अरबी समुद्रात भारत-ब्रिटनमधील ऐतिहासिक नौदल सराव: कोकण 2025

0

भारत आणि ब्रिटनमधील संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या उद्दिष्टाने, अरबी समुद्रात राबवण्यात आलेल्या ‘कोकण 2025’ या नौदल सरावात, भारताची ‘आयएनएस विक्रांत’ आणि ब्रिटनची ‘एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स’ या विमानवाहू जहाजांनी प्रथमच एकत्र घेतला. ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टारमर बुधवारी मुंबईत दाखल झाले असून, अरबी समुद्रात हा उच्च-तीव्रतेचा सागरी सराव सुरू आहे. हा सराव म्हणजे द्विपक्षीय नौदल सहकार्यातील एक महत्त्वाचा क्षण आहे, जो इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सुरक्षिततेसाठी आणि जलवाहतुकीच्या स्वातंत्र्यासाठी असलेल्या दोन्ही देशांच्या सामायिक वचनबद्धतेला अधोरेखित करतो.

कॅरियर (वाहक) सहकार्यातील एक मैलाचा दगड

भारतीय नौदल आणि ब्रिटनची रॉयल नेव्ही यांच्यातील हे पहिलेच कॅरियर-टू-कॅरियर ऑपरेशन आहे, जे जटिल हवाई आणि समुद्री ऑपरेशन्समध्ये समन्वय साधण्याची त्यांची क्षमता दर्शवते. यूके कॅरियर स्ट्राइक ग्रुप 25 (UK CSG-25) चे प्रमुख असलेल्या HMS Prince of Wales जहाजासोबत, भारताच्या स्वदेशी बनावटीचे वाहक INS Vikrant ची उपस्थिती, भारत आणि ब्रिटनच्या लष्करी सहभागाची विस्तृत व्याप्ती आणि प्रगतीवर प्रकाश टाकते.

या सरावाच्या निमित्ताने, प्रथमच भारताचे मिग-29K लढाऊ विमान आणि ब्रिटनचे यूएस-निर्मित एफ-35B स्टेल्थ विमान सामायिक ऑपरेशनल वातावरणात उड्डाण करत आहेत, जे वाहक इंटरऑपरेबिलिटी आणि क्रॉस-डेक सिनर्जीच्या दिशेने एक अभूतपूर्व पाऊल आहे.

कोकण 2025: आतापर्यंतचा सर्वात विस्तृत सराव

या वर्षीचा ‘कोकण सराव’ हा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी सराव आहे. भारत आणि युके व्यतिरिक्त, जपान आणि नॉर्वेमधील नौदल संसाधनेसुद्धा या सरावाच्या काही टप्प्यात सामील झाल्या आहेत, जे मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी वचनबद्ध असलेल्या समान विचारसरणीच्या सागरी शक्तींच्या वाढत्या सहकार्याचे प्रतिबिंब आहे.

5 ते 12 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलेला हा सराव दोन टप्प्यात पार पडेल.

हार्बर टप्पा – यामध्ये व्यावसायिक देवाणघेवाण, सामरिक नियोजन, क्रॉस-डेक भेटी आणि दोन्ही देशातील नागरी संबंध मजबूत करण्यासाठी सांस्कृतिक संवादांवर लक्ष केंद्रित केले जाते.

सागरी टप्पा – यामध्ये वायुदलविरोधी, पृष्ठभागविरोधी आणि पाणबुडीविरोधी युद्धसराव, प्रगत विमानवाहू नौकांची ऑपरेशन्स, तसेच अनेक क्षेत्रांमध्ये संयुक्त रणनैतिक हालचाली यांचा समावेश असतो.

धोरणात्मक संदेश: भागीदारीची प्रत्यक्ष अंमलबजावणी

कोकण 2025 सराव, हा केवळ प्रतिकात्मक सहकार्यापुरता मर्यादित नाही, तर तो नवी दिल्ली आणि लंडन यांच्या सागरी क्षेत्रातील धोरणात्मक एकात्मतेला अधोरेखित करतो. अरबी समुद्रातील दोन्ही देशांच्या विमानवाहू जहाजांची एकत्रित उपस्थिती- संयुक्त प्रतिबंध, ऑपरेशनल तयारी आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी दोन्ही बाजूंची सामायिक जबाबदारी दर्शवते.

जगातिक पातळीवर सामरिक संतुलने बदलत असताना आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्र नवीन रणनीतिक केंद्र म्हणून उदयास येत असताना, भारत आणि ब्रिटन हे विश्वसनीय सुरक्षा भागीदार म्हणून आपले स्थान निश्चीत करत आहेत, जे भविष्यात एकत्रितपणे संकटांचा सामना करु शकतात आणि महत्त्वाच्या व्यापारी मार्गांवर सुरक्षित समुद्री वाहतूक सुनिश्चित करू शकतात.

सागरी प्रभावाचा विस्तार आणि भविष्यातील दृष्टीकोन

हा सराव, जून 2025 मध्ये दोन्ही नौदलांदरम्यान झालेल्या PASSEX सहभागानंतर होतो आगे. 14 ऑक्टोबर रोजी, होणाऱ्या संयुक्त भारत-यूके हवाई दलाच्या सरावाआधी होत असलेला हा सराव, द्विपक्षीय संबंधांमध्ये अभूतपूर्व असलेला एकात्मिक भू-समुद्र-हवाई सहभाग अधोरेखित करतो.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील यूकेची वाढती उपस्थिती, शाश्वत आणि दीर्घकालीन प्रादेशिक सहभागाची दृढ कल्पना प्रतिबिंबित करते, ज्यामध्ये नौदल संसाधनांची पुढील तैनाती आणि भारतासोबत प्रादेशिक सागरी सुरक्षा केंद्राची उत्कृष्टता स्थापन करणे या उद्दिष्टांचा समावेश आहे.

मूळ लेखिका- हुमा सिद्दिकी

+ posts
Previous articleट्रम्प यांच्या गाझा युद्धविराम करारावर, इस्रायल आणि हमासची सहमती
Next articleपुढील वर्षी ब्रिटन पुन्हा झळकणार बॉलीवूडच्या रूपेरी पडद्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here