फेब्रुवारी 2026 मध्ये निवडणुका होणार: उठावाच्या वर्षदिनी युनूस यांची घोषणा

0

बांगलादेशचे अंतरिम नेते मुहम्मद युनूस यांनी मंगळवारी घोषणा केली की, गेल्या वर्षी झालेल्या जनआंदोलनानंतर बांगलादेशात फेब्रुवारी 2026 मध्ये राष्ट्रीय निवडणुका होतील. तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांचे दीर्घकालीन सरकार उलथवून टाकणाऱ्या या जनआंदोलनानंतर ही देशातील पहिली निवडणूक असेल.

1971 मध्ये पाकिस्तानपासून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक बांगलादेशी लोक ज्या जनआंदोलनाला “दुसरी मुक्ती” मानतात, त्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ढाका येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये ही घोषणा करण्यात आली.

बांगलादेशच्या राजधानीत दिवसभर रॅली, संगीत कार्यक्रम आणि प्रार्थना मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्राला संबोधित करताना, काळजीवाहू प्रशासनाचे नेतृत्व करणारे ८५ वर्षीय नोबेल शांतता पुरस्कार विजेते युनूस म्हणाले की, फेब्रुवारीमध्ये पवित्र रमजान महिना सुरू होण्यापूर्वी निवडणुकांचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी ते मुख्य निवडणूक आयुक्तांना औपचारिक विनंती करतील.

“अंतरिम सरकारच्या वतीने, मी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून रमजानपूर्वी निवडणुका घेण्याची विनंती करेन,” असे युनूस यांनी “ऐतिहासिक दिवस” म्हणून राष्ट्रीय स्तरावर प्रसारित केलेल्या भाषणात सांगितले.

सत्ता हस्तांतरण

निवडून आलेल्या नेतृत्वाने सत्ता हाती घेतल्यानंतर आपण सत्ता सोडू याचा पुनरुच्चार काळजीवाहू सरकारमध्ये मुख्य सल्लागारपद भूषवणारे युनूस यांनी केला.

“आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या प्रकरणात प्रवेश करणार आहोत: लोकांनी निवडून दिलेल्या सरकारकडे शांततापूर्ण मार्गाने सत्ता हस्तांतरण,” असे त्यांनी जाहीर केले.

यापूर्वी एप्रिलमध्ये निवडणुकांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र प्रमुख राजकीय पक्ष आणि नागरी समाज गटांकडून वाढत्या दबावामुळे अंतरिम नेतृत्वाला वेळापत्रक दोन महिने आधी आणण्यास भाग पाडले गेले.

रमजानपूर्वी मतदान घेतल्याने 17 कोटी मुस्लिम बहुल देशात अधिकाधिक सहभाग सुनिश्चित होण्यास मदत होईल, असे युनूस म्हणाले.

राष्ट्रीय एकता आणि पाठिंब्याचे आवाहन करत, युनूस यांनी नागरिकांना हस्तांतरण प्रक्रियेच्या यशासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.

“निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि आनंदी वातावरणात व्हाव्यात यासाठी आपण एकत्र काम करूया. ते ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत,” असे ते म्हणाले.

जुलै 2024 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीसाठीच्या वादग्रस्त कोटा प्रणालीवरून सुरू झालेल्या देशव्यापी निदर्शनांनी गेल्या वर्षी 5 ऑगस्टलाच कळस गाठला होता. त्याला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले.

सुरुवातीला विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनांना वेग आला आणि 5 ऑगस्ट रोजी जमावाने हसीना यांच्या अधिकृत निवासस्थानावर हल्ला केला तेव्हा त्याचा शेवट झाला. यांच्या फक्त काही तास आधी तत्कालीन पंतप्रधानांना हेलिकॉप्टरने बांगलादेशाच्या बाहेर पळून जावे लागले आणि तेव्हापासून त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे.

लोकशाही सुधारणा

युनूस यांनी या वर्धापनदिनाचा उपयोग लोकशाही सुधारणांसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यासाठी केला. त्यांनी यानंतरही सतर्क राहण्याची  गरज अधोरेखित केली आणि इशारा दिला की मागील राजवटीतील अल्पावशेष आणि त्यांचे पाठिराखे अजूनही बदल रोखण्याचा प्रयत्न करत आहेत.

“पराभूत हुकूमशहा आणि त्यांचे समर्थक अजूनही काड्या घालायचे काम करत आहेत, आम्ही केलेली प्रगती नाहीशी करण्याचा कट रचत आहेत,” असा इशारा त्यांनी दिला.

बांगलादेशच्या राजकीय आणि निवडणूक चौकटीत आवश्यक सुधारणांवर राजकीय पक्ष आणि नागरी समाजासोबत चर्चा सुरू आहे यावरही त्यांनी भर दिला.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleसंरक्षण क्षमता वाढवण्यासाठी DAC ची नव्या प्रस्तावांना मंजुरी
Next articleभारताद्वारे आयोजित UN सैन्यदल परिषदेला, पाकिस्तान व चीनला निमंत्रण नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here