मॉस्कोने युक्रेनव्याप्त रशियातील कुर्स्क येथील बोर्डिंग स्कूलवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात, किमान 4 जण ठार झाल्याचा दावा, युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे
या भागात काही नागरिक आश्रय घेत असल्याचे, एका वृत्तातून समोर आले आहे.
युक्रेनियन सैन्याने बीबीसी वृत्तसंस्थेला सांगितले की, या हल्ल्यात चार लोक ठार झाले आणि सुमारे बाराजण जखमी झाले, ज्यापैकी बरेचसे वृद्ध हे कुर्स्क प्रदेशातील सुडझा शहरात राहत होते. हे शहर गेल्या पाच महिन्यांपासून युक्रेन लष्कराच्या नियंत्रणाखाली आहे.
दरम्यान, हल्ला झालेल्या मुख्य इमारतीतून 80 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे.
झेलेन्स्की यांनी, X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “रशिया अशाप्रकारे कपटी युद्ध करते. जसे त्यांनी रशियाच्या कुर्स्क मधील- युक्रेनव्याप्त प्रदेशातल्या एका बोर्डिंग स्कूलवर हल्ला केला, ज्यामध्ये नागरिक स्थलांतरित होण्याची तयारी करत होते. तिथे त्यांनी जाणूनबूजून हवाई बॉम्ब हल्ला करत, ती इमारत नष्ट केली.
“रशियाने अशाचप्रकारे अनेक दशकांपूर्वी रशियातील Chechnya विरुद्ध युद्ध पुकारले होते. त्यांनी तिथल्या सीरियन लोकांना याच पद्धतीने मारले होते. हवाई बॉम्ब हल्ल्यामध्ये युक्रेनियन घरे नष्ट केली होती आणि त्यांच्या स्वत:च्याच नागरिकांविरुद्धही समान रणनीती वापरली होती,” असेही झेलेन्स्की यांनी नमूद केले आहे.
“रशिया हे एक सभ्यता नसलेले राज्य आहे. ते त्यांची मनमानी करतच राहणार. मात्र जर आपण कठोर आणि निर्णायकपणे पाऊल उचलले, तर रशियाला देखील थांबण्यास भाग पाडले जाऊ शकते. हे जग रशियन बॉम्बपासून सुरक्षित आहे याची खात्री करुन देण्यासाठी हे करणे आवश्यक आहे,” असे झेलेन्स्की म्हणाले.
मॉस्कोने हल्ल्यांचा जोर वाढवला
युक्रेन आणि रशियामधील युद्धाला तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. एका वृत्तानुसार, मॉस्कोने अलीकडे युक्रेनवरील हवाई हल्ल्यांचा जोर वाढवला आहे.
दरम्यान, युक्रेनियन सैन्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर कोरियाचे सैनिक, जे रशियासाठी लढत होते, ते काही आठवड्यांपासून कुर्स्कच्या फ्रंटलाईनवर दिसलेले नाहीत.
“डीपीआरके सैन्याची उपस्थिती सुमारे तीन आठवड्यांपासून दिसलेली नाही. कदाचित जखमी झाल्यामुळे किंवा अन्य मोठ्या नुकसानीमुळे त्यांना माघार घ्यावी लागली असावी,” असे युक्रेनियन सैन्याच्या विशेष ऑपरेशन्स फोर्सेसचे प्रवक्ते, कर्नल ऑलेक्झांडर किंद्राटेन्को यांनी CNN वृत्तसंस्थेला सांगितले.
अमेरिकन वृत्तवाहिनीने युक्रेनच्या अधिकाऱ्यांचे आणि पश्चिमी गुप्तचर अहवालांचे हवाले देत, दावा केला आहे की, उत्तर कोरियाचे सुमारे 12 हजार सैनिक युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी रशियाला पाठवले गेले होते. त्यापैकी 4 हजार सैनिक मरण पावले किंवा जखमी झाले.
नोव्हेंबरपासून हे सर्व सैनिक युक्रेनच्या घुसखोरीचा सामना करण्यासाठी कुर्स्क प्रदेशात तैनात होते.
दरम्यान, ‘युक्रेनने अलीकडे कुर्स्कमध्ये प्रगती केली आहे’, असा दावा – अमेरिकेच्या वॉशिंग्टन स्थित थिंक-टँक “इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर” (ISW) ने, युद्धभूमीवरील परिक्षणानंतर केला असल्याचा अहवाल, CNN वृत्तसंस्थेने दिला आहे.
(IBNS च्या इनपुटसह)