स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने गाझा पट्ट्यात केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये (Israel Airstrikes), किमान 100 पॅलेस्टिनियन नागरिक ठार झाले. हे हल्ले त्या वेळी सुरू होते, जेव्हा इस्रायल आणि हमास यांच्यात मध्यस्थांच्या उपस्थितीत, युद्धविरामाबाबत नवीन फेरीची चर्चा सुरू होती.
दरम्यान, इस्रायली लष्कराकडून याविषयी तत्काळ प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, त्यांनी गाझा पट्ट्यात हल्ल्यांचा विस्तार करत शेकडो नागरिकांचा जीव घेतला आहे. हे हल्ले एका नवीन भूदल मोहिमेच्या तयारीचा भाग असल्याचे मानले जाते, ज्याचा उद्देश गाझाच्या काही भागांमध्ये “ऑपरेशनल नियंत्रण” मिळवणे हा आहे.
गाझा आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते- खालिल अल-दिक्रान यांनी रॉयटर्सला फोनवरुन सांगितले की, “रात्रीपासून आतापर्यंत किमान 100 लोक या हल्ल्यात मरण पावले आहेत. इस्रायली बॉम्बहल्ल्यांमुळे संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब नागरी नोंदणी यादीतून पूर्णपणे मिटून गेली आहेत.”
मार्चपासून इस्रायलने गाझात औषधे, अन्न आणि इंधन यांची पुरवठा व्यवस्था थांबवली आहे, ज्याचा उद्देश हमासवर दबाव टाकून इस्रायली बंदीवानांची सुटका करवून घेणे आहे. इस्रायलकडून गाझा पट्टा पूर्णपणे ताब्यात घेण्याच्या आणि मदत नियंत्रित करण्याच्या योजनांनाही मंजुरी मिळाली आहे.
हमासने आधीच सांगितले आहे की, तो केवळ इस्रायली युद्धविरामाच्या मोबदल्यातच बंधकांची सुटका करेल.
इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थांनी अमेरिकेच्या समर्थनासह, शनिवारी दोहा येथे, दोन्ही पक्षांमध्ये अप्रत्यक्ष युद्धविराम चर्चेची नवीन फेरी सुरू केली. मात्र, रॉयटर्सशी बोलताना चर्चेशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, “या चर्चेने अद्याप कोणताही ठोस प्रगतीचा टप्पा गाठलेला नाही.”
एक पॅलेस्टिनियन अधिकारी, जे या चर्चांमध्ये सहभागी आहे, ते म्हणाले की: “हमास बंदीवानांच्या संख्येबाबत लवचिक आहे, पण समस्या कायम आहे ती म्हणजे इस्रायल युद्ध संपवण्याच्या बांधिलकीवर.”
ब्रिटनच्या स्काय न्यूज अरबीका आणि बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, हमासने सुमारे निम्मे इस्रायली बंधक, दोन महिन्यांच्या युद्धविराम आणि इस्रायलच्या तुरुंगांतील पॅलेस्टिनियन कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे.
रॉयटर्सशी बोलताना हमासच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की: “इस्रायलचा दृष्टिकोन बदललेला नाही. ते त्यांचे बंदीवान परत हवे आहेत, पण युद्ध संपवण्याच्या कोणत्याही वचनाशिवाय.”
शनिवारी रात्री झालेल्या हल्ल्यांपैकी, एका हल्ल्यात दक्षिण गाझामधील खान युनिस येथील, विस्थापित कुटुंबांसाठीची छावणी नेस्तनाभूत केली, जिथे महिला आणि लहान मुलांसह अनेकजण ठार झाले, बरेच लोक जखमी झाले आणि काहींच्या तंबूंना आग लागली.
हमासने या हल्ल्याला ‘एक नवीन क्रूर गुन्हा’ असे संबोधले आणि त्यासाठी अमेरिका प्रशासनाला जबाबदार धरले.
रविवारी सकाळी ठार झालेल्या लोकांमध्येस 3 पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, “उत्तर गाझामधील एका कुटुंबातील किमान 20 सदस्यांचा मृत्यू झाला आहे.”
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये माजी हमास प्रमुख- येह्या अल-सिनवार यांचे भाऊ झकारिया अल-सिनवार आणि त्यांची तीन मुले सेंट्रल गाझामध्ये मारली गेली. झकारिया एक विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक होते.
गाझातील आरोग्य व्यवस्था जवळपास कोलमडली आहे, इस्रायली बॉम्बहल्ले आणि रुग्णालयांवर झालेल्या धाडीतून ती पूर्णतः ठप्प झाली आहे. मदत कार्यावरील निर्बंधांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे आणि उपासमारीत वाढ झाली आहे, ज्यासाठी इस्रायल हमासला जबाबदार ठरवत आहे.
“रुग्णालये जखमींच्या वाढत्या संख्येमुळे गजबजली आहेत, त्यात अनेक लहान मुले आहेत. रुग्णालये स्वतःच अनेकदा हल्ल्याची टार्गेट झाली आहेत, औषधांचा प्रचंड तुटवडा भासतो आहे,” असे दिक्रान यांनी सांगितले.
