
एका वरिष्ठ भारतीय मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडण्याचे संपूर्ण अधिकार फक्त दलाई लामा आणि त्यांच्या संस्थेकडेच आहे.” त्यांचे हे विधान हा एक दुर्मिळ पण स्पष्ट सार्वजनिक संदेश असून, याद्वारे भारताने चीनच्या दीर्घकालीन भूमिकेला थेट आव्हान दिले आहे.
दलाई लामा 1959 मध्ये, चीनच्या अधिपत्याविरुद्ध झालेल्या उठावानंतर भारतात आले होते. बुधवारी त्यांनी सांगितले की, “त्यांच्या मृत्यूनंतर ते पुन्हा जन्म घेतील आणि उत्तराधिकारी म्हणून वारसा पुढे चालवतील.” त्यांनी असेही स्पष्ट केले की, “फक्त गदेन फोड्रांग ट्रस्ट (Gaden Phodrang Trust) हाच त्यांच्या खऱ्या उत्तराधिकाऱ्याची ओळख पटवू शकतो.” यापूर्वीही त्यांनी त्यांचा पुढचा जन्म चीनबाहेर होईल, असे सांगितले होते.
बीजिंग सरकारचा दावा आहे की, दलाई लामांचा उत्तराधिकारी मंजूर करण्याचा हक्क त्यांना आहे, जो त्यांच्यामते सम्राटकालीन (imperial times) परंपरेचा भाग आहे.
भारताची स्पष्ट भूमिका
भारतातील संसदीय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी, गुरुवारी या विषयावर भारताची भूमिका मांडली. ते दलाई लामांच्या 90 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे त्यांच्या भेटीस जाण्यापूर्वी बोलत होते.
भारतीय माध्यमांनी रिजिजू यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीचा हवाला देत सांगितले की, “दलाई लामांचे उत्तराधिकारी कोण असावेत हे ठरवण्याचा हक्क इतर कोणालाही नाही. फक्त दलाई लामा किंवा त्यांची संस्थाच हा निर्णय घेऊ शकते. त्यांच्या अनुयायांचा या गोष्टीवर प्रगल्भ विश्वास आहे. जगभरातील त्यांच्या शिष्यांसाठी ही आदरपूर्वक बाब आहे की, ते स्वतःच आपला उत्तराधिकारी ठरवतात.”
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने, दलाई लामांच्या उत्तराधिकारी निवडी संदर्भातील प्रश्नावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
रिजिजू हे स्वतः बौद्ध धर्माचे अनुयायी असून, त्यांच्यासोबत इतर भारतीय अधिकारीही दलाई लामांच्या वाढदिवस सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
भारतामध्ये सध्या दहा हजारांहून अधिक तिबेटी बौद्ध निर्वासित आहेत, जेथे त्यांना शिक्षण व काम करण्याची मोकळीक आहे. अनेक भारतीय दलाई लामांचा आदर करतात. आंतरराष्ट्रीय संबंध विश्लेषकांचे म्हणणे आहे की, ‘भारतात दलाई लामांची उपस्थिती, ही चीनबरोबरच्या संवादात भारताला मोक्याची संधी (leverage) उपलब्ध करुन देते.’
भारत आणि चीन यांच्यातील परस्पर संबंध, 2020 मध्ये झालेल्या सीमावादानंतर हिंसक संघर्षात बदलले होते, मात्र आता ते हळूहळू सुधारण्याच्या दिशेने वाटचाल होत आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)