भारतापाठोपाठ आता जपानमध्ये, ब्रिटनच्या F-35B जेटचे आपत्कालीन लँडिंग

0

तांत्रिक बिघाडामुळे, भारताच्या केरळ येथे अडकून पडलेल्या F-35B फायटर जेटने, काही आठवड्यांपूर्वीच यशस्वी उड्डाण केले. मात्र, त्यापाठोपाठ आता ब्रिटनच्या आणखी एका  F-35B स्टेल्थ फायटर जेटचे, जपानमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

जपानमधील क्योडो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, ‘तांत्रिक बिघाडामुळे यूकेच्या एका F-35B जेटचे, दक्षिण-पश्चिम जपानमधील कागोशिमा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.’

ही घटना, रविवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे धावपट्टी काही काळासाठी बंद करण्यात आली होती, ज्यामुळे साधारण 20 मिनिटांकरता व्यावसायिक उड्डाणे आणि आगमन यात अडथळा निर्माण झाला. सुदैवाने या घटनेत कोणही जखमी झाले नाही.

हे जेट विमान, यूकेच्या एक विमानवाहू युद्धनौकेच्या स्ट्राइक ग्रुपचा भाग असून, ते जपानच्या मेरीटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्स आणि अमेरिकन सैन्याबरोबर संयुक्त लष्करी सरावात भाग घेत आहे. हा सराव 4 ऑगस्टपासून सुरू झाला असून, तो पुढील मंगळवारपर्यंत चालणार आहे.

केरळमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती?

अलीकडच्या महिन्यांत यूकेच्या F-35B फायटर जेटच्या आपत्कालीन लँडिंगची ही दुसरी नोंद आहे.

याआधी 14 जून रोजी, यूकेच्या HMS प्रिन्स ऑफ वेल्स विमानवाहू युद्धनौकेवरील F-35B जेटने, हायड्रॉलिक सिस्टम बिघाडामुळे केरळच्या तिरुवनंतपुरम येथे आपत्कालीन लँडिंग केले होते.

सरावाच्या नियमित उड्डाणादरम्यान हे विमान, त्याच्या युद्धनौकेवर परत जाऊ शकले नाही आणि तिरुवनंतपुरम विमानतळावर उतरवले गेले, जे आपत्कालीन पुनर्प्राप्ती स्थान म्हणून नामांकित आहे. भारतीय वायुसेनेने विमानात इंधन भरून देण्यापासून ते अन्य ग्राउंड सहाय्यासह संपूर्ण मदत केली.

जवळपास पाच आठवडे, केरळच्या विमानतळावर उभे असलेल्या F-35B जेटने, संपूर्ण दुरुस्तीनंतर 22 जुलै रोजी यशस्वी उड्डाण केले. ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाने भारत सरकार आणि विमानतळ अधिकाऱ्यांचे या सहकार्याबद्दल आभार मानले.

ब्रिटिश उच्चायुक्तालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही भारतीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या मदतीबद्दल अत्यंत आभारी आहोत. आम्ही भारतासोबतची संरक्षण भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी उत्सुक आहोत.”

स्पर्धक देशांकडून टीका

जपानमधील आपत्कालीन लँडिंगकडे चीन आणि रशियाच्या सरकारी माध्यमांनी विशेष लक्ष दिले आहे.

“ब्रिटिश F-35 पुन्हा एकदा आपत्कालीन लँडिंग करते. भारतात एक जेट अडकले होते आणि काही आठवड्यांतच आणखी एक जेट जपानच्या कागोशिमा विमानतळावर उतरवावे लागले. ब्रिटिश जेट्स आपत्कालीन लँडिंग गोळा करत आहेत की काय…” अशी टीका रशियाच्या स्पुतनिक इंडियाने X द्वारे केली आहे.

चीनच्या सरकारी ग्लोबल टाइम्सने अधिक तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “या सततच्या बिघाडांमुळे F-35B जेटची अत्यंत क्लिष्ट प्रणाली आणि अधिक देखभालीची गरज, दोन्ही अधोरेखित होते.”

चिनी विमानतंत्रज्ञान तज्ञ वांग यानान, यांच्या हवाल्याने ग्लोबल टाइम्सने सुचवले की, “इतक्या दूरवरच्या मोहिमांमध्ये यूकेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना या अडचणी हाताळणे अवघड जात आहे.”

F-35B हे लॉकहीड मार्टिनने विकसित केलेले अत्याधुनिक स्टेल्थ फायटर जेट असून, त्यामध्ये कमी लांबीच्या धावपट्ट्यांवरून उड्डाण करण्याची आणि थेट उभे लँडिंग करण्याची क्षमता आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleचीनचा भारतीय महासागर क्षेत्रातील प्रभाव वाढतो आहे: संसदीय समिती
Next articleहिंदी महासागरात चीनचे ‘संशोधन शस्त्रीकरण’, भारताने काय करणे अपेक्षित?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here