
गाझा युद्धविराम पुन्हा सुरू करण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाचे आपण मूल्यांकन करत आहेत असे हमासने शुक्रवारी जाहीर केले. तर इस्रायलने पॅलेस्टिनी दहशतवादी गटावर उर्वरित इस्रायली ओलिसांची सुटका करावी यासाठी दबाव आणत आपली लष्करी मोहीम पुन्हा सुरू केली आहे.
गेल्या आठवड्यात सादर करण्यात आलेल्या अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्या ‘ब्रिज’ योजनेचे उद्दिष्ट, युद्धविराम एप्रिलपर्यंत वाढवणे, रमजान आणि पासओव्हर सणानिमित्ताने शत्रुत्व कायमस्वरूपी संपावं यासाठी वाटाघाटी करायला वेळ देणे हे आहे.
इस्रायलने दोन महिन्यांचा युद्धविराम सोडून दिल्यानंतर तीन दिवसांनी इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले की, सैन्य आपले हवाई, जमिनीवरील आणि सागरी हल्ले तीव्र करत असल्याने नागरिकांना गाझाच्या दक्षिणेकडील भागात हलवण्यात येईल.
काट्झ म्हणाले की, हमास उर्वरित ओलिसांची सुटका करेपर्यंत आणि त्यांचा पूर्णपणे पराभव होईपर्यंत इस्रायल आपली मोहीम सुरू ठेवेल. इस्रायली हवाई हल्ल्यांनी या आठवड्यात हमासचे गंभीर नुकसान केले, ज्यात त्याचा गाझा सरकारचा प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी ठार झाले.
पण पॅलेस्टिनी आणि इस्रायली सूत्रांचे म्हणणे आहे की हमासने दाखवून दिले आहे की ते मोठे नुकसान सहन करू शकतात, तरीही लढू शकतात आणि राज्य करू शकतात.
हमासने सांगितले की, कैद्यांच्या सुटकेबाबत करार करणे, युद्ध संपवणे आणि गाझा पट्टीतून इस्रायली सैन्य पूर्णपणे माघारी घेणे या उद्देशाने ते अजूनही विटकॉफच्या प्रस्तावावर आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करत आहेत.
नाव न सांगण्याच्या अटीवर बोलणाऱ्या एका पॅलेस्टिनी अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की इजिप्तनेही अशाच प्रकारचा प्रस्ताव मांडला होता, परंतु हमासने अद्याप त्याला प्रतिसाद दिलेला नाही. या योजनेचा तपशील देण्यास अधिकाऱ्याने नकार दिला कारण तो विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.
इजिप्तच्या दोन सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, इजिप्तने अमेरिकेच्या हमीसह गाझामधून संपूर्ण इस्रायली माघार घेण्याच्या मुदतीसह उर्वरित ओलिसांच्या सुटकेसाठी कालमर्यादा निश्चित करण्याची सूचना केली होती.
सूत्रांनी सांगितले की अमेरिकेने प्रारंभिक मंजुरीचे संकेत दिले होते, तर हमास आणि इस्रायलची प्रतिक्रिया शुक्रवारनंतर अपेक्षित होती.
या महिन्याच्या सुरुवातीला युद्धविरामाचा पहिला टप्पा संपला, परंतु दुसरा टप्पा सुरू करण्याच्या अटींवर इस्रायल आणि हमास यांच्यात सहमती होऊ शकली नाही. हमासने ओलिस ठेवलेल्याची सुटका करण्यास विलंब केला आणि त्यानंतर इस्रायली लष्करी कारवाई पुन्हा सुरू झाली.
दोन महिन्यांच्या सापेक्ष शांततेनंतर, इस्रायलच्या नवीन हवाई आणि लष्करी मोहिमेमुळे गाझाचे लोक पुन्हा आपला जीव वाचवण्यासाठी पळून जात होते.
काट्झ म्हणाले की, हमासने उर्वरित ओलिसांची सुटका करण्यास जितका जास्त वेळ नकार दिला, तितका जास्त प्रदेश गमावला जाईल. हमासने ऑक्टोबर 2023 मध्ये इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात ताब्यात घेतलेल्या 250 हून अधिक नागरिकांपैकी 59 जण अजूनही गाझामध्ये आहेत, त्यापैकी 24 जण जिवंत असल्याचे मानले जाते.
