्व दिले जात आहे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
आपल्या देशात वैज्ञानिक तसेच तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षण घेतलेल्या आणि देशाच्या उभारणीमध्ये योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या नवोन्मेषी विचारांच्या तरुणांचे प्रमाण मुबलक आहे. अशा परिस्थितीत, आगामी काळात आपल्या देशाच्या तसेच जगाच्या तंत्रज्ञानविषयक गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने नक्कीच प्रगती करू शकू. संरक्षण दलांसाठी भविष्यकालीन तंत्रज्ञान विकसित करणे हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील संस्थांचे मुख्य कार्य असले तरी, या प्रक्रियेतून निर्माण होणारे अतिरिक्त फायदे सामान्य नागरिकांसाठी देखील उपलब्ध करून दिले जातील, असे त्यांनी नमूद केले.
सन 2025पर्यंत 35,000 कोटी रुपयांची संरक्षण सामग्री निर्यात करण्याच्या आणि देशांतर्गत उद्योगाला चालना देण्याच्या संरक्षण मंत्रालयाच्या उद्दिष्टानुसार, गेल्या काही वर्षांत सर्वाधिक संरक्षण सामग्री निर्यात साध्य केल्याबद्दल, सार्वजनिक क्षेत्रातील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि खासगी क्षेत्रातील इंडो-एमआयएम यांना ‘रक्षा निर्यात रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता पर्यायांवर उज्ज्वल आणि नाविन्यपूर्ण कल्पना मिळविण्यासाठी आयोजित केलेल्या ‘जेननेक्स्ट एआय सोल्यूशन्स’ स्पर्धेतील पहिल्या तीन विद्यार्थ्यांना संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. संरक्षण क्षेत्रातील एआय क्षेत्रात नवीन कल्पनांना चालना देण्यासाठी, सेवा, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्या सक्रिय सहभागाने तीन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. नवोदितांना त्यांच्या क्षमता, उत्पादने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदर्शित करण्याची अनोखी संधी देणारे एक प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते.
संरक्षणमंत्र्यांनी लाँच केलेल्या उत्पादने तसेच तंत्रज्ञानामध्ये एआय प्लॅटफॉर्म ऑटोमेशन, स्वयंचलित, मानवरहित, रोबोटिक्स प्रणाली; ब्लॉक चेन-आधारित ऑटोमेशन; कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन, कॉम्प्युटर आणि इंटेलिजन्स, देखरेख आणि टेहळणी; सायबर सुरक्षा; मानवी वर्तणूक विश्लेषण; इंटेलिजेंट मॉनिटरिंग सिस्टम; लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन, ऑपरेशनल डेटा अॅनालिटिक्स; सिम्युलेटर/चाचणी उपकरणे आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगच्या माध्यमातून आवाजाचे विश्लेषण यांचा यात समावेश आहे.
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी, हवाई दलाचे व्हाइस एअर मार्शल संदीप सिंग, संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी, परदेशातील राजदूत, संशोधन आणि शैक्षणिक संस्था तसेच उद्योग समूहांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
(संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकावर आधारित हा लेख आहे)