भारतविरोधी वक्तव्यासाठी राईट-वींगच्या खासदाराने माफी मागावी: अल्बानीज

0

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी, एका उजव्या विचारसरणीच्या विरोधी खासदाराला त्यांनी केलेल्या भारतविरोधी वक्तव्याप्रकरणी माफी मागण्याचे आवाहन केले. “भारतीय स्थलांतर (Indian migration) देशासाठी ‘असुविधाजनक’ आहे,” असा दावा सदर खासदाराने केला होता.

मध्य-उजव्या विचारसरणीच्या एका लिबरल पार्टीच्या सिनेटर- जॅसिंटा नामपिजिनपा प्राईस, यांनी ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या अल्पसंख्याक गटांपैकी एक असलेल्या भारतीयांबद्दल ही टिप्पणी केली. देशभरात झालेल्या मायग्रंट्स विरोधी निदर्शनांनंतर त्यांनी हे वक्तव्य केले. या निदर्शनांमध्ये, देशातील राहणीमानाचा वाढलेल्या खर्चायासाठी, अंशतः भारतीयांना दोष देण्यात आला होता.

गेल्या आठवड्यात, प्राईस यांनी एका रेडिओ मुलाखतीत असे सुचवले होते की, “अल्बानीज यांच्या मध्य-डाव्या विचारसरणीच्या लेबर पार्टीला मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीयांना ऑस्ट्रेलियात स्थलांतर करण्याची परवानगी दिली गेली आहे.”

भारतीय समुदायाची देशातील वाढती संख्या हे चिंतेचे कारण आहे, आपण पाहू शकतो की हा समुदाय लेबर पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान करतो आहे,” असे प्राईस म्हणाल्या होत्या.

त्यांच्या या टिप्पणीमुळे ऑस्ट्रेलियन-भारतीय समुदायात संताप निर्माण झाला, ज्यामुळे त्यांच्या स्वतःच्या पक्षातूनही माफीची मागणी करण्यात आली आहे.

“भारतीय समुदायातील लोकांना या टिप्पणीमुळे त्रास झाला आहे,” असे पंतप्रधान अल्बानीज यांनी, मंगळवारी राज्य प्रसारक वाहिनी ABCला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

“प्राईस यांनी केलेली टिप्पणी योग्य नाही, त्यामुळे त्यांनी याबद्दल माफी मागायला हवी, त्यांचे स्वतःचे सहकारीही हेच सांगत आहेत,” असे अल्बानीज म्हणाले.

वेगाने वाढणारा भारतीय समुदाय

सरकारी आकडेवारीनुसार, 2023 मध्ये 8,45,800 भारतीय वंशाचे लोक ऑस्ट्रेलियात राहत होते, जे गेल्या दहा वर्षांत दुप्पट झाले आहे. ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या आणखी लाखो लोकांचा दावा आहे की, काही प्रमाणात त्यांची पार्श्वभूमी भारतीय वंशाची आहे.

मंगळवारी, न्यू साउथ वेल्सच्या राज्य सरकारने समुदाय गटांची एक बैठक आयोजित केली होती, ज्यात वाढत्या ऑस्ट्रेलियन-भारतीयांप्रतीच्या विरोधी भावनांवर चर्चा करण्यात आली.

“आज आम्ही ऑस्ट्रेलियन-भारतीय समुदायासोबत एकत्र उभे आहोत आणि हे स्पष्टपणे सांगतो की- गेल्या काही आठवड्यांमध्ये आम्ही ज्या प्रकारची वर्णद्वेषी वक्तव्ये आणि फूट पाडणारे खोटे दावे पाहिले आहेत, त्यांना आपल्या राज्यात किंवा देशात स्थान नाही,” असे एनएसडब्ल्यूचे प्रीमियर ख्रिस मिन्स म्हणाले.

गेल्या आठवड्यात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, “निदर्शनांनंतर वाढलेल्या भारत-विरोधी भावनांबद्दल चर्चा करण्यासाठी ते कॅनबेरासोबत संपर्क साधत आहेत.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleपूर्व युक्रेनमधील पेन्शन केंद्रावर रशियाचा हवाई हल्ला, 23 जणांचा मृत्यू
Next articleभारत आणि युरोपियन युनियन(EU)ची, व्यापार कराराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here