दलाई लामांच्या उत्तराधिकाराचा मुद्दा भारतासोबतच्या संबंधांमध्ये ‘काटा’– चीन

0

तिबेटीयन आध्यात्मिक नेते दलाई लामा, यांच्या उत्तराधिकारी निवडीचा मुद्दा हा भारत-चीन संबंधांमध्ये ‘काट्याप्रमाणे’ आहे, असे नवी दिल्लीतील चिनी दूतावासाने रविवारी म्हटले. भारताचे परराष्ट्रमंत्री, 2020 मधील जीवघेण्या सीमावादानंतर प्रथमच चीन भेटीची तयारी करत असताना, हे वक्तव्य करण्यात आले आहे.

या महिन्यात, दलाई लामांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांना भारताचे वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. त्यावेळी दलाई लामा यांनी पुन्हा एकदा चीनला त्रासदायक ठरणारे विधान केले. “आपल्या उत्तराधिकारी निवडीमध्ये चीनची कोणतीही भूमिका नाही. तिबेटी बौद्धांच्या मते, कोणत्याही वरिष्ठ बौद्ध भिक्षूंच्या मृत्यूनंतर त्यांचा आत्मा पुनर्जन्म घेतो,” असे ते म्हणाले. मात्र चीनचे म्हणणे आहे की, “दलाई लामांच्या उत्तराधिकारी निवडीसाठी चीनी नेत्यांची मान्यता आवश्यक आहे.”

दलाई लामा हे 1959 मध्ये, तिबेटमध्ये झालेला चीनविरोधी उठाव फसल्यावर भारतात आले, तेव्हापासून ते इथेच निर्वासित म्हणून राहत आहेत. भारतीय परराष्ट्र-धोरण तज्ञांच्या मते, ‘त्यांची भारतातील उपस्थिती दिल्लीत चीनविरुद्ध एक राजनैतिक दबाव साधण्याचे साधन आहे. सुमारे 70,000 तिबेटीयन निर्वासित भारतात राहतात आणि भारतात तिबेटी निर्वासित सरकारही कार्यरत आहे.’

चिनी दूतावासाच्या प्रवक्त्या- यू जिंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की, ‘भारतातील काही धोरणात्मक आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनी, दलाई लामा यांच्या पुनर्जन्मासंदर्भात “अयोग्य वक्तव्ये” केली आहेत.’

यू यांनी कुणाचे नाव घेतले नाही, ‘पण अलीकडील काही दिवसांत भारतीय धोरण तज्ज्ञ आणि एका मंत्र्याने दलाई लामांच्या पुनर्जन्मासंदर्भातील विधानांना पाठिंबा दिला होता,’ असे त्या म्हणाल्या

“परराष्ट्र व्यवहारातील व्यावसायिकांनी शीझांग (तिबेटसाठी चिनी शब्द) शी संबंधित मुद्द्यांची संवेदनशीलता पूर्णपणे समजून घेतली पाहिजे,” असे यू म्हणाल्या.

“दलाई लामांचा पुनर्जन्म आणि उत्तराधिकारी निवड ही चीनची अंतर्गत बाब आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“शीझांगसंबंधीचा मुद्दा हा भारत-चीन संबंधांमधील एक काटा ठरला असून तो भारतासाठी ओझं बनला आहे. ‘शीझांग कार्ड’ खेळणे हे शेवटी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखे ठरेल,” असेही त्या म्हणाल्या.

भारताचे संसदीय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री- किरण रिजिजू, जे गेल्या आठवड्यात दलाई लामांच्या वाढदिवस समारंभात उपस्थित होते, यांनी म्हटले आहे की: “एक बौद्ध अनुयायी म्हणून, दलाई लामा आणि त्यांचे कार्यालयच त्यांच्या पुनर्जन्मावर निर्णय घेण्यास अधिकृत आहेत.”

दलाई लामांच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी, 4 जुलै रोजी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले की, “नवी दिल्ली कोणत्याही धर्माच्या श्रद्धा व धार्मिक प्रथांबाबत कोणतीही भूमिका घेत नाही किंवा वक्तव्य करत नाही.”

भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर 15 जुलै रोजी, चीनमधील टियांजिन शहरात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या क्षेत्रीय सुरक्षा बैठकीला हजेरी लावणार आहेत. त्यावेळी ते द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहेत.

ही भेट, 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या सैनिकी संघर्षानंतर भारत-चीनमधील सर्वात उच्चस्तरीय भेटींपैकी एक ठरेल, ज्या संघर्षात दोन्ही बाजूंच्या सैनिकांचा मृत्यू झाला होता.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleMKU ने जिंकले सशस्त्र दलांसाठीच्या हेल्मेट पुरवठ्याचे आंतरराष्ट्रीय कंत्राट
Next articleएअर इंडिया क्रॅशची चौकशी सुरु आहे, निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल: सीईओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here