12 नोव्हेंबर 2023 दिवाळीचा दिवस. मात्र याच दिवशी पहाटे 5 च्या सुमारास उत्तराखंडमधील चारधाम रोडवर काम सुरू असलेल्या सिलक्यारा बोगद्याचा एक भाग कोसळला. सिलक्यारा टोकापासून सुमारे 200 मीटर अंतरावर जिथे ही घटना घडली, तिथे 41 कामगार काम करत होते. बोगदा नेमका का कोसळला, याची चौकशी सुरू झाली असली तरी, या कामगारांना बाहेर काढण्याची बचाव मोहीम लक्षवेधी ठरली आहे. या मिशनच्या असंख्य प्रशंसनीय पैलूंवर प्रकाश टाकणारी आहे.
ही भयंकर घटना घडली त्या दिवशी, आत अडकलेल्यांपैकी कोणी बचावले असेल अशी कोणालाच आशा नव्हती. घटनास्थळी असणारी टीम या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत असतानाच, या कोसळलेल्या खडकांच्या ढिगाऱ्याखालील पाण्याच्या पाइपलाइनमधून पाण्याचा प्रवाह अचानक सुरू झाला. पाइपलाइनच्या दुसऱ्या टोकाला अडकलेल्या कामगारांनी पाण्याच्या पंपाचा वापर करून आपण जिवंत असल्याचा पुरावा देत सगळ्यांना दिलासा दिला. लगेचच, साइटवर असलेल्या टीमने एक जुनी पद्धत वापरून पोकळ पाईपचा वापर करून दुस-या टोकावर अडकलेल्यांशी संवाद साधला. पुढच्या आव्हानात्मक आणि खडतर प्रवासातले हे पहिले यश होते.
सर्व 41 कामगार चमत्कार म्हणूनच सुरक्षित राहिले असून कोसळलेल्या भागापासून दूर गेले आहेत, असे बचाव पथकाच्या लवकरच लक्षात आले. ते जिवंत होते आणि बोगद्यात सुमारे 2 किमीच्या सुरक्षितस्थळी स्थलांतरित झाले होते, ज्याचा बराचसा भाग जाड काँक्रिटच्या छतामुळे सुरक्षित होता. आपल्या सहकार्यांची लवकरात लवकर सुटका करण्याच्या प्रयत्नात, साइटवरच्या कर्मचार्यांनी, उत्खनन करणारी यंत्रे आणि लोडर आणून, ढिगारा उपसायला सुरूवात केले. मात्र, त्यांच्या या अनवधानाने केलेल्या कृतीमुळे बोगद्याचे बांधकाम परत एकदा कोसळले, परिणामी प्रभावित क्षेत्र 40 ते 60 मीटरपर्यंत वाढले. या कामासाठी आता अधिक तारतम्याने वागण्याची गरज असल्याचे लक्षात घेऊन, वरिष्ठ अभियंते आणि टीम लीडर ने साइटची जबाबदारी स्वीकारली. तर, आपल्या मित्रांना बाहेर काढण्याचा सर्वात जलद उपाय म्हणजे ढिगारा हटविणे, असे मानणाऱ्या कामगारांच्या विरोधाला त्यांना आधी सामोरे जावे लागले. नाजूक फायलाइट्स आणि मेटा सँडस्टोन्सच्या आत बोगदा किती धोकायदाय बनला आहे, हे या कामगारांच्या लक्षात येत नव्हते. त्यामुळे घाईघाईने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाने कदाचित परिस्थिती अधिक बिकट बनली असती. बोगदा कोसळण्याचा किंवा झिपरसारखा तो मधोमध दुभंगण्याचा धोका खूप मोठा होता, ज्यामुळे कामगारांना सुरक्षित बाहेर काढणे जवळपास अशक्य झाले असते.
बचाव कार्य करणाऱ्यांनी हळूहळू परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि पाण्याच्या लहान पाइपद्वारे सुका मेवा आणि इतर आवश्यक अन्नपदार्थ अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचवण्यास सुरूवात केली. सुदैवाने, बोगद्यात विजेच्या केबल्स आणि पाण्याचे नैसर्गिक स्रोत असल्याने अडकलेल्या कामगारांसाठी विजेची आणि पिण्याच्या पाण्याची सोय झाली होती.
