भारतीय हवाई दलात (IAF) आधीच समाविष्ट झालेल्या प्रगत LCA MK 1 प्रकारातील LCA तेजस MK-1 A या उत्पादन मालिकेतील लढाऊ विमानाचे पहिले उड्डाण गुरुवारी बंगळुरू येथे झाले. बेंगळुरूस्थित डीआरडीओच्या लॅब एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या (एडीए) सहकार्याने, डिफेन्स पीएसयू हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) गेल्या काही दिवसांत याच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहेत.
एचएएलच्या म्हणण्यानुसार, तेजस MK1A या मालिकेतील LA 5033 हे पहिले विमान आज बंगळुरू येथील एचएएलच्या प्रांगणातून आकाशात झेपावले. या उड्डाण चाचणीचा कालावधी 18 मिनिटे होता.
The first Aircraft LA5033 of the Tejas Mk1A Aircraft series took to the skies from HAL facility in Bengaluru today. It was a successful sortie with a flying time of 18 minutes. pic.twitter.com/a3soPW46X1
— HAL (@HALHQBLR) March 28, 2024
“फेब्रुवारी 2021 मध्ये करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर जागतिक भू-राजकीय वातावरणामुळे निर्माण झालेल्या पुरवठा साखळीच्या आव्हानांवर मात करत HALने समवर्ती रचना आणि विकासासह हा महत्त्वपूर्ण उत्पादन टप्पा गाठला आहे,” असे HALचे सीएमडी, सी. बी. अनंतकृष्णन म्हणाले. HALचे चीफ टेस्ट पायलट ग्रुप कॅप्टन के. के. वेणुगोपाल (निवृत्त) यांनी हे विमान चालवले.
जागतिक पुरवठा साखळीतील आव्हाने आणि भू-राजकीय समस्यांना तोंड देत असूनही, तेजस Mk1A चे पहिले यशस्वी उड्डाण भारतीय संरक्षण उद्योगाची लवचिकता आणि दृढनिश्चय याचे प्रतीक आहे. HAL च्या प्रमुखांनी संरक्षण मंत्रालय, भारतीय हवाई दल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था/एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी, CEMILAC आणि DGAQA यासगळ्यांनी या कामगिरीसाठी केलेल्या अतुट सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. या प्रकल्पात सहभागी असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी (एमएसएमई) दिलेल्या अमूल्य योगदानाचीही त्यांनी दखल घेतली.
अत्याधुनिक तेजास एमके1ए हे प्रगत इलेक्ट्रॉनिक रडार, युद्धसामग्री आणि दळणवळण प्रणालींनी सुसज्ज आहे, ज्यामुळे याची लढाऊ क्षमता वाढली असून सुधारित देखभाल वैशिष्ट्यांचाही यात समावेश आहे. भारतीय हवाई दलामध्ये तेजस MK1Aचा लवकरात लवकर समावेश करणे आणि HAL मधील स्थापित तीन लाइनद्वारे उत्पादन वाढवणे हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (HAL) उद्दिष्ट आहे.
सध्या भारतीय हवाई दलात 40 तेजस MK-1 विमानांचा समावेश आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये, त्यांनी आणखी 83 तेजस MK-1A लढाऊ विमानांची ऑर्डर दिली आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून (HAL) अतिरिक्त 97 जेट खरेदी करण्याची योजना आहे. तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) भारताच्या वाढत्या संरक्षण उत्पादन उद्योगाला बळकटी देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
टीम भारतशक्ती