फिलीपिन्समध्ये भूकंपाचा हाहाकार, 69 जणांनी गमावले प्राण

0

मध्य फिलीपिन्समध्ये आलेल्या 6.9 रिश्टर स्केलच्या तीव्र भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, आतापर्यंत 69 लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. नुकसानग्रस्त भागात बचावलेल्या नागरिकांचा शोध घेण्यातचे काम तात्काळ सुरू झाले असून, वीज आणि पाण्याची सेवा पुनर्संचयित करण्यासाठी सरकारी यंत्रणा कार्यरत आहेत, अशी माहिती आपत्ती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या आसपास, किनारपट्टीवरील उथळ भूकंप केंद्राजवळ आणि सेबू प्रांताच्या उत्तरेकडील बोगो शहरात, भूकंपाचे तीव्र धक्के बसले. या भागातील “रूग्णालये त्यावेळी अक्षरश: गजबजलेली होती”, असे नागरी संरक्षण विभागाचे अधिकारी रॅफी अलेजांद्रो यांनी पत्रकारांना सांगितले.

भूकंपाचा परिणाम इतका भीषण होता की, त्यामध्ये 69 लोकांचा मृत्यू झाला. सेबू प्रांतीय आपत्ती कार्यालयाच्या ही आकडेवारी प्रसिद्ध केली असून, अद्याप त्याची पडताळणी सुरू आहे, असे प्रादेशिक नागरी संरक्षण कार्यालयातील माहिती अधिकारी जेन अबापो यांनी सांगितले. एका अन्य अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, भूकंपामुळे 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

राष्ट्रपतींकडून मदतीचे आश्वासन

फिलीपिन्सचे राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर, यांनी भूकंपातून बचावलेल्या नागरिकांना तात्काळ मदत पुरवण्याचे आश्वासन दिले असून, बचावकार्यांबाबत समन्वय साधण्यासाठी मंत्रिमंडळातील सचिव घटनास्थळी उपस्थित असल्याचेही त्यांनी जाहीर केले. या भूंकपात ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले, त्यांच्याप्रती पंतप्रधानांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या.

फिलीपिन्समधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या, सेबू शहराची लोकसंख्या सुमारे 3.4 दशलक्ष इतकी आहे. भूकंपामुळे या भागाचे नुकसान झाले असले तरी, इथले मॅकतान-सेबू आंतराष्ट्रीय विमानतळ अजूनही कार्यरत आहे. हे विमानतळ देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ म्हणून ओळखले जाते.

भूकंपामुळे सॅन रेमिजिओ शहराचेही खूप मोठे नुकसान झाले. या भागातील मदत कार्य सुलक्ष व्हावे याकरिता, येथे ‘आपत्तीजन्य स्थिती’ घोषित करण्यात आली आहे. महापौर अल्फी रेनेस यांनी स्थलांतरित नागरिकांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करण्याबाबत मागणी केली असून, बचावकार्य करणाऱ्या पथकांना अवजड यंत्रसामग्रीची आवश्यकता असल्याचेही सांगितले आहे.

रेनेस यांनी DZMM या रेडिओ स्टेशनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “भूकंपामुळे बाधित झालेल्या क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतो आहे, वीजपुरवठा खंडित झाला आहे, त्यामुळे याठिकाणी, विशेषत: उत्तर भागात मदतीची नितांत गरज आहे. भूकंपामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या लाईन्स तुटल्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवला आहे.”

नजीकच्या पिलार गावातील रहिवासी आर्चेल कोराझा, यांनी DZMM रेडिओवर बोलताना सांगितले की, “ज्यावेळी भूकंपाचे धक्के बसले, त्यावेळी कुटुंबातील बहुतांश लोक गाढ झोपेत होते. मी त्यांनी उठवले आणि त्वरिर रस्त्याच्या दिशेने धाव घेतली.” समुद्रकिनाऱ्याजवळ राहणाऱ्या कोराझा यांनी, भूकंपानंतर समुद्राचे पाणी मागे सरकताना पाहिल्याचे देखील सांगितले.

भीतीचे वातावरण आणि प्रचंड नुकसान

भूकंपादरम्यान, जमीन हादरतानाचे तसेच इमारती कोसळल्याचे काही व्हिडिओ स्थानिक माध्यमांनी पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये, एक 100 वर्षांहून अधिक प्राचीन चर्चही कोलमडताना दिसत आहे.

रेनेस यांच्या म्हणण्यानुसार, भूकंपात मृत पावलेल्यांमधील काहीजण हे त्यावेळी, सॅन रेमिजिओमधील एका क्रीडा संकुलात बास्केटबॉल खेळत होते. भूकंपामुळे हे संकुल अर्धवट कोसळले.

भूकंपाची खोली सुमारे 10 किमी (6.2 मैल) असल्याचे तसेच अनेक आफ्टरशॉक हादरे बसल्याचे, भूकंप निरीक्षण संस्थांनी नोंदवले आहे. सर्वात शक्तिशाली धक्का 6.9 रिश्टर स्केलचा होता. सुदैवाने, भूकंपानंतर त्सुनामीचा धोका उद्भवला नाही.

फिलीपिन्स पॅसिफिक हा प्रदेश ‘रिंग ऑफ फायर’मध्ये आहे, जिथे ज्वालामुखी आणि भूकंपाच्या घटना सामान्य आहेत. याचवर्षी जानेवारी महिन्यामध्ये, देशात दोन मोठे भूकंप झाले होते, ज्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्याआधी 2023 मध्ये, किनाऱ्यालगत झालेल्या 6.7 रिश्टर स्केलच्या भूकंपात 8 लोकांचा मृत्यू झाला होता.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleबांगलादेशी आणि नेपाळी विद्यार्थी व्हिसाबाबत डेन्मार्कची कडक भूमिका
Next articleFourth GE Engine Lands, But HAL’s Tejas Delivery Bottleneck Remains

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here