साइटवरच्या अधिकाऱ्यांनी त्वरित संभाव्य उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले आणि ड्रिल करण्यासाठी ऑगरने सुसज्ज ट्रेंचलेस मशीन साइटवर मागवून घेतले. मात्र, अशा आव्हानात्मक परिस्थितीत ड्रिलिंग करण्यासाठी हे मशीन उपयोगी ठरले नाही. त्यानंतर आणखी मजबूत अमेरिकन ऑगर कम पाइप जॅकिंग मशीन आणण्यात आले. ऑगर म्हणजे मुळात एक हेलिकल स्क्रू आहे, जो सुरुवातीपासून माती काढून टाकण्यासाठी डिझाइन केलेला आहे, तो घट्ट झालेल्या मातीच्या ढिगाऱ्याच्या आत खोलवर जाऊ शकतो. माती आणि खडक हटवून पुढे स्टीलच्या मदतीने बोगद्यात केलेल्या अस्तरापर्यंत जाण्याता प्रयत्न होता.
मशिनची जमवाजमव करून त्याचा पाया तयार करत असताना, दुसरीकडे अडकलेल्या कामगारांना पाण्याच्या पाइपलाइनद्वारे अतिरिक्त अन्नपुरवठा करण्यात आला. कॉम्प्रेस्ड एअरद्वारे पाइपलाइनमधून ही पॅकेट्स पोहोचवण्याची व्यवस्था केली गेली आणि बचावकार्य सुरू असतानाच ही पॅकेट्स आतल्या कामगारांना मिळाली आहेत, याची खात्रीही करण्यात आली.
18 नोव्हेंबरला दुपारी तीनच्या सुमारास बोगद्यात कर्कश आवाज आल्याने घबराट पसरली, हा आवाज बोगद्याच्यावर असलेल्या रचनेत काहीतरी बदल झाल्यामुळे आला होता. संभाव्य जोरदार हादरा बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने अधिक पोकळ्या निर्माण होत गेल्या. परिणामी बोगद्याच्या आत अन्नाचा पुरवठा सतत करण्यासाठी 150 मिमी व्यासाची पर्यायी पाइपलाइन तातडीने तयार करण्यात आली. दोन दिवसांत दोन वेळा प्रयत्न केल्यानंतर ही नवीन पाइपलाइन यशस्वीपणे टाकण्यात आली.
बचाव कार्य सुरळीतपणे चालावे यासाठी बोगद्याच्या सुरुवातीला कार्यरत असलेल्या बचाव पथकासाठी सुरक्षित सुटकेचा मार्गही तयार करणे यासारखे सावधगिरीचे उपाय अंमलात आणण्यात आले. प्रीकास्ट काँक्रिट बॉक्सेस (कल्व्हर्ट सेक्शन) आणि ह्यूम पाइप्स यांची रचना बोगद्याच्या दर्शनी भागापासून 67 मीटर अंतरावर असलेल्या ठिकाणापर्यंत अशा प्रकारे करण्यात आली होती की, आपत्कालीन परिस्थितीत बचाव पथकासाठी सुरक्षितपणे सुटण्यासाठी तो मार्ग उपलब्ध होऊ शकेल. याशिवाय, बोगद्याच्या प्राथमिक लायनिंगला आणखी मजबूती देण्यासाठी काही योजना आखण्यात आल्या होत्या, मात्र हा मुद्दा नंतर महत्त्वाचा ठरणारा होता.
सुरक्षाविषयक उपाय आणि अन्न पाइपलाइन तयार झाल्यानंतर, अमेरिकन ऑगरचा पाया तयार झाला आणि 22 नोव्हेंबर रोजी ऑगरिंग प्रक्रिया सुरू झाली. एक 900 मिमी पाइप बोगद्याच्या आत पोहोचवण्याचे काम सुरू झाले आणि त्यासाठी जागा तयार करण्याचे काम ऑगरचे होते. सुरूवातीला ऑगरची प्रगती लक्षणीय ठरली, नंतर मात्र स्टीलच्या बांधकामाचा अडथळा निर्माण होऊ लागला. त्यामुळे, ऑगर मशीनचे काम अनेक वेळा थांबवावे लागले आणि पुढचे स्टील कापून काढण्यासाठी वेल्डर त्या पाइपमध्ये घुसले. नंतर केल्या जाणाऱ्या ड्रिलिंगसाठी अतिरिक्त जागा तयार करणे आवश्यक होते.
