अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ॲडव्हान्स स्टेजच्या प्रोस्टेट कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले आहे. प्रोस्टेट कॅन्सरचे सेल त्यांच्या हाडांपर्यंत पसरले आहेत असे त्यांच्या कार्यालयाने रविवारी एका निवेदनात जाहीर केले.
82 वर्षीय बायडेन यांना मूत्रदाहाची लक्षणे जाणवल्यानंतर करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत शुक्रवारी कॅन्सरचे निदान झाले. ते आणि त्यांचे कुटुंब डॉक्टरांशी उपचारांच्या पर्यायांचा आढावा घेत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
“या आजाराचे हे अधिक आक्रमक रूप आहे, मात्र कॅन्सर हार्मोन-संवेदनशील असल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे त्याचे प्रभावीपणे नियंत्रण करता येईल अशी शक्यता व्यक्त होत आहे,” असे त्यांच्या कार्यालयाने कळवले आहे.
ज्या कर्करोगाचा प्रसार झाला आहे किंवा मेटास्टेसाइज्ड आहेत, तो 4 थ्या टप्प्यात असून सर्वात प्रगत मानला जातो. बहुतेक प्रोस्टेट कॅन्सर हे सुरुवातीच्या टप्प्यात आढळतात.
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, 2021 मध्ये निदान झालेल्या प्रोस्टेट कर्करोगाच्या 2 लाख 36 हजार 659 प्रकरणांपैकी 70 टक्के प्रकरणांमध्ये कॅन्सर प्रोस्टेटच्या पलीकडे पसरण्यापूर्वी निदान झाले होते. त्या वर्षी प्रोस्टेट कॅन्सरच्या सुमारे 8 टक्के नवीन निदानांमध्ये प्रगत-टप्प्यातील रोगाचा समावेश होता.
बायडेन यांचे शारीरिक आरोग्य आणि मानसिक अवस्था यामुळे त्यांच्या 2021-2025 अध्यक्षपदाच्या काळात बराच काळ उलटसुलट चर्चा सुरू होती. आपले विरोधक रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्धच्या चर्चेदरम्यानची सुमार कामगिरी बघितल्यानंतर काही आठवड्यांनी त्यांच्या सहकारी डेमोक्रॅट्समध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर गेल्या जुलैमध्ये त्यांनी निवडणुकीच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा अचानक निर्णय घेतला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली सहानुभूती
जानेवारीमध्ये पदभार स्वीकारल्यापासून बायडेन यांच्यावर वारंवार टीका करणारे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रविवारी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एका पोस्टमध्ये बायडेन आणि त्यांची पत्नी जिल यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली.
“जो बायडेन यांच्या अलिकडच्या वैद्यकीय निदानाबद्दल ऐकून मेलानिया आणि मला दुःख झाले आहे,” असे त्यांनी फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांचा उल्लेख करत लिहिले. “आम्ही जिल आणि त्यांच्या कुटुंबाला आमच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि जो लवकर आणि यशस्वीरित्या बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे.”
खूप जास्त धोका
प्रोस्टेट कॅन्सर हा 1 ते 10 पर्यंत ग्लीसन स्कोअरवर तपासला जातो. यामध्ये निरोगी पेशींच्या तुलनेत कॅन्सरच्या पेशी किती वेगळ्या दिसतात याचा आढावा घेतला जातो. बायडेन यांचा स्कोअर 9 आहे, याचा अर्थ त्यांचा कॅन्सर धोकादायक स्तरापर्यंत पोहोचला आहे.
एनवाययू लँगोन येथील युरोलॉजिस्ट डॉ. हर्बर्ट लेपोर म्हणाले की नऊ गुण “खूप जास्त धोका” आहे, परंतु मेटास्टॅटिक प्रोस्टेट कर्करोगासहही बरेच पुरुष “पाच ते १० वर्षे आणि त्याहून अधिक” जगू शकतात.
“गेल्या दशकात, प्रगत प्रोस्टेट कॅन्सरच्या उपचारांमध्ये अनेक नवे शोध लागले आहेत,” असे ते म्हणाले.
नॉर्थवेस्टर्न हेल्थ नेटवर्कच्या कर्करोग कार्यक्रमाचे वैद्यकीय संचालक डॉ. ख्रिस जॉर्ज म्हणाले की प्रोस्टेट कॅन्सर हाडांमध्ये पसरल्यानंतर आता बरा होत नाही परंतु त्यावर नियंत्रण ठेवू शकणारे उपचार उपलब्ध आहेत.
कॅन्सर मूनशॉट
“जो एक लढाऊ आहे — आणि मला माहित आहे की तो या आव्हानाला त्याच ताकदीने, लवचिकतेने आणि आशावादाने तोंड देईल ज्या ताकदीचे प्रतिबिंब त्यांच्या जीवन आणि नेतृत्वात नेहमीच दिसून आले आहे,” असे कमला हॅरिस यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
2015 मध्ये बायडेन यांचा मुलगा ब्यू बायडेन याचे मेंदूच्या कॅन्सरमुळे निधन झाले.
2022 मध्ये, बायडेन यांनी पुढील 25 वर्षांत कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण किमान 50 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न करत ओबामा यांच्या काळातील कॅन्सर मूनशॉट कार्यक्रम पुन्हा सुरू केला.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)