अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी, Russia-Ukraine War संपवण्याबाबत चर्चा करणार आहेत. दरम्यान, युरोपियन नेत्यांनी क्रेमलिनला त्वरित युद्धविरामासाठी सहमती देण्याचे आवाहन केले आहे, जे दुसऱ्या महायुद्धानंतरचे या भागातील सर्वात प्राणघातक युद्ध ठरले आहे.
पुतीन यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये, हजारो रशियन सैनिक युक्रेनमध्ये पाठवले, ज्यामुळे 1962 च्या क्युबन मिसाईल संकटानंतर रशिया आणि पश्चिम देशांमध्ये सर्वात गंभीर संघर्ष सुरू झाला.
आपल्याला शांतीदूत म्हणून ओळखले जावे, अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या ट्रम्प यांनी वारंवार युक्रेनमधील “रक्तपात” थांबवण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प प्रशासनाने या संघर्षाला अमेरिका आणि रशियामधील एक प्रतिनिधीक युद्ध (proxy war) असे संबोधले आहे.
ट्रम्पच्या दबावामुळे, पुतीन यांनी थेट चर्चांचा प्रस्ताव दिल्यानंतर आणि युरोप तसेच युक्रेनने तातडीच्या युद्धविरामाची मागणी केल्यानंतर, दोन्ही देशांचे प्रतिनिधी गेल्या आठवड्यात मार्च 2022 नंतर प्रथमच इस्तंबूलमध्ये भेटले.
ट्रम्प यांना ‘रक्तपात’ थांबवायचा आहे
डोनाल्ड ट्रम्प यांनी, Truth Social या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “पुतिन यांच्यासोबतच्या या संवादाचा उद्देश, दर आठवड्याला सरासरी 5,000 रशियन आणि युक्रेनीयन सैनिक मृत्युमुखी पडत असलेला ‘रक्तपात’ थांबवण्याबाबत आणि व्यापारविषयक चर्चा करणे हा आहे.”
“आशा आहे की हा दिवस फलदायी ठरेल, युद्धविराम लागू होईल आणि हे अत्यंत हिंसक युद्ध – जे मुळात सुरूच होऊ नये असे होते ते संपेल,” असे ट्रम्प यांनी त्यामध्ये नमूद केले आहे.
ट्रम्प यांनी असेही म्हटले की, “जोपर्यंत ते आणि पुतीन यांना प्रत्यक्ष भेटत नाहीत, तोपर्यंत शांततेविषयी ठोस प्रगती होणे कठीण आहे.” ते सोमवारी सकाळी 10 वाजता (ईस्टर्न टाईम, 14.00 GMT) पुतीन यांच्याशी संवाद साधणार आहेत. क्रेमलिनने सांगितले की, “या विशेष कॉलसाठी तयारी सुरू आहे.”
ट्रम्प यांनी सांगितले की, “ते युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की आणि NATO मधील इतर सदस्य देशांच्या नेत्यांशीही चर्चा करतील. जर रशियाने शांततेच्या चर्चांना गांभीर्याने घेतले नाही, तर त्यांच्यावर आणखी निर्बंध लागू केले जातील.”
पुतीन, ज्यांचे सैन्य सध्या युक्रेनच्या सुमारे पाचव्या भागावर नियंत्रण ठेवून आहे आणि पुढे सरकत आहे, त्यांनी सार्वजनिक आणि खाजगी दबाव असूनही युद्ध संपवण्यासाठी आपले अटींचे धोरण कायम ठेवले आहे.
रविवारी, रशियाने युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनवर मोठा ड्रोन हल्ला केला आहे.
युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेने असा दावा केला आहे की, ‘रशिया रविवारी इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल डागण्याचा हेतू बाळगून होता, मात्र रशियाने याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही.’
जून 2024 मध्ये, पुतीन यांनी सांगितले होते की, ‘युक्रेनने NATO सदस्यत्वाचा दावा अधिकृतपणे मागे घ्यावा आणि रशिया जे चार युक्रेनी भाग आपले म्हणतो, तिथून युक्रेनी सैन्याने माघार घ्यावी.’
अमेरिका-युरोप चर्चा
“रविवारी, ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांनी अमेरिका, इटली, फ्रान्स आणि जर्मनीच्या नेत्यांबरोबर रशियाच्या युक्रेनवरील युद्धाबाबत चर्चा केली,” असे डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने सांगितले.
“आता पुतीन यांनी शांततेसाठी आपली इच्छा दर्शवली पाहिजे. ट्रम्प यांनी सुचवलेला आणि युक्रेन व युरोपने पाठिंबा दिलेला 30 दिवसांचा कोणतीही अट नसलेला युद्धविराम त्यांनी स्विकारला पाहिजे,” असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रविवारी झालेल्या कॉलनंतर X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले.
पुतीन युद्धविरामाबाबत साशंक आहेत आणि ते म्हणतात की, ‘काही अत्यंत महत्त्वाच्या अटींबाबत स्पष्टता येत नाही किंवा त्या सोडवल्या जात नाहीत तोपर्यंत लढाई थांबवता येणार नाही.’
युरोपियन नेत्यांचे म्हणणे आहे की, “पुतीन शांततेसाठी गंभीर नाहीत. मात्र, त्यांना भीती आहे की ट्रम्प आणि पुतीन मिळून युक्रेनवर एक सक्तीचा शांतता करार लादतील, ज्यामुळे युक्रेनचा पाचवा भागही गमावला जाईल आणि भविष्यातील रशियन हल्ल्यांपासून त्याचे संरक्षणही कमी होईल.”
माजी अमेरिकन अध्यक्ष जो बायडन, पाश्चात्त्य युरोपीय नेते आणि युक्रेन यांनी, रशियन आक्रमणाला ‘एक साम्राज्यवादी भूमी बळकावण्याचा प्रयत्न’ म्हणून संबोधले आहे. त्यांनी वारंवार सांगितले आहे की, ‘रशियन सैन्याचा पराभव करणे आवश्यक आहे, कारण ते एखाद दिवशी NATO वरही हल्ला करू शकते.’ मात्र त्यांचा हा आरोप मॉस्कोने फेटाळला आहे.
पुतीन म्हणतात की, “हे युद्ध रशिया आणि पश्चिम देशांतील संबंधांमध्ये एक निर्णायक वळण आहे. 1991 मध्ये सोव्हिएत युनियन कोसळल्यानंतर पश्चिमेकडील देशांनी NATOचा विस्तार करून आणि युक्रेनसारख्या भागांमध्ये हस्तक्षेप करून रशियाचा अपमान केला होता.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)