वर्षानुवर्षांच्या प्राथमिक चर्चेनंतर, भारत आणि ब्राझील आता संरचित आणि धोरणात्मक संरक्षण भागीदारीकडे वाटचाल करत आहेत. संरक्षण सहकार्य हे या द्विपक्षीय संबंधांचे एक महत्त्वाचे अंग बनले आहे, जिथे भारत-ब्राझील दोन्ही सरकारे एअरोस्पेस, सागरी आणि भू-स्थवावरील संरक्षण प्रणालींच्या विकासाचे ठोस मार्ग आखत आहेत.
Embraer चा भारतातील वाढता प्रभाव
या सहकार्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे, ब्राझीलमधील एअरोस्पेस क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘Embraer’ चा भारतात स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा निर्णय. हे कार्यालय, नागरी आणि लष्करी एव्हिएशन बाजारपेठेत कंपनीची भूमिका मजबूत करण्यासाठी स्थापन केले जात आहे.
भारतशक्तीने दिलेल्य वृत्तानुसार, एक वरिष्ठ भारतीय संरक्षण अधिकारी म्हणाले की, Embraer अनेक भारतीय संरक्षण खरेदी योजनांमध्ये सक्रियपणे सहभागी आहे, त्यात भारतीय हवाई दलाच्या मिडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट (MTA) प्रकल्पाचाही समावेश आहे.
“संयुक्त उपक्रमांबाबत गंभीर चर्चा सुरू आहेत,” असे त्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. “MTA आवश्यकतेच्या किमान एका टप्प्याचा करार Embraer मिळवू शकेल, अशी शक्यता आहे.”
इतर सहकार्याच्या क्षेत्रांमध्ये E145 विमानांची विक्री, हवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली, आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला पाठिंबा यांचा समावेश आहे—हे सर्व भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी सुसंगत आहेत.
आकाश आणि स्कॉर्पीन-श्रेणीच्या पाणबुड्या
विमानचालन क्षेत्राबरोबरच, दोन्ही देश संरक्षणाच्या काही महत्त्वाच्या प्रणालींमध्ये सहकार्याची शक्यता तपासत आहेत, जसे की आकाश-N जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आणि स्कॉर्पीन श्रेणीच्या पाणबुड्या. मात्र, माहिती विनिमय प्रोटोकॉल आणि सामंजस्य करार (MoUs) यांसारख्या मूलभूत करारांवर अद्याप चर्चा सुरू आहे.
“या गोष्टी कोणत्याही दीर्घकालीन आणि संरचित संरक्षण भागीदारीसाठी मूलभूत आहेत,” असे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
वरिष्ठ राजनैतिक सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ब्राझील सरकारने भारतीय ‘अवकाश’ प्रणालीसाठी अधिकृत माहिती विनंती (RFI) सादर केल्यानंतर, प्रणालीचे मूल्यांकन सुरू झाले आहे.
BharatShakti ने याआधीच अहवाल दिला आहे की, ब्राझील ‘आकाश’ प्रणालीला एक महत्त्वपूर्ण क्षमता वृद्धी म्हणून पाहत आहे. सध्या ब्राझीलच्या संरक्षण प्रणाली फक्त 3,000 मीटर उंचीपर्यंत धोके पाडू शकतात. त्यामुळे ब्राझीलच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सरकार ते सरकार प्रकारातील खरेदीचा प्रस्ताव दिला आहे. ही हालचाल त्यांची धोरणात्मक महत्त्वाकांक्षा दर्शवते.
संरक्षण व्यापारासाठी आर्थिक मदत: Exim बँकेची ब्राझीलमध्ये एन्ट्री
एक मोठी आर्थिक घडामोड म्हणजे, भारतीय निर्यात-आयात बँक (Exim Bank) लवकरच ब्राझीलमध्ये आपले पहिले कार्यालय सुरू करणार आहे. या कार्यालयामुळे लॅटिन अमेरिकेतील दीर्घकालीन आणि किफायतशीर संरक्षण निर्यात व संयुक्त उपक्रमांना वित्तपुरवठा सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे.
“ही हालचाल, भारताच्या 2029 पर्यंत $6 अब्ज संरक्षण निर्यात करण्याच्या उद्दिष्टाशी पूर्णतः सुसंगत आहे,” असे एका वरिष्ठ सूत्राने भारतशक्तीला सांगितले. “Exim बँकेची उपस्थिती, भारतीय संरक्षण निर्यातीला मूल्यसाखळीच्या उच्च स्तरावर नेण्यास मदत करेल,” असेही ते म्हणाले.