इस्रायली हल्ला पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेने हमासला जबाबदार धरले
इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये मंगळवारी 400 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले, जो 17 महिन्यांच्या युद्धातील सर्वात प्राणघातक दिवसांपैकी एक होता आणि तेव्हापासून तिथे थोडीशी शांतता आहे.
शुक्रवारी 13 जणांचा मृत्यू झाला. एन्क्लेव्हच्या उत्तरेकडील गाझा शहरातील तुफाह जिल्ह्यातील घरांवर इस्रायली हवाई हल्ल्यात ठार झालेल्या सहा मुलांसह 11 जणांचा यात समावेश आहे, असे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
पॅलेस्टिनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दक्षिणेकडील खान युनूसजवळ अबासन येथे तोफ्यांच्या माऱ्यात दोन जणांचा मृत्यू झाला.
काही तासांनंतर, इस्रायली सैन्याने सांगितले की इस्रायली शहर एश्केलॉनमध्ये सतर्कतेचा इशारा सक्रिय झाल्यानंतर त्यांनी उत्तर गाझामधून दोन क्षेपणास्रे अडवली आहेत.
हमासच्या सशस्त्र शाखेने हा हल्ला गाझामधील इस्रायली “नागरिकांवरील हत्याकांडांना” प्रत्युत्तर देत असल्याचा दावा केला.
इस्रायलच्या अनेक भागात इशारा देणारे सायरन वाजल्यानंतर येमेनमधून डागण्यात आलेले क्षेपणास्त्रही अडवण्यात आल्याचे इस्रायलच्या लष्कराने सांगितले.
इस्रायली सैन्याने गुरुवारी दक्षिण गाझामध्ये हमासच्या लष्करी गुप्तहेरांच्या प्रमुखाला ठार मारल्याचे सांगितले. हमासकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सांगितले की युद्ध पुन्हा सुरू झाल्यापासून झालेल्या मृत्यूंसाठी हमास जबाबदार आहे.
“गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाची आणि शत्रुत्व पुन्हा सुरू होण्याची संपूर्ण जबाबदारी हमासची आहे. अमेरिकेने गेल्या बुधवारी देऊ केलेला ब्रिज प्रस्ताव हमासने स्वीकारला असता तर प्रत्येक मृत्यू टाळता आला असता,” असे कार्यवाहक अमेरिकी राजदूत डोरोथी शियाने परिषदेला सांगितले.
गाझामधील अन्नधान्याच्या सर्वात मोठ्या पुरवठादारांपैकी एक असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पॅलेस्टिनी मदत संस्थेने (यूएनआरडब्ल्यूए) सांगितले की त्यांच्याकडे पुढील सहा दिवस वितरित करण्यासाठी पुरेल एवढेच पीठ शिल्लक आहे.
लोकांना कमी पीठ देऊन आम्ही ते आणखी काही दिवस पुरेल असं काही करू शकत नाही, कारण आम्ही दिवसांबद्दल बोलत आहोत, आठवड्यांबद्दल नाही,” असे यूएनआरडब्ल्यूएचे अधिकारी सॅम रोझ यांनी गाझामधून व्हिडिओ लिंकद्वारे जिनिव्हा येथे पत्रकारांना सांगितले.
गाझामधील मानवतावादी परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक असल्याचे यूएनआरडब्ल्यूएने म्हटले आहे.
“जागतिक अन्न कार्यक्रमाला पाठिंबा देणाऱ्या 25 पैकी सहा बेकऱ्या बंद कराव्या लागल्या,” असे रोझ पुढे म्हणाल्या.
“ऑक्टोबर 2023 मध्ये संघर्ष सुरू झाल्यापासूनचा हा सर्वात प्रदीर्घ काळ आहे ज्यामध्ये गाझाला कोणताही पुरवठा झालेला नाही. युद्धविरामाच्या शेवटच्या सहा आठवड्यांत मदत यंत्रणा म्हणून आम्ही केलेली प्रगती थांबली आहे”
इस्रायलच्या नाकाबंदीमुळे इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत, ज्यामुळे अनेकांना त्यांच्या जेवणात कपात करणे भाग पडले आहे.
इस्रायली आकडेवारीनुसार, हमासच्या अतिरेक्यांनी 7 ऑक्टोबर 2023 रोजी गाझा सीमेजवळ इस्रायली समुदायांवर हल्ला केल्यानंतर युद्ध सुरू झाले, ज्यात 1 हजार 200 लोक ठार झाले.
गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतरच्या संघर्षात 49 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत तर दाट लोकवस्तीचा बराचसा प्रदेश उद्ध्वस्त झाला आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)