भारतीय नौदल ताफ्याचे बळकटीकरण करण्यासाठी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने प्रगत, मल्टी-रोल स्टेल्थ, गाईडेड मिसाईल फ्रिगेटसह सज्ज अशी ‘INS Tushil’ हे भारतीय नौदलात सामील होण्यासाठी सज्ज झाले आहे. रशियाच्या एका शिपयार्डमध्ये याची निर्मीती करण्यात आली असून, ९ डिसेंबर रोजी भारतीय नौदलाकडे ते हस्तांतरित करण्यात येणार आहे. या खास सोहळ्याला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहतील.
‘INS Tushil’ हे प्रोजेक्ट 1135.6 चे उत्पादन क्रिवाक III श्रेणीचे फ्रीगेट आहे. या समूहामध्ये एकूण सहा युनिट्सचा समावेश आहे. ज्यामध्ये ३ तलवार-श्रेणीची जहाजे सामाविष्ट असून रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग- बाल्टी शिपयार्ड येथे त्यांची निर्मीती करण्यात आली आहे. तर अन्य ३ फॉलो-ऑन टेग-क्लास जहाजे ही यांतार शिपयार्ड, कॅलिनिनग्राड येथे तयार करण्यात आली आहे.
याव्यतिरीक्त या प्रोजेक्टमधील सातवे फ्रिगेट म्हणून, INS Tushil हे जहाज अद्ययावत यंत्रणेच्या नव्या रूपाचे प्रतिनिधित्व करते. २०१६ मध्ये JSC Rosoboronexport, भारतीय नौदल आणि भारत सरकार यांच्यामध्ये एक करार झाला होता, ज्यामध्ये ऑर्डर केलेल्या दोन प्रगत फॉलो-ऑन जहाजांपैकी हे पहिले जहाज आहे. भारतीय नौदलाचे सक्षमीकरण व बळकटीकरण करण्याच्या दृष्टीकोनात हे प्रोजेक्ट मैलाचा दगड ठरणार आहे.
भारत-रशियाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे संमिश्रण
‘INS तुशील’ हे प्रोजेक्ट म्हणजे रशिया आणि भारताच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे एक उल्लेखनीय संमिश्रण असणार आहे. हे प्रोजेक्ट म्हणजे युद्धनौका बांधणीतील एक सर्वोत्तम कामगिरी असल्याचंही म्हटलं जात आहे. सुमारे १२५ मीटरपर्यंत पसरलेले आणि ३ हजार ९०० टन वजन विस्थापित करणारे हे फ्रिगेट, २६% स्वदेशी सामग्रीचा वापर करुन तयार करण्यात आलं असून, भारतासाठी ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. ‘INS तुशील’ हे Make in India प्रोजेक्टअंतर्गत येणारे आणखी एक सर्वोत्तम उदाहरण असल्याचे यावरुन सिद्ध झाले आहे.
मजबूत व टिकाऊ सामग्री आणि उत्कृष्ट स्थिरतेच्या आधारावर डिझाइन केलेले INS तुशील हे प्रतिष्ठित वेस्टर्न फ्लीटमध्ये सामील होणार आहे, ज्याला भारतीय नौदलाचे “Sword Arm” म्हटले जाते. INS तुशील हे भारताच्या सागरी क्षमतांना अधिक बळकट करण्याचे काम तर करेलच मात्र त्यासोबतच जागतिक स्तरावर तांत्रिकदृष्ट्या सर्वात प्रगत फ्रिगेट्समध्ये देखील स्थान मिळवेल.
जानेवारी महिन्यापासून सुरू झालेल्या फॅक्टरीअंतर्गत चाचण्या तसेच समुद्री चाचण्या, राज्य समितीच्या चाचण्या आणि वितरण स्वीकृती चाचण्यांसह सर्व चाचण्या ‘INS तुशीलने’ यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. या कठोर चाचण्यांमध्ये जहाजावर बसवण्यात आलेल्या सर्व रशियन उपकरणांचे मूल्यमापन केले जाते. ज्यामध्ये शस्त्रास्त्र प्रणालींचा समावेश असतो. तसेच जहाजाच्या सर्वांगीण क्षमतेचे प्रात्यक्षिक देखील यावेळी पार पडते. INS तुशीलने या चाचण्यांदरम्यान 30 नॉट्सपेक्षा अधिक प्रभावी टॉप स्पीड मिळवत आपली योग्यता सिद्ध केली. आता हे जहाज भारतीय नौदलात सामील होण्यासाठी सज्ज आहे.
‘’INS Tushil ची ओळख ही फक्त भारतीय नौदलाच्या विस्तारातील, सक्षमीकरणातील एक मोठी कामगिरी इतकीच मर्यादित नसून हे भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षण संबंध अधिक मजबूत आणि चिरस्थायी करणारं एक प्रतिक आहे’’ अशा शब्दांत देशाच्या संरक्षण मंत्रालयाने ‘INS Tushil’ चे वर्णन केले आहे.
टीम भारतशक्ती
अनुवाद – वेद बर्वे