रशियाने संपूर्ण रात्र कीववर ड्रोन हल्ला सुरु ठेवला, ज्यामध्ये किमान 14 जण जखमी झाले आणि अनेक ठिकाणी रेल्वे मार्गांचेही नुकसान झाले. या हल्ल्यांमध्ये कीव शहरातील अनेक इमारती आणि वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी दिली.
सकाळी 5 वाजता (02:00 GMT) हवाई हल्ले मागे घेण्याच्या इशाऱ्यापूर्वी, महापौर विताली क्लिट्शको यांनी सांगितले की, “जखमींपैकी 12 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.”
खूप मोठे नुकसान
रात्रभर चाललेल्या या हल्ल्यांत, कीवमधील 10 पैकी 6 जिल्ह्यांमध्ये, शहराच्या दोनही बाजूंनी वहात असलेल्या ड्निप्रो नदीच्या परिसरात, मोठे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ‘ड्रोनच्या अवशेषांमुळे होलोसिव्हस्की या हिरवळीने भरलेल्या भागातील एका वैद्यकीय संस्थेला आग लागली,’ असे क्लिट्शको यांनी टेलिग्रामवर सांगितले.
अलीकडच्या काही आठवड्यांमध्ये, कीव आणि संपूर्ण युक्रेनवरील रशियाचे हल्ले अधिक तीव्र झाले आहेत आणि यातील काही हल्ले तर, रशिया-युक्रेन युद्धातील आजवरचे सर्वात प्राणघातक ठरले आहेत.
युक्रेनच्या सरकारी मालकीची रेल्वे कंपनी- उक्रझालिझ्नित्सिया (Ukrzaliznytsia) ने सांगितले की, “या हल्ल्यात कीवमधील रेल्वे पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून, काही प्रवासी गाड्यांचे मार्ग वळवावे लागले आहेत आणि त्या उशीराने धावत आहेत.”
ट्रम्प–झेलेन्स्की संवाद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, “रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी गुरुवारी झालेल्या फोन संभाषणातून, युद्ध समाप्तीसाठी कोणतीही ठोस प्रगती झाली नाही.” दुसरीकडे, क्रेमलिनने पुन्हा एकदा सांगितले की, “मॉस्को युद्धाच्या ‘मूलभूत कारणांवर’ तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत राहील.”
अमेरिकेने या आठवड्यात काही महत्त्वाच्या शस्त्रास्त्रांची युक्रेनकडे होणारी वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे कीवने इशारा दिला की, त्याचा हवाई हल्ल्यांचा आणि रणभूमीवरील आक्रमणांचा प्रतिकार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी गुरुवारी सांगितले की, “ट्रम्प यांच्याशी शुक्रवारी अमेरिकन शस्त्रास्त्र पुरवठ्याबाबत चर्चा होईल ते आशा करतात.”
“हल्ले थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत”
शुक्रवार सकाळपर्यंत, कीवमधील रॉयटर्सच्या सूत्रांनी, सलग स्फोटांचे आवाज आणि सतत चालणाऱ्या हवाई संरक्षण यंत्रणांचे आवाज ऐकले. कीवे त्यांनी रशियन ड्रोन पाडण्याचा प्रयत्नही केला.
कीवच्या लष्करी प्रशासनाचे प्रमुख टायमूर टकाचेंको यांनी टेलिग्रामवर सांगितले की, ‘ड्रोन हल्ल्याची अनेक टार्गेटस् ही निवासी वस्त्यांवर होती. हे हल्ले थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत.” “आम्ही सर्व जिल्ह्यांमध्ये रशियन ड्रोनविरुद्ध कारवाई करत आहोत,” असेही ते म्हणाले.
या हल्ल्यांमध्ये सामान्य नागरिकांना टार्गेट केल्याचा आरोप, रशिया आणि युक्रेन दोघांनीही फेटाळून लावला असला, तरी 2022 पासून सुरु झालेल्या युद्धात हजारो सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात बहुसंख्य युक्रेनियन नागरिक आहेत.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)