पुतिन यांच्यावरील कथित हल्ल्याबाबत ड्रोनमधील डेटावरुन वाद वाढला

0
ड्रोनमधील

गुरुवारी, रशियाच्या एका वरिष्ठ लष्करी प्रमुखांनी, अमेरिकेच्या मिलिटरी अटॅची अर्थात लष्करी दूताकडे युक्रेनियन ड्रोनचा एक भाग सोपवला. रशियाचा असा दावा आहे की, या आठवड्याच्या सुरुवातीला युक्रेनच्या लष्कराने रशियन राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाला लक्ष्य केले होते, हे या ड्रोनमधील डेटावरून हे सिद्ध होते.

सोमवारी, मॉस्कोने कीव्हवर आरोप केला होता की, त्यांनी 91 लांब पल्ल्याच्या अटॅक ड्रोन्सद्वारे रशियाच्या उत्तरेकडील नोव्हगोरोड प्रदेशातील राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, रशियाचे असे म्हणणे आहे की, ते युक्रेन युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेसोबत सुरू असलेल्या चर्चेत आपल्या वाटाघाटीच्या भूमिकेचा फेरविचार करतील.

युक्रेन आणि पाश्चात्य देशांनी, या कथित हल्ल्याबाबत रशियाने केलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पुरावे आणि अधिकृत विधाने

रशियन संरक्षण मंत्रालयाच्या टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, रशियन सशस्त्र दलांच्या जनरल स्टाफच्या मुख्य संचालनालयाचे प्रमुख अ‍ॅडमिरल इगोर कोस्ट्युकोव्ह, हाणून पाडलेल्या ड्रोनच्या तुकड्यांमध्ये सापडलेली ‘कंट्रोलिंग मेकॅनिझम’ अमेरिकन अटॅचीकडे सुपूर्द करताना दिसत आहेत.

“रशियाच्या विशेष सेवांच्या तज्ज्ञांनी ड्रोनच्या नेव्हिगेशन कंट्रोलरच्या मेमरीमधील माहितीची जे वर्णन केले आहे, त्यावरून हे निर्विवादपणे सिद्ध होते की, नोव्हगोरोड प्रदेशातील रशियन राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानातील इमारतींचा समूह, हे या हल्ल्याच्या टार्गेटवर होते,” असे कोस्ट्युकोव्ह म्हणाले.

“आम्ही असे मानतो की या कृतीमुळे सर्व प्रश्नांचे निराकरण होईल आणि सत्य प्रस्थापित होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रालयाने यापूर्वी टेलिग्रामवर पोस्ट करत सांगितले होते की, त्यांचे निष्कर्ष युनायटेड स्टेट्सकडे सोपवले जातील.

बुधवारी वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिकार्‍यांना असे आढळून आले की, युक्रेनने ड्रोन हल्ल्यात पुतिन किंवा त्यांच्या निवासस्थानांपैकी कुणालाही लक्ष्य केले नव्हते. दरम्यान, रॉयटर्स या वृत्ताची त्वरित पुष्टी करू शकले नाही.

अमेरिका आणि युक्रेनची प्रतिक्रिया

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी रशियाच्या आरोपाबद्दल सहानुभूती व्यक्त केली. सोमवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “पुतिन यांनी त्यांना या कथित घटनेची माहिती दिली असून, ते याविषयी खूप संतप्त आहेत.”

परंतु बुधवारपर्यंत, ट्रम्प याबाबत अधिक साशंक दिसले. त्यांनी सोशल मीडियावर ‘न्यू यॉर्क पोस्ट’चा एक अग्रलेख शेअर केला, ज्यामध्ये रशियावर युक्रेनमधील शांतता रोखल्याचा आरोप करण्यात आला होता.

युक्रेनने असा कोणताही हल्ला केल्याचे नाकारले असून, त्यांनी या आरोपाचे वर्णन रशियाच्या ‘डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन’चा (दुष्प्रचार मोहीमेचा) भाग असे केले आहे. युक्रेनच्या मते, ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात आठवड्याच्या शेवटी झालेल्या भेटीनंतर, कीव्ह आणि वॉशिंग्टनमध्ये फूट पाडण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous article2025: DRDO ची विक्रमी कामगिरी, 11 प्रमुख करारांवरही स्वाक्षऱ्या
Next articleजन्मदर वाढवण्यासाठी चीनचा नवा फंडा; कंडोम, गर्भनिरोधकांवर कर लागू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here