मंगळवारी, बीजिंगमध्ये भारत-चीन सीमा व्यवहारांमधील कार्यक्षमता आणि समन्वय कार्य यंत्रणेच्या (WMCC) च्या 33व्या बैठकीदरम्यान, भारत आणि चीनने ‘कैलास मानसरोवर यात्रा’ लवकर पुन्हा सुरू करण्यावर चर्चा केली. भारतीय यात्रेकरुंसाठी महत्त्वपूर्ण असलेली धार्मिक यात्रायात्रा, गेल्या काही वर्षांपासून भारत-चीन सीमा तणावामुळे स्थगित झाली आहे.
या बैठकीला दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावली, ज्यात भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व गोरांगलाल दास, संयुक्त सचिव (पूर्व आशिया) यांनी केले, तर चीनचे प्रतिनिधित्व हाँग लियांग, सीमा व महासागरीय व्यवहारांच्या महासंचालक यांनी केले, असे परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) एका निवेदनात सांगितले.
या चर्चेत, वास्तविक नियंत्रण रेषेवरील (LAC) परिस्थितीवर देखील लक्ष केंद्रित करण्यात आले आणि दोन्ही बाजूंनी हे मान्य केले की, सीमा तसेच एकूण द्विपक्षीय संबंधांसाठी शांतता आणि स्थिरता महत्त्वाची आहे.
यात्रेच्या पलीकडे, दोन्ही देशांनी सीमापार नद्या आणि सीमापार सहकार्यासाठी विविध उपायांचा शोध घेतला, तसेच डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या 23 व्या विशेष प्रतिनिधींच्या बैठकीतील निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) निवेदनानुसार, “सकारात्मक आणि रचनात्मक वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत, भारत-चीन सीमा प्रदेशांतील वास्तविक नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचे सखोल पुनरावलोकन केले गेले. सीमा प्रदेशातील शांतता आणि सामंजस्य, हे एकूण द्विपक्षीय संबंधांच्या सुरळीत विकासासाठी किती महत्वाचे आहे, यावर चर्चा केली. तसेच दोन्ही बाजूंनी डिसेंबर 2024 मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या (भारत-चीन सीमावादावरील) 23 व्या विशेष प्रतिनिधींच्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि प्रभावी सीमा व्यवस्थापन पुढे नेण्यासाठी विविध उपाय आणि प्रस्तावांचा विचार केला. दोन्ही पक्षांनी यासाठी संबंधित कुटनिती आणि लष्करी यंत्रणा मजबूत करण्यावर सहमती दर्शवली. त्यांनी सीमा पार सहकार्य आणि आदान-प्रदान लवकरात लवकर सुरू करण्यावरही आपले विचार मांडले, ज्यामध्ये सीमापार नद्या आणि कैलास-मानसरोवर यात्रा यांचा समावेश आहे.”
तसेच दोन्ही पक्षांनी यावर्षी भारतात होणाऱ्या, पुढील विशेष प्रतिनिधींच्या बैठकीची तयारी सुरू करण्यावर सहमती दर्शवली.
हा महत्वपूर्ण निर्णय, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या 26-27 जानेवारी रोजी बीजिंग दौऱ्यानंतर झाला आहे, जो परराष्ट्र सचिव आणि उप परराष्ट्र मंत्री यंत्रणेसाठी आयोजित करण्यात आला होता आणि ज्यामध्ये दोन्ही देशांनी 2025 च्या उन्हाळ्यानंतर ‘कैलास-मानसरोवर यात्रा’ पुन्हा सुरू करण्याची योजना जाहीर केली होता.
टीम भारतशक्ती