पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, घानाच्या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानांपैकी एक, “ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बुधवारी, अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला, असे परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. हा पुरस्कार, PM मोदी यांच्या ‘लक्षणीय राजकीय नेतृत्व’ आणि जागतिक पातळीवरील प्रभावी नेतृत्वाबद्दल दिला गेला आहे.
भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारताना, पंतप्रधान मोदींनी हा सन्मान भारताच्या तरुणांच्या आकांक्षा, देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, विविधतेतील एकता आणि भारत आणि घाना यांच्यातील खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक संबंधांना समर्पित केला.
या विशेष सन्मानाबद्दल पंतप्रधानांनी घानाच्या जनतेचे आणि नेतृत्वाचे आभार मानले आणि हा सन्मान त्यांच्यासाठी विशेष सन्मानांपैकी एक असल्याचे म्हटले.
भारत आणि घाना यांच्यातील लोकशाही मूल्ये आणि परंपरा यांचा उल्लेख करत, मोदी म्हणाले की, “हा पुरस्कार द्विपक्षीय मैत्रीचे प्रतीक आहे आणि आपले संबंध अधिक दृढ करण्याचे नवीन दायित्व माझ्यावर टाकतो.”
परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, पंतप्रधान मोदींना खात्री आहे की, इतिहासात नोंदविला जाणारा हा राज्य दौरा भारत-घाना यांच्या भागीदारीला नवीन गती देईल.
‘Feed Ghana’ उपक्रमासाठी भारताची मदत
यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी घानासोबतचे सहकार्य वाढवण्यासाठी अनेक उपक्रम जाहीर केले. यामध्ये घानाच्या तरुणांना सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करणे आणि राष्ट्राध्यक्ष महामा यांच्या ‘Feed Ghana’ उपक्रमाला पाठिंबा देणे या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होता. हा उपक्रम घानाच्या कृषी विकास धोरणाचा मुख्य आधारस्तंभ आहे.
घानाचे राष्ट्रपती जॉन महामा यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना, पंतप्रधान मोदींनी कृषी, शिक्षण, संरक्षण, आरोग्य आणि डिजिटल तंत्रज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या योजनांची माहिती दिली.
“आम्ही ITEC आणि ICCR शिष्यवृत्तींची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा लाभ घानाच्या विद्यार्थ्यांना होईल. याशिवाय, घानातील युवकांना व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येईल,” असे पंतप्रधान मोदींनी जाहीर केले.
ते पुढे म्हणाले की, “कृषी क्षेत्रात भारत ‘फीड घाना’ उपक्रमासोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहे. तसेच, जन औषधी केंद्रांमार्फत परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा आमचा उद्देश आहे. याव्यतिरिक्त, आम्ही लस उत्पादन क्षेत्रातील सहकार्य मजबूत करू.”
व्यापार, डिजिटल भागीदारी, आणि भारत-घाना संबंधांचा विस्तार
पंतप्रधान मोदींनी, घानाबरोबरचा दुहेरी व्यापार पाच वर्षांत दुप्पट करण्याची भारताची महत्त्वाकांक्षा यावेळी जाहीर केली. याशिवाय, भारताचा डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म ‘भारत UPI’ घानामध्ये लागू करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला, जेणेकरून आर्थिक समावेशन आणि सीमापार डिजिटल संपर्क वाढवता येईल.
राष्ट्रपती जॉन महामा यांनी कार्यक्रमाच्या एक दिवस आधी, पंतप्रधान मोदींचे घानामध्ये उत्साहपूर्वक स्वागत केले आणि या भेटीचा उल्लेख भारत-घानामधील दृढ मैत्रीचे प्रतीक म्हणून केला.
“पंतप्रधान मोदींसोबतची ही भेट भारत आणि घानामधील ऐतिहासिक मैत्रीचे पुनःप्रतिबिंब आहे, जी घानाचे पहिले राष्ट्रपती डॉ. क्वामे नक्रुमाह आणि भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दृष्टिकोनावर आधारित आहे. ही मैत्री कालांतराने अधिक दृढ झाली असून, दोन्ही देशांच्या जनतेला खरे लाभ मिळाले आहेत,” असे राष्ट्रपती महामा म्हणाले.
पंतप्रधान मोदींचा हा दौरा, गेल्या तीन दशकांतील घानाला भेट देणाऱ्या पहिल्या भारतीय पंतप्रधानांचा दौरा आहे.
हा दौरा भारत-घाना मैत्री अधिक बळकट करेल, तसेच आफ्रिका आणि जागतिक दक्षिणेकडील देशांशी भारताचे संबंध वृद्धिंगत करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक ठरेल, अशी व्यापक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)