‘स्टेल्थ किलर्स’ ते सायलेंट स्क्रीन्स: चिनी लष्करी प्रणाली सर्वत्र ठरल्या अपयशी

0

चीनने आपल्या लष्करी उपकरणांची जाहिरात पाश्चात्य आणि रशियन प्रणालींना एक किफायतशीर पर्याय म्हणून केली आहे, जी कागदावर अत्यंत प्रगत, सैद्धांतिकदृष्ट्या प्राणघातक आणि अमेरिका किंवा नाटो पुरवठादारांपासून दूर राहू इच्छिणाऱ्या देशांसाठी राजकीयदृष्ट्या सोयीस्कर पर्याय आहेत. मात्र, व्हेनेझुएला, पाकिस्तान आणि मध्य पूर्वेत अलीकडेच झालेले संघर्ष आणि लष्करी कारवाया यामध्ये एक गोष्ट वारंवार दिसून आली आहे: जेव्हा जेव्हा अमेरिका आणि भारत यांनी केलेल्या तांत्रिकदृष्ट्या श्रेष्ठ, नेटवर्क-केंद्रित युद्धाचा सामना करावा लागतो, तेव्हा तेव्हा चिनी प्रणालींसमोर अडचणी येतात.

स्टेल्थ विमानांना शोधण्यात अयशस्वी ठरलेल्या रडार प्रणालींपासून ते क्रूझ क्षेपणास्त्रे किंवा ड्रोनना रोखण्यास असमर्थ असलेल्या हवाई-संरक्षण प्रणालींपर्यंत, चिनी शस्त्रास्त्रांची युद्धभूमीवरील कामगिरी त्यांच्या जाहिरातींमधील दाव्यांशी मोठ्या प्रमाणात विसंगत ठरत आहे.

व्हेनेझुएला: चीनच्या लॅटिन अमेरिकेतील आदर्श प्रकल्पांचे पतन

व्हेनेझुएलाला एकेकाळी लॅटिन अमेरिकेतील चीनचा प्रमुख संरक्षण भागीदार म्हणून जगासमोर सादर केले जात होते. गेल्या काही वर्षांत, काराकासने चिनी बनावटीचे रडार, चिलखती वाहने, क्षेपणास्त्र प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध उपकरणांमध्ये मोठी गुंतवणूक केली आणि आपले हवाई-संरक्षण जाळे दक्षिण अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली असल्याचे घोषित केले.

त्या जाळ्याच्या केंद्रस्थानी चायना इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी ग्रुप कॉर्पोरेशनद्वारे (CETC)  उत्पादित JY-27 मीटर-वेव्ह रडार होते. अमेरिकेच्या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांना शोधण्यास सक्षम असलेली ‘काउंटर-स्टेल्थ’ प्रणाली म्हणून मार्केटिंग करण्यात आलेल्या JY-27 ला इतर पाळत ठेवणाऱ्या चिनी रडार्ससोबत तैनात करण्यात आले होते आणि व्हेनेझुएलाच्या व्यापक हवाई-संरक्षण कमांड संरचनेत सामावून घेतले गेले होते.

जेव्हा अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाच्या लक्ष्यांवर लष्करी कारवाई सुरू केली, तेव्हा तो फुकाचा आत्मविश्वास वेगाने कोसळला.

लष्करी मूल्यांकनानुसार, चीनने पुरवलेल्या रडार प्रणालींना इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्राद्वारे सुरुवातीलाच निष्क्रिय करण्यात आले, ज्यामुळे व्हेनेझुएलाची हवाई संरक्षण यंत्रणा प्रभावीपणे अंध झाली. त्यानंतर किरणोत्सर्ग-विरोधी हल्ले करण्यात आले, ज्यामुळे महत्त्वपूर्ण प्रत्युत्तर देण्यापूर्वीच कमांड-अँड-कंट्रोल केंद्रे निकामी झाली. स्टेल्थ विमानांनी कोणत्याही अडथळ्याशिवाय कारवाई केली, ज्यामुळे JY-27 रडार F-22 किंवा F-35 सारख्या विमानांचा मागोवा घेऊ शकते या दाव्यांना थेट आव्हान मिळाले.

हे अपयश केवळ रडारपुरते मर्यादित नव्हते. हवाई वर्चस्व गमावल्यानंतर चीनची VN-मालिकांची जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी चालणारी चिलखती वाहने, रॉकेट तोफखाना आणि किनारी संरक्षण प्रणाली असुरक्षित ठरल्या. लवचिक सेन्सर फ्युजन, डेटा लिंक्स किंवा इलेक्ट्रॉनिक संरक्षणाअभावी, जमिनीवरील सैन्याचा एकतर हवाई हल्ल्यांमध्ये नाश झाला किंवा त्यांनी दबावाखाली या उपकरणांचा वापरच सोडून दिला.

चीनने आधुनिक दिसणारी उपकरणे पुरवली असली तरी, त्यांच्यात अमेरिकेच्या जॅमिंग, सायबर व्यत्यय आणि अचूक हल्ल्यांच्या सिद्धांताने वर्चस्व असलेल्या स्पर्धात्मक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वातावरणात ऑपरेशनल नेटवर्कमध्ये टिकून राहण्याची क्षमता नव्हती.

