रशियाच्या लिपेत्स्क प्रदेशात, कोसळलेल्या एक यूक्रेनी ड्रोनचे अवशेष संपूर्ण परिसरात विखुरले गेले, ज्यामध्ये एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले, अशी माहिती प्रादेशिक गव्हर्नर इगोर आर्तामोनोव यांनी गुरुवारी दिली. तर तिकडे रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाल्याची माहिती, युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली.
टेलिग्रामवर दिलेल्या संदेशात आर्तामोनोव म्हणाले की, ‘हा अपघात प्रादेशिक राजधानीच्या आसपासच्या जिल्ह्यात घडला.’
“ड्रोनचे अवशेष कोसळल्याचे संदेश विविध भागांतून येत असून, आपत्ती निवारण आणि आपत्कालीन सेवा सतर्कपणे कार्यरत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
10 ड्रोन्सचा खात्मा
रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, “लिपेत्स्क प्रदेशाच्या दिशेने आलेल्या 10 ड्रोन्सना आणि एकूण रशियन भूभाग व क्रिमियन द्वीपकल्पाकडे आलेल्या 69 ड्रोन्सना, त्यांच्या संरक्षण दलांनी उद्ध्वस्त केले.” मात्र, युक्रेननच्या मंत्रालयाने नक्की किती ड्रोन लाँच केले हे उघड केलेले नाही.
आर्तामोनोव यांनी अन्य एका पोस्टमध्ये सांगितले की, “लिपेत्स्कच्या येलेत्स शहरात, बांधकाम सुरु असलेल्या अपार्टमेंटना नुकसान झाले असून, जवळच्या पार्किंग लॉटमध्ये लहानसा आगीचा भडका उडाला.”
एकूण नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप उपलब्ध नाही. युक्रेनकडूनही यावर तातडीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
युक्रेनचा हल्ला
लिपेत्स्क हा रशियाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा भू-प्रदेश आहे, जिथे असलेले हवाई तळ- रशियन एअरोस्पेस फोर्सेसचे मुख्य प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामुळे युक्रेनने येथे अनेकदा हवाई हल्ले केले आहेत.
कीवने जाणूनबूजून रशियन हवाई तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून मॉस्कोचे हवाई हल्ले आणि मार्गदर्शित क्षेपणास्त्रे वापरण्याची क्षमता कमी करता येईल. मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात, युक्रेनी सैन्याने लिपेत्स्क एअरफील्डवर हल्ला करून मार्गदर्शित बॉम्बचे साठे उध्वस्त केले असल्याचे सांगितले होते.
युक्रेनमध्ये पाच जण जखमी
दरम्यान, युक्रेनच्या ओडेसा प्रदेशावर करण्यात आलेल्या रशियन हल्ल्यात, एक 7 वर्षांचा मुलगा आणि 9 वर्षांची मुलगी यांच्यासह पाच जण जखमी झाले आहेत, अशी माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. हा हल्ला ओडेसा प्रदेशात करण्यात आला.
बहुमजली निवासी इमारतीसह, इतर नागरी पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले आहे, असे प्रादेशिक गव्हर्नर ओलेह किपर यांनी टेलिग्रामवर सांगितले. या हल्ल्यात 6 अपार्टमेंट पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, आणखी 36 अपार्टमेंटना अंशतः नुकसान झाले आहे.
“लहान मुलांना धुरामुळे विषबाधा झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,” असे किपर म्हणाले.
तर, उर्वरित तीन प्रौढांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
हल्ल्याचे एकूण स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही. रशियाकडूनही यावर तात्काळ कोणती टिप्पणी करण्यात आलेली नाही.
नागरिकांना लक्ष्य केल्याचे, दोन्ही बाजू नाकारतात
रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला असला, तरी दोन्ही देश आपले हल्ले सामान्य नागरिकांना लक्ष्य करुन करण्यात आले नसल्याचे म्हणतात. मात्र, या संघर्षात आजवर हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे, ज्यातील बहुसंख्य मृत्यू युक्रेनमध्ये झाले आहेत.
युक्रेनच्या आपत्कालीन सेवांनी फेसबुकवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये रात्रीच्या अंधारात अग्निशमन दलाचे अधिकारी, आग विझवताना आणि मुलांना बाहेर काढताना दिसत आहेत.
आपात्कालीन सेवादलाने सांगितल्यानुसार, प्रभावित इमारतीतून आतापर्यंत 50 लोकांचे सुखरुप स्थलांतर करण्यात आले आहे. तर, किपर यांच्या म्हणण्यानुसार, हल्यामुळे लागलेली आग आता पूर्णतः आटोक्यात आली आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)