शनिवारी इस्रायली लष्कराने निवेदनात म्हटले की, “ते गाझामधील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले करत आहेत, जे त्यांच्या युद्ध उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठीचा भाग आहे.”
इस्रायलने जाहीर केले आहे की, “गाझामध्ये त्यांचा अंतिम उद्देश म्हणजे हमासच्या लष्करी आणि प्रशासकीय क्षमतेचा संपूर्ण नाश करणे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी, हमासने इस्रायली गावांवर हल्ला केला होता, ज्यात सुमारे 1,200 लोक ठार झाले आणि सुमारे 250 लोकांना बंदी बनवण्यात आले.”
इस्रायली सैनिकी मोहिमेने गाझा पट्टा उद्ध्वस्त केला असून, जवळपास सर्व रहिवाशांना त्यांच्या घरांमधून विस्थापित केले आहे. गाझा आरोग्य अधिकाऱ्यांनुसार, आतापर्यंत 53,000 पेक्षा अधिक लोक ठार झाले आहेत.
लष्करी दबावामुळे, इस्रायलचे गाझावरील निर्बंध शिथिल
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने रविवारी सांगितले की, “इस्रायल गाझामध्ये मर्यादित अन्नपुरवठ्याला परवानगी देणार आहे. ही घोषणा त्यानंतर करण्यात आली, जेव्हा इस्रायली लष्कराने गाझाच्या उत्तर आणि दक्षिण भागात ‘विस्तृत भू-सैनिकी मोहिम’ राबवण्याची माहिती दिली.”
मार्चपासून लागू करण्यात आलेल्या, मदतीवरील निर्बंधांवर होणाऱ्या तीव्र टीकेनंतर आणि उपासमारीचा धोका वाढल्यानंतर, इस्रायलने गाझातील मोहिमेचा वेग वाढवला आहे.
नेतान्याहू यांच्या कार्यालयाने म्हटले की, “IDF (इस्रायल डिफेन्स फोर्सेस) च्या शिफारसीवर आणि हमासचा पराभव करण्यासाठी युद्धाचा विस्तार करण्याच्या गरजेनुसार, गाझा पट्ट्यात उपासमारीची परिस्थिती उद्भवू नये यासाठी इस्रायलकडून मूलभूत अन्नपुरवठ्याला परवानगी देण्यात येईल.”
यूएनचे मदत प्रमुख टॉम फ्लेचर, यांचे प्रवक्ते एरी कानेको यांनी सांगितले की, “इस्रायली अधिकाऱ्यांनी एजन्सीशी मर्यादित मदत वितरण पुन्हा सुरू करण्याबाबत संपर्क साधला आहे. त्यावर परिस्थीतीचा आढावा घेत लॉजिस्टिक्स संदर्भात चर्चा सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ठोस प्रगती नाही
कतारमध्ये इस्रायल आणि हमास, यांच्यात सुरू असलेल्या अप्रत्यक्ष चर्चांमध्ये कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही, असे दोन्ही बाजूंनी नमूद केले आहे.
नेतान्याहू यांनी सांगितले की, “या चर्चांमध्ये युद्धविराम, बंधकांची देवाणघेवाण आणि हमासच्या नेत्यांना देशाबाहेर पाठवणे तसेच गाझाचे असैनिकीकरण यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली, मात्र हमासने या अटी आधीच फेटाळल्या आहेत.”
पुढील निवेदनात इस्रायली लष्कराने असे सुचवले की, “दोहा करारासाठी सैनिकी मोहिमेचा वेग काही प्रमाणात कमी केला जाऊ शकतो.” तर, लष्करप्रमुख एयाल झामीर यांनी गाझामधील सैनिकांना सांगितले की, “बंधकांची देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी लष्कर सरकारला आवश्यक मदत करेल”
नुकसानीचे सत्र
इस्रायलमधील एक बंधक- माटन झांगाउकर यांच्या आई ऐनाव झांगाउकर, यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, “इस्रायली सरकार राजकीय कारणांमुळे युद्ध संपवण्यास नकार देत आहे. सरकार केवळ अर्धवट करारांवर अडून बसले आहे. ते आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. आमच्या मुलांची आणि सर्व 58 बंधकांची सुखरुप सुटका करा.”
रविवारी उशिरा गाझा आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, “उत्तर गाझामधील इंडोनेशियन रुग्णालय, जे काही प्रमाणात कार्यरत होते, ते इस्रायली गोळीबारामुळे बंद करण्यात आले.”
माध्यमांनी दिलेल्या वृत्तांमध्ये, हमासचा नेता मोहम्मद सीनवार- गेल्या आठवड्यातील हवाई हल्ल्यांत ठार झाल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र हमासने अद्याप याची अधिकृत पुष्टी केलेली नाही.
गाझातील आरोग्य व्यवस्था जवळपास कोलमडली आहे. मदतीवरील निर्बंधांमुळे अडचणी अधिक गंभीर झाल्या आहेत.
पॅलेस्टिनियन सिव्हिल इमर्जन्सी सर्व्हिसने सांगितले की, “इंधन टंचाईमुळे त्यांच्या 75% रुग्णवाहिका कार्यरत राहू शकत नाहीत. पुढील 72 तासांत सर्व वाहने बंद पडतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)