जहाजबांधणी आणि पाणबुडी तंत्रज्ञान सामायिकरण
‘जहाजबांधणी’ हे परस्पर सहकार्याचे आणखी एक आशादायक क्षेत्र म्हणून पुढे येत आहे. ब्राझीलचे अधिकारी भारतासोबत संयुक्तपणे युद्धनौका विकसित करण्यास इच्छुक आहेत, तसेच भारतीय अनुभव आणि सर्वोत्तम पद्धती अवलंबण्याची तयारीही दर्शवत आहेत. हे सहकार्य फ्रेंच डिझाईन असलेल्या स्कॉर्पीन पाणबुड्या वापरणाऱ्या देशांच्या Scorpène Club या मंचापर्यंत पोहोचू शकते.
“अधिक अनुभव आणि कौशल्य सामायिकरणाच्या दिशेने, क्षमता वृद्धी करण्याबाबत दोन्ही देश सकारात्मक आहेत,” असे सूत्रांनी सांगितले.
BEL चा ब्राझीलमध्ये प्रवेश
एक ऐतिहासिक पाऊल उचलत, भारताची सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण कंपनी ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ (BEL) रिओ डी जानेरोमध्ये आपले पहिले प्रादेशिक कार्यालय उघडण्याच्या तयारीत आहे. हे कार्यालय संरक्षण क्षेत्रात भागीदारी वाढवण्यासाठी आणि सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल.
अधिकाऱ्यांच्या मते, BEL आणि Embraer “नैसर्गिक भागीदार” आहेत, कारण दोघांच्याही इलेक्ट्रॉनिक प्रणालींमध्ये पूरक ताकदी आहेत—जे हवाई संरक्षण तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण सहकार्यास कारणीभूत ठरू शकते.
MKU: भारतीय संरक्षण निर्यात लॅटिन अमेरिकेत प्रवेश करत आहे
कानपूर स्थित भारतीय खासगी संरक्षण क्षेत्रातील कंपनी- MKU, गेल्या अनेक वर्षांपासून लॅटिन अमेरिकेत कार्यरत आहे.
भारतशक्तीशी खास संवाद साधताना, MKU चे आंतरराष्ट्रीय विक्री, धोरण, आणि व्यवसाय विकास विभागाचे उपाध्यक्ष- करण गुप्ता यांनी उघड केले की, “कंपनीने ब्राझील, चिली, उरुग्वे, इक्वाडोर आणि मेक्सिको यांसारख्या देशांना सुमारे $60 दशलक्ष किमतीचे संरक्षण उपकरणे निर्यात केली आहेत.”
“फक्त ब्राझीलमध्येच, आम्ही पोलिसांना 100,000 हून अधिक बुलेटप्रूफ जॅकेट्स, लष्कर व पोलिसांना बॅलिस्टिक हेल्मेट्स, आणि नाईट व्हिजन व थर्मल इमेजिंग डिव्हाइसेस पुरवले आहेत,” अशी माहिती गुप्ता यांनी दिली. ” उत्पादन क्षेत्रात अर्जेंटिना, ब्राझील, चिली, आणि उरुग्वे येथे विक्री करणारी आमची एकमेव भारतीय कंपनी आहोत,” असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “साओ पाउलो येथील इटाइम बिबी (Itaim Bibi) या आर्थिक जिल्ह्यात MKU ने एक समर्पित विक्री कार्यालय स्थापन करून आपली स्थानिक उपस्थिती मजबूत केली आहे.”
अर्जेंटिनाच्या बाबतीत गुप्ता यांनी नमूद केले की, “आर्थिक संकटामुळे खरेदी प्रक्रिया मंदावली होती, मात्र तरी आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करण्याच्या उद्दिष्टाने, सरकारने अलीकडे केलेल्या सुधारणांमुळे MKU ने पुन्हा अर्जेंटिनावर लक्ष केंद्रित केले आहे.”
“अर्जेंटिना आता पुनरुज्जीवनाच्या मार्गावर आहे,” असेही त्यांनी सांगितले. त्यांनी सरकारी खरेदी प्रक्रियेतील सुलभीकरण आणि उत्पादन मानकांतील सुधारणांचाही यावेळी उल्लेख केला.
by- हुमा सिद्दकी