शनिवारी रात्री, मेक्सिकन नौदलाच्या एका प्रशिक्षण जहाजाने न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध Brooklyn ब्रीजला धडक दिली, ज्यात किमान 2 जणांचा मृत्यू झाला आणि 17 जण जखमी झाले, अशी माहिती न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिली.
अपघाताच्या व्हायरल व्हिडिओजमध्ये, “क्वाउटेमोक्र” नीवाचे रोषणाईने सजलेले हे प्रशिक्षण जहाज, ईस्ट रिव्हरवरील त्या प्रसिद्ध पुलाच्या दिशेने जाताना दिसत आहे, जो मॅनहॅटन आणि ब्रुकलिन या दोन भागांना जोडतो.
147 फूट (45 मीटर) उंचीचे हे जहाज पुलाखाली येताच, जहाजावरील झेंडे पुलाला आदळून मोडून पडले. हे जहाज अॅझटेक सम्राट क्वाउटेमोक्र यांच्या नावावर आहे.
दरम्यान, मेक्सिकन नेव्हीने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे की, “या अपघातात जहाजावरील 22 जण जखमी झाले, त्यापैकी 19 जण स्थानिक रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि 3 जण गंभीर जखमी आहेत.”
“कोणताही प्रवासी पाण्यात पडला नाही, त्यामुळे बचावकार्याची गरज भासली नाही,” असेही नौदलाने स्पष्ट केले.
रविवारी सकाळी अॅडम्स यांनी “X” (पूर्वीचं ट्विटर) वर सांगितले की, “जहाजावरील एकूण 277 प्रवाशांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.”
अपघातानंतर पांढऱ्या गणवेशातले नौदल कॅडेट्स जहाजाच्या क्रॉसबीमवर लटकलेले दिसत होते.
“कोणीही पाण्यात पडले नाही; सगळे जखमी जहाजाच्या आतच होते,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
त्या अधिकाऱ्याने सांगितले की, “काही तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना झाली असावी, मात्र त्याबद्दल अधिक माहिती दिली नाही.”
न्यूयॉर्क सिटीच्या साउथ स्ट्रीट सीपोर्टजवळील ब्रिजच्या एका बाजूला, जहाज पुलावर आदळल्यावर आणि डॉककडे वळल्यानंतर लोक भीतीने पळताना व्हायरल व्हिडिओंमध्ये दिसत आहेत.
ब्रुकलिन ब्रिज, जो 1883 मध्ये बांधून पूर्ण झाला आणि एकेकाळी तो जगातील सर्वात मोठा सस्पेन्शन ब्रिज होता. हा पुल मॅनहॅटन आणि ब्रुकलिन यांना जोडणारा एक मुख्य मार्ग आणि प्रसिद्ध पर्यटक आकर्षण आहे.
न्यूयॉर्कच्या परिवहन विभागाने सांगितले की, “पुलाला कोणतीही मोठी हानी झाली नाही आणि प्राथमिक तपासणीनंतर दोन्ही दिशेचा वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.”
याआधी, मेक्सिकोच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर सांगितले की, “अमेरिकेतील मेक्सिकोचे राजदूत आणि इतर अधिकारी जखमी कॅडेट्सना मदत करत आहेत आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत.”
“क्वाउटेमोक्र” हे प्रशिक्षण जहाज 1981 मध्ये, स्पेनमधील बिळबाओ येथील सेलाया शिपयार्डमध्ये बांधले गेले होते. साउथ स्ट्रीट सीपोर्ट म्युझियमच्या मते, ‘हे जहाज न्यूयॉर्क भेटीदरम्यान सार्वजनिक दर्शनासाठी खुले करण्यात आले होते आणि ही भेट शनिवारी संध्याकाळी संपणार होती.’
हे जहाज त्या संध्याकाळी न्यूयॉर्कहून निघून आइसलँडकडे जात होते, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)