नवी दिल्लीतील लष्करी मुख्यालयात कार्यरत असलेल्या ब्रिगेडियर नवनीत नारायण यांनी वर्ल्ड मास्टर्स रॅकेटलॉन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. ही देशासाठीही अभिमानास्पद कामगिरी आहे. ‘रॅकेट स्पोर्ट्सचा आयर्नमॅन’ म्हणून ओळखला जाणारा रॅकेटलॉन हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये टेबल टेनिस, बॅडमिंटन, स्क्वॉश आणि लॉन टेनिस या खेळांचा समावेश होतो. थोडक्यात सांगायचं तर खेळाडूंचे सर्वांगीण प्रावीण्य आणि सहनशक्तीची चाचणी घेणारा हा खेळाचा प्रकार आहे.
29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत मुंबईतील विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ब्रिगेडियर नारायण यांनी उपविजेतेपद पटकावले. त्यांनी एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारांमध्ये भाग घेतला आणि असाधारण कौशल्य, दृढनिश्चय आणि अष्टपैलूत्व सिद्ध करत जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला.
रॅकेटलॉनमध्ये नारायण यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत हा विजय मिळवला आहे. त्याआधी ऑक्टोबर 2024 मध्ये, त्यांनी विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या अखिल भारतीय रॅकेटलॉन अजिंक्यपद स्पर्धेत 50 पेक्षा जास्त एकेरी आणि दुहेरी प्रकारात विजेतेपद पटकावले. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची उपविजेती कामगिरी याच प्रवासाचा पुढचा टप्पा आहे, जो त्यांच्या उत्कृष्टतेच्या अथक प्रयत्नांचे आणि दबावाखाली असूनही उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या क्षमतेचे प्रतिबिंब दर्शवणारा आहे.
ब्रिगेडियर नारायण यांच्या उल्लेखनीय क्रीडा कारकीर्दीची सुरुवात स्क्वॅशपासून झाली, जिथे त्यांनी 2000 साली आशियाई स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रीय स्तरावरील स्क्वॉश खेळाडू होण्यापासून रॅकेटलॉनच्या बहुआयामी खेळात उत्कृष्ट कामगिरी करण्यापर्यंतचे त्यांची झालेली प्रगती हे त्यांच्या समर्पण आणि खेळाप्रती त्यांच्या असणाऱ्या अतूट वचनबद्धतेचा पुरावा आहे.
ही कामगिरी भारतीय लष्कराची अदम्य भावना आणि दृढनिश्चयाचे उदाहरण आहे. ब्रिगेडियर नारायण यांचे यश केवळ त्यांचे वैयक्तिक समर्पणच अधोरेखित करत नाही तर देशभरातील खेळाडूंना प्रेरणा देते. कठोर परिश्रम आणि चिकाटीने जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर यशाला पुन्हा एकदा तुम्ही गवसणी घालू शकता हेच त्यातून बघायला मिळते.
टीम भारतशक्ती