परदेशस्थ वारसदारांचे बांगलादेशी निवडणूक राजकारणावर वर्चस्व

0
निवडणूक

बांगलादेशमधील निवडणुकीचा हंगाम अशा परिस्थितीत सुरू होत आहे, जिथे दोन्ही प्रमुख राजकीय शक्तींचे नेतृत्व परदेशात राहणाऱ्या, कायदेशीर किंवा राजकीय अडथळ्यांना सामोरे जाणाऱ्या आणि मतदानापूर्वी अद्याप मायदेशी न परतलेल्या वारसदारांकडून केले जात आहे.

अवामी लीगवर या निवडणुकीत बंदीची शक्यता असताना आणि प्रदीर्घ काळापासून पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्या शेख हसीना भारतात आश्रयाला आलेल्या असल्याने, त्यांच्या नंतर पक्षाचे वरिष्ठ नेते असणाऱ्या त्यांचा मुलगा साजीब वाजेद जॉय यांच्याकडे पुढील संभाव्य नेता म्हणून पाहिले जात आहे. त्याचप्रमाणे, विरोधी पक्षात, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) अध्यक्षा खालेदा झिया या गंभीर आजारी असून सर्वांचे लक्ष निर्णायकपणे त्यांचा मुलगा तारिक रहमान यांच्याकडे वळले आहे. हा बदल अशा राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब आहे, जिथे पारंपरिक नेते अनुपस्थित आहेत आणि त्यांचे वारसदार देशाबाहेर असूनही राष्ट्रीय राजकारणाची पुढील दिशा घडवतील अशी अपेक्षा आहे.

‘प्रथम आलो’च्या अलीकडील एका सर्वेक्षणानुसार, बीएनपीला लक्षणीय पाठिंबा मिळत आहे. या सर्वेक्षणानुसार, 47.5‌ टक्के प्रतिसादकर्ते तारिक रहमान यांना आगामी निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी प्रमुख दावेदार मानतात. अनेक वर्षे ब्रिटनमध्ये निर्वासित म्हणून राहून आणि कोणताही संसदीय अनुभव नसतानाही रहमान यांना हा पाठिंबा मिळत आहे.

याच सर्वेक्षणानुसार, जमात-ए-इस्लामीचे प्रमुख शफिकुर रहमान यांना पंतप्रधानपदासाठी पुढील सर्वात संभाव्य उमेदवार म्हणून पसंती मिळाली आहे, जे एका बदलत्या निवडणूक परिस्थितीचे संकेत देतात, जिथे प्रस्थापित राजकीय व्यक्तिमत्त्वे आता लोकांच्या पसंतीवर वर्चस्व गाजवत नाहीत. खालेदा झिया आणि तारिक रहमान यांच्यासाठी मिळालेला एकत्रित पाठिंबा 66 टक्क्यांपेक्षा जास्त प्रतिसादांचा आहे, आणि सर्वेक्षण केलेल्यांपैकी 57.5 टक्के लोकांचे म्हणणे आहे की बीएनपीचा विजय हा देशासाठी सर्वोत्तम परिणाम देणारा असेल.

अर्थात, तारिक रहमान नजीकच्या भविष्यात बांगलादेशात परत येतील याचे अद्याप कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. ढाका ट्रिब्यूनमध्ये उद्धृत केलेल्या बीएनपी नेत्यांनी त्यांच्या परत येण्याभोवती असलेल्या “व्यावहारिक मर्यादा आणि गुंतागुंत” यांचा उल्लेख केला, परंतु राजकीय परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय विचार सकारात्मक झाले की ते परत येतील असे सांगितले आहे. सरकारने सार्वजनिकरित्या म्हटले आहे की जर त्यांनी परत येण्याचा निर्णय घेतला तर सरकार “सर्वतोपरी सहकार्य” करेल. रहमान यांनी पूर्वीचे अनेक कायदेशीर खटले निकाली काढले आहेत आणि सध्या त्यांच्या प्रवेशास प्रतिबंध करणासाठी कोणतीही न्यायालयीन अडचण नाही.

दरम्यान, शेख हसीना यांचे धोरणात्मक आणि तांत्रिक सल्लागार म्हणून ओळखले जाणारे साजीब वाजेद जॉय हे देखील परदेशात असून वाढत्या कायदेशीर आव्हानांना सामोरे जात आहेत. अनाडोलू एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने जॉय यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. जुलै 2024 च्या उठावाच्या अंतिम टप्प्यात देशभरातील इंटरनेट सेवा बंद करण्याच्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हसीना यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांशी संबंधित आरोपांसह, भ्रष्टाचाराच्या स्वतंत्र तक्रारींचीही चौकशी सुरू आहे. असे असूनही, प्रथम आलोच्या सर्वेक्षणातील 8.5 टक्के प्रतिसादकर्त्यांना वाटते की अवामी लीगचा विजय देशासाठी सर्वोत्तम ठरेल.

दोन्ही राजकीय वारसदार परदेशात असून कायदेशीर छाननी, जनतेच्या अपेक्षा आणि पक्षांतर्गत अवलंबित्व यांचा सामना करत असताना, बांगलादेश अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रियेत प्रवेश करत आहे, जे सध्या देशात नाहीत, परंतु देशाच्या राजकीय भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

ऐश्वर्या पारीख

+ posts
Previous articleरिक स्वित्झर यांचा दौरा, भारतासाठी अप्रत्यक्ष ताकीद आहे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here