लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांचा यूएई दौरा संपन्न, संरक्षण सहकार्यावर भर

0

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, यांनी मंगळवारी ‘युएई नॅशनल डिफेन्स कॉलेज’च्या (NDC) अधिकाऱ्यांना संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी विकसित होत असलेल्या जागतिक सुरक्षा भूप्रदेशावर आणि आधुनिक संघर्षांच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकला, आणि आधुनिक युद्धशास्त्रात तंत्रज्ञानाच्या गरजेवरही भर दिला, असे भारतीय लष्कराने ‘X’ वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

जनरल द्विवेदी यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या नेतृत्व क्षमतेवर विशेष भर दिला. तसेच भारत, युएई आणि इतर प्रादेशिक देशांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. परस्पर लष्करी सहकार्य आणि मजबूत संरक्षण आपल्या प्रदेशासह संपूर्ण जगात शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लष्करप्रमुखांनी सोमवारी, संयुक्त अरब अमिराती (युएई) भूदलाचे कमांडर मेजर जनरल युसूफ मायूफ सईद अल हल्लामी यांच्याशी व्यापक चर्चा केली, ज्यामध्ये द्विपक्षीय लष्करी सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.

जनरल द्विवेदी हे दोन देशांचा दौरा करणार असून, पहिल्या टप्प्यात त्यांनी युएईचा दोन दिवसीय दौरा पूर्ण केला. 5 आणि 6 जानेवारीचा युएई दौरा आटोपल्यानंतर, आता दुसऱ्या टप्प्यात ते श्रीलंकेचा दौरा करतील.

लष्करप्रमुखांचा हा युएई दौरा, आखाती प्रदेशात वेगाने घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर होत आहे, ज्यामध्ये येमेनमधील परिस्थितीवरून युएई आणि सौदी अरेबिया यांच्यातील वाढत्या तणावाचा समावेश आहे.

भारतीय लष्कराने सोशल मीडियाद्वारे सांगितले की, ‘द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढीचा’ मुद्दा हा दोन्ही प्रमुखांमधील चर्चेच्या केंद्रस्थानी होता. यावेळी सकारात्मक लष्करी सहभाग वाढवणे, प्रशिक्षणातील समन्वय सुधारणे तसेच भारत आणि युएईमधील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य पुढे नेणे, या विषयांवर भर देण्यात आला.

तत्कालीन लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी डिसेंबर 2020 मध्ये केलेल्या युएई दौऱ्यानंतर, भारत आणि युएईमधील लष्करी सहकार्याला मोठी गती मिळाली. भारतीय लष्करप्रमुखांची ही पहिलीच युएई भेट होती. जनरल द्विवेदी यांचा हा युएई दौरा, गल्फ देशाच्या प्रेसिडेंशियल गार्डचे कमांडर मेजर जनरल अली सैफ हुैद अलकाबी यांनी भारताला भेट दिल्यानंतर काही आठवड्यांतच होत आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleLt Gen SK Sinha: The Army Chief India Never Had
Next articleइराणमधील आंदोलनांत किमान 25 जण ठार; मानवाधिकार संघटनांचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here