21 मीटर आणखी पुढे गेल्यानंतर, ऑगरला आणखी एका अडथळ्याचा सामना करावा लागला आणि त्यावेळी लक्षात आले की पाइप जॅकिंग यंत्रणा पाइप पुढे ढकलण्यासाठी सक्षम नव्हती. पाइप आणि बोगद्यातील चिखल यांच्यात अतिप्रमाणात होणाऱ्या स्कीन प्रिक्शनमुळे (घनपदार्थ द्रव्याच्या किंवा वायूच्या प्रवाहातून जात असताना होणारे घर्षण) एक मोठे आव्हान उभे राहिले. संपूर्ण ऑगर काढून स्कीन प्रिक्शन कमी करण्यासाठी आधीच्या 900 मिमी पाइपमध्ये 800 मिमी व्यासाचा पाइप टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. 2.5 मीटर ते 6 मीटर लांबीच्या वेल्डिंग सेक्शनद्वारे नवीन पाइप्स घातले गेले. या प्रक्रियेला अतिरिक्त 24 तास लागले. त्यानंतरच ऑगर पुन्हा सुरू करता आले.
अपेक्षेनुसार, ड्रिलिंग प्रक्रियेदरम्यान ऑगरसमोर सतत स्टीलचे बांधकाम येऊ लागले. यामुळे ऑगर काढून तिथले स्टील कापून टाकणे आणि नंतर ऑगर पुन्हा सुरू करणे असे वारंवार करत राहावे लागले. मात्र अंदाजे 45 मीटर आतमध्ये, ऑगर पुन्हा एकदा अडकले. ते पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात फाऊंडेशन फ्रेममुळे ते मागे घ्यावे लागले. यावर उपाय म्हणून, अतिरिक्त स्थिरतेसाठी रॉक बोल्ट आणि फ्रेमच्या भोवती काँक्रिटचे काम करून पाया मजबूत केला गेला.
या टप्प्यावर, पाइपच्या पृष्ठभागावरून ग्राउंड पेनिट्रेटिंग रडारच्या मदतीने (जीपीआर) स्कॅन केले गेले, ज्यामध्ये यानंतर स्टीलचा अडथळा निर्माण होणार नाही, हा तांत्रिक अंदाज खोटा ठरला. त्यानंतरही ऑपरेशन अधिक जलद करण्याच्या प्रयत्नात, ऑगर पुन्हा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. बळ आणि रेटा मर्यादित स्वरुपात ठेवण्याच्या सूचना मशीन ऑपरेटरना देण्यात आल्या असल्या तरी, त्यांचे पालन करणे आव्हानात्मक ठरले. दुर्दैवाने, जाळीचे गर्डर्स आणि ग्रॉउट पाइप्सबरोबर इतर असंख्य स्टीलच्या तुकड्यांमध्ये ऑगर अडकल्यामुळे आधीच आत घातलेल्या 800 मिमी व्यासाच्या पाइपचे काही ठिकाणी नुकसान झाले. याच टप्प्यावर ऑगर काढण्याचा आणि त्याऐवजी रॅट मायनिंग (उंदीर पोखरतो त्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी हाताने उत्खनन) करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ऑगर काढण्याचे जिकरीचे काम याचवेळी दुर्दैवाने आणखी परीक्षा बघणारे ठरले. 15 मीटरपर्यंत ऑगर यशस्वीरित्या बाहेर काढल्यानंतर, त्याचा शाफ्ट तुटला, ज्यामुळे मशीन आणखी पुढे खेचणे कठीण झाले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असणारे सगळे प्रयत्न अचानक व्यर्थ ठरल्याचे लक्षात आल्याने त्या एका क्षणी सर्वच निराश झाले. सुरुवातीला झालेल्या पडझडीनंतर जवळपास दोन आठवड्यांनी बसलेला हा धक्का मोठा होता.