सीरिया आणि स्टेल्थ डिटेक्शनची दंतकथा

व्हेनेझुएला ही काही एकमेव घटना नाही. यापूर्वी, सीरियामध्ये तैनात केलेले चिनी बनावटीचे JY-27 रडार, वारंवार हवाई हल्ले करणाऱ्या इस्रायली विमानांना शोधण्यात अयशस्वी ठरले होते. रशियन, सीरियन आणि इराणी सेन्सर्सच्या दाट जाळ्यामध्ये कार्यरत असूनही, इस्रायली विमानांनी फारशी पूर्वसूचना न देता हवाई हद्दीत प्रवेश केला.

अर्थात कमी-फ्रिक्वेन्सीचे VHF रडार काही विशिष्ट परिस्थितीत स्टेल्थ विमानांना सैद्धांतिकदृष्ट्या शोधू शकत असले तरी, अचूक ट्रॅकिंग, लक्ष्यासाठी उच्च दर्जाचा डेटा आणि सुरक्षित कमांड लिंक्सशिवाय केवळ शोध घेणे निरुपयोगी ठरते. सीरिया आणि व्हेनेझुएला या दोन्ही ठिकाणी, या लिंक्स कमकुवत असल्याचे सिद्ध झाले.

ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान

मे 2025 मध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान, पाकिस्तान चीनकडून पुरवलेल्या प्रणालींवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होते, ज्यात HQ-9B लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण बॅटरी, HQ-16 प्रणाली, LY-80 रडार आणि YLC-मालिका पाळत ठेवणाऱ्या रडारचा समावेश होता.

मात्र तेही मोठ्या प्रमाणात अयशस्वी ठरले.

ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि SCALP हवाई-प्रक्षेपित क्षेपणास्त्रांचा वापर करून केलेल्या भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यांनी लाहोर, सियालकोट, चकलाल आणि इतर सामरिक ठिकाणांभोवतीचे महत्त्वाचे पाकिस्तानी हवाई-संरक्षण केंद्र उद्ध्वस्त केले. चीनमध्ये बनवलेल्या HQ-9 आणि HQ-16 प्रणाली, तसेच अनेक फायर-कंट्रोल आणि पाळत ठेवणाऱ्या रडारसह नष्ट झाल्या.

अमेरिकन संरक्षण विश्लेषक ब्रँडन जे. वायचर्ट यांनी HQ-9B च्या रणांगणातील कामगिरीचे वर्णन विनाशकारी असे केले, आणि नमूद केले की ही प्रणाली केवळ ब्रह्मोससारख्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांविरुद्धच नव्हे, तर कमी वेगाच्या ड्रोनविरुद्धही अयशस्वी ठरली. रशियन लष्करी विश्लेषक आंद्रेई मार्ट्यानोव्ह अधिक स्पष्टपणे म्हणाले की, HQ-9B “कोणतीही सुपरसॉनिक वस्तू, किंवा अगदी सबसॉनिक वस्तूलाही विश्वसनीयपणे रोखू शकत नाही.”

याउलट, भारताच्या स्वदेशी कमांड प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालींनी समर्थित असलेल्या बहुस्तरीय हवाई संरक्षण जाळ्याने पाकिस्तानी रॉकेट, ड्रोन आणि चीनकडून पुरवलेल्या CM-400 AKG क्षेपणास्त्रांना रोखताना भारतीय उपकरणांना कमीत कमी नुकसान होईल याची दक्षता घेतली.

हुकलेल्या संधींमधील विसंगती: व्हेनेझुएला आणि ब्रह्मोस

व्हेनेझुएलाने 2015 मध्येच चिली आणि अर्जेंटिनासह या प्रदेशातील इतर देशांसोबत ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यात स्वारस्य व्यक्त केले होते. भारत-रशियन सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राने त्याच्या तुलनेने कमी  खर्च आणि अतुलनीय वेग तसेच लक्ष्याचा अचूक वेध घेणे यामुळे संपूर्ण लॅटिन अमेरिकेत लक्ष वेधून घेतले होते.

मात्र, काराकासने चिनी प्रणालींना प्राधान्य दिले, ज्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये शेवटी अयशस्वीच ठरल्या.

JY-27 प्रणालीवर एक नजर

यात एक मोबाईल एईएसए (AESA) अँटेना, व्हीएचएफ-बँड ऑपरेशन, सुधारित अल्गोरिदम, अँटी-जॅमिंग वैशिष्ट्ये आहेत आणि मोठ्या लक्ष्यांसाठी याची शोध श्रेणी 500 किलोमीटरपर्यंत असल्याचा दावा केला जातो.

मार्केटिंग विरुद्ध आधुनिक युद्ध

व्हेनेझुएलाची निष्क्रिय झालेली हवाई संरक्षण प्रणाली असो किंवा भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झालेले पाकिस्तानचे रडार नेटवर्क असो, संदेश अधिकाधिक स्पष्ट होत आहे. अमेरिकन आणि भारतीय लष्करी सामर्थ्यासमोर, चिनी प्रणालींनी अजून हे सिद्ध केलेले नाही की त्या अशा पहिल्या हल्ल्यातून वाचू शकतात, युद्धभूमीवर नियंत्रण मिळवण्याची गोष्ट तर दूरच राहिली.

हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleFrom “Stealth Killers” to Silent Screens: How Chinese Military Systems Failed the Ultimate Battlefield Test
Next articleट्रम्प यांचा भारतावर पुन्हा दबाव, टॅरिफविषयक तणाव आणखी वाढला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here