कामगारांच्या सुटकेसाठी आखण्यात आलेली रणनीती केवळ एकांगी होती का? तर नाही. एमओआरटीएचने (रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय) आखलेले धोरण पूर्ण विचारांती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित होते. बचावासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांसोबत, इतर अनेक पर्यायांचा पाठपुरावा केला जात होता. यापैकी एक पर्याय होता THDC Ltd बरकोटच्या बाजूने खोदलेल्या मार्गातून लहान बोगद्यांचा शोध घेणे. इतर पर्यायांमध्ये सिलक्याराच्या टोकापासून अंदाजे 3 किमी अंतरावर असलेल्या टेकडीवर एका ठिकाणी दोन फूट व्यासाचे 300-मीटर-उंच कलते उभे रेस्क्यू शाफ्ट बांधण्याचा ONGCचा प्रयत्नही सुरू होता. तर, सिलक्याराच्या टोकापासून 320 मीटर अंतरावर असलेल्या 1.2 मीटर व्यासाच्या 90 मीटर उंच उभ्या रेस्क्यू शाफ्टवर SJVNL (सतलज जलविद्युत निगम लिमिटेड) काम करत होते. RVNL (रेल्वे विकास निगम लिमिटेड) सिलक्याराच्या टोकापासून 300 मीटर अंतरावर 200 मिमी व्यास आणि 90 मीटर उंचीचे उभे बॅकअप फूड सप्लाय शाफ्ट बांधण्यात गुंतले होते.
याव्यतिरिक्त, RVNLने 1.2 मीटर व्यासाचे मायक्रो टनेल बोरिंग मशीन (TBM) वापरून 170 मीटर लांबीच्या आडव्या बोगद्याचा शोध लावला. जिथे दरड कोसळली होती तिथे साइड ड्रिफ्ट पर्यायांचा देखील विचार केला गेला, ज्यामध्ये पूर्वनिर्मित आयताकृती आणि वर्तुळाकार फ्रेम्स वापरणे किंवा ग्राउटिंग, टनेल शॉटक्रिट उपकरणे आणि लष्करी बॉबकॅट एक्स्कॅव्हेटर वापरून पूर्ण-आकाराचे साइड ड्रिफ्ट तयार करणे यांचा समावेश होता. 201 इंजिनियर रेजिमेंटच्या मद्रास सॅपर्सचे नेतृत्व करणार्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली आर्मी सॅपर्सच्या एका पलटणीने लष्करी साहित्य आधीच साइटवर आणले होते.
ड्रिल रिग्जची जमवाजमव एकीकडे सुरू असतानाच, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने 20 नोव्हेंबरपर्यंत RVNL आणि SJVNL द्वारे उभारण्यात येणाऱ्या शाफ्टसाठी 1200 मीटरचा पोहोचमार्ग (लवकर पोहोचणारा रस्ता) जलदपणे बांधून अनोखी कार्यक्षमता दाखवली. आंतरराष्ट्रीय टनेलिंग असोसिएशनचे अध्यक्ष अरनॉल्ड डिक्स आणि अटल तसेच सेला बोगद्याच्या कामासाठी प्रसिद्ध असलेले कर्नल परीक्षित मेहरा यांच्यासमवेत तज्ज्ञांनी डोंगरमाथ्याची पाहणी केली. ड्रिल रिग्स उभी करण्यासाठी ओढ्याच्या बाजूने मजबूत खडक असलेल्या योग्य जागांची निवड झाली.
26 नोव्हेंबरपर्यंत, निवड केलेल्या जागी ड्रिल रिग यशस्वीपणे स्थापन करण्यात आली आणि ड्रिलिंग ऑपरेशन्स सुरू झाली. कामाची प्रगती लक्षणीय होती, RVNLद्वारे 200 मिमी व्यासाचा पाइप 72 मीटर खोलीपर्यंत पोहोचला होता, तर SJVNL द्वारे 1.2 मीटर व्यासाचा पाइप 27 नोव्हेंबरपर्यंत जवळपास 35 मीटरपर्यंत पोहोचला होता. मायक्रो टनेल बोरिंग मशीन (TBM) आणि ONGC ड्रिल रिगसाठी आवश्यक साधनांची जमवाजमव कार्यक्षमतेने करण्यात आली, जिथे शक्य असेल तिथे ग्रीन कॉरिडॉर आणि हवाई दलाच्या मालवाहू विमानांचा वापर करण्यात आला. या सर्वसमावेशक प्रयत्नातून राष्ट्रीय बांधिलकी दिसली, उपलब्ध सर्व पर्याय शोधण्यात कोणतीही कसर ठेवली नाही.
संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन, सॅपर्सनी आधीच आयताकृती आणि वर्तुळाकार ड्रीफ्स तयार केले होते, गरज भासल्यास स्वतंत्र मॅन्युअल साइड ड्रिफ्ट घेण्यासही ते तयार होते. काळाची गरज ओळखून, बॉबकॅट एक्स्कॅव्हेटर वापरावे लागले तर, आवश्यक मोठे ड्रिफ्टही करण्याची तयारी सुरू झाली, जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा या पर्यायांचा पाठपुरावा करण्यासाठी सॅपर्स तयार आहेत, हे निश्चित झाले.
याचदरम्यान, एमओआरटीएचचे (रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय) सचिवांनी – जे दिल्लीतून या सगळ्या कामावर लक्ष ठेवून होते – 22 नोव्हेंबर रोजी प्रत्येक पर्यायाच्या प्रगतीचे निरीक्षण आणि पर्यवेक्षण करण्यासाठी वैयक्तिकरित्या साइटला भेट दिली होती. आयआयटीचे विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडे असणारी तांत्रिक निपुणता आणि या विषयातील तज्ज्ञ यांच्या एकत्रित प्रयत्नांनी या कामातील जोखीम कमी करून लवकरात लवकर या कामात यश मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सर्वोत्कृष्ट आणि कमीत कमी जोखमीचा मार्ग स्वीकारणे, हे आव्हान असतानाही सेक्रेटरी ठामपणे उभे होते.
उभ्या पद्धतीने ड्रिलिंग सुरू होते, मात्र त्यामुळे बोगद्याच्या वरच्या भागातील सछिद्र जमिनीतून पाणी ठिबकण्याचा (पंक्चर) धोका होता. 72 मीटर खोलवर पोहोचलेल्या 200 मिमी व्यासाच्या छोट्या ड्रिलला झिरपलेल्या पाण्याचा सामना करावा लागला, मात्र हातात आता कमी वेळ आहे हे लक्षात घेऊन 1.2 मीटर व्यासाच्या मोठ्या ड्रिलला परवानगी दिली गेली.
वेळ निघून जात होती का? तर अजिबात नाही. पूरक अन्न पाइपमुळे अडकलेल्या मजुरांपर्यंत अन्नाचा पुरेसा साठा पोहोचवला जात होता. 3D मॉनिटरिंगद्वारे बोगद्यातील एकूण परिस्थितीचा सतत मागोवा घेतला जात होता, त्यामुळे अतिरिक्त सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करणे काहीसे सोपे झाले. सातत्याने बसणाऱ्या हादऱ्यांमुळे बोगद्याच्या अखंडतेवर कोणताही लक्षणीय परिणाम झालेला नव्हता – कॅमेरे बसवणे, अडकलेल्या कामगारांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक ते उपाय करता आले. मात्र आत फसलेल्या सर्वेक्षण प्रोफेशनलशी रात्री उशिरा झालेल्या संभाषणातून हे लक्षात आले की, बोगद्याच्या 260 मीटर ते 280 मीटरपर्यंत पसरलेल्या एकसंध भागामध्ये चिंताजनक बदल अनुभवला होता.
त्यांच्यापासून फक्त काही मीटर्स लांब असलेल्या खोदकाम यंत्राच्या घरघराटामुळे कदाचित कामगारांचा जीव धोक्यात येऊ शकला असता. त्याचप्रमाणे, वरच्या बाजूने उभ्या पद्धतीने सुरू असणाऱ्या कामामुळे दगड कोसळू शकले असते किंवा पाणी झिरपायला लागले असते, तर फिलाइट खडकाचे पेस्टमध्ये रूपांतर झाले असते. कामगारांची सुरक्षा पूर्णपणे बोगद्याच्या अबाधित राहण्यावर अवलंबून होती. अशीच परिस्थिती यापूर्वी अनुभवलेला एक बचावकर्ता सर्वांना धीर देण्याचे महत्त्वपूर्ण काम करत होता. फोनच्या माध्यमातून कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये संवाद करता आला, अडकलेल्या कामगारांचे मनोबल उंचावलेले राहावे, यासाठी अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी सतत संवाद साधला.
देवभूमीने बचाव पथकासमोर आव्हाने उभी केली, पण प्रत्येक चाचणीच्या वेळी आशावाद आणि आशीर्वादही दिले. वेल्डर्स आणि गॅस कटर्स यांनी अनोखे कौशल्य दाखवल्याने फसलेले ऑगर कापण्याचे काम तातडीने सुरू झाले. सुरुवातीच्या काही तासांमध्ये कामांची गती मंद असली तरी, त्यानंतरच्या तासांमध्ये चमत्कारिक वेग दिसून आला. लेझर कटर, प्लाझ्मा कटर आणि मॅग्ना कटर त्वरित साइटवर उडवले गेले. ऑगर यशस्वीपणे कापून काढले गेले, शेवटच्या 1.5 मीटरमध्ये खराब झालेले पाइप आणि ऑगरचे राहिलेले काही तुकडे बाहेर काढले गेले आणि 28 नोव्हेंबरला रॅट होल मायनर्सचे वैयक्तिक प्रयत्न सुरू करण्यात आले.
हळूहळू तरीही, सातत्याने खणत, खाण कामगारांनी पाइप ढकलण्यासाठी आवश्यक असलेली जागा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळे 42 मीटर खोलवर 1.2 मीटर व्यासाचा उभा ड्रिलिंग पर्याय तयार होऊ शकतो, ही आशा निर्माण झाली. शेवटचे फक्त 2.4 मीटर शिल्लक असताना कोणताही धोका नसताना अलार्म वाजायला लागला. म्हणूनच 800 मिमी व्यासाचा पाइप यशस्वीरित्या पुढे ढकलण्यासाठी आणखी दोन तास लागले. आत अडकलेले कामगार पाइप खेचून घेण्यास तयार होतेच, काहीजण त्यातून पुढे सरकले. NDRFने तयार केलेल्या सुरक्षित स्ट्रेचर कॉन्ट्रॅप्शनचा वापर करून, अडकलेल्या सर्व कामगारांना पुढच्या काही तासांत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि 17 दिवसांच्या प्रदीर्घ परीक्षेचा सुखद अंत झाला.
बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वैद्यकीय मदतीसोबत मानसोपचार मदतही देण्यात आली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग (निवृत्त लष्करप्रमुख) मुक्त झालेल्या कामगारांचे स्वागत करायला उपस्थित होते.
अडकलेल्या 41 अमूल्य भारतीयांच्या सुटकेसाठी संपूर्ण देश प्रार्थना करत होता. एमओआरटीएचचे सचिव आणि एनएचआयडीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक यांनी अशा अपवादात्मक प्रतिकूल परिस्थितीतही केलेले नेतृत्व परिपक्व आणि खंबीरपणा दर्शवणारे होते, तर पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) अधिकाऱ्यांचा अखंड पाठिंबा लाभला. SJVNL, RVNL, ONGC, THDC आणि इतर अनेक टेक्निकल संस्थांनी या ऑपरेशनसाठी मनापासून हातभार लावला. सैन्यदल, हवाई दल आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, एनएचआयडीसीएल आणि एमओआरटीएच सोबत एकजुटीने उभे राहिले आणि अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने हे ऑपरेशन पार पाडले. हे ऑपरेशन भारताच्या राष्ट्रीय सामर्थ्याचे एक प्रेरणादायी उदाहरण म्हणून कायम स्मरणात राहणार आहे.
ही घटना टाळता आली असती का? भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील? या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आजच्या बोगदा बांधकाम उद्योगाच्या विविध पैलूंचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. सरकार विकासाचा दृष्टीकोन आणि कंत्राटदारांचा अभ्यासू दृष्टीकोन लक्षात घेऊन सर्वसमावेशक विश्लेषण होण्याची गरज आहे. मात्र या नंतरच्या गोष्टी आहेत. कारण हा प्रशंसनीय पराक्रम सध्या देश साजरा करत आहे!
संदर्भ – बचाव कार्यात सहभागी झालेल्यांचे पर्सनल अकाऊंट
(अनुवाद : आराधना